Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकव्हॅलेंटाईन स्पेशल : ‘ये प्यार ना होगा कम, सनम तेरी कसम…..’

व्हॅलेंटाईन स्पेशल : ‘ये प्यार ना होगा कम, सनम तेरी कसम…..’

ऐन तारुण्यात आले आणि त्याची भेट झाली. हे नातं, ही सोबत आजवर एवढी वर्षं टिकेल असं अजिबात वाटलं नव्हतं; पण हे नातं अखेरच्या श्वासापर्यंत अतूट राहणार आहे ही घट्ट शाश्वती आहे. कधी काळी मोरपंखी वयात जुळलेलं ते रेशमी नातं आज भक्कम आणि तेवढंच प्रगल्भ झालंय. होय! ते प्रेमात पडण्याचं वय होतं माझं आणि प्रेमात पडलेही होते त्या वयात. ते दिवसच तसे होते जादुई. दिवसरात्र कैफ असायचा त्याच्या प्रेमाचा, अजब धुंदी असायची. त्याला स्पर्श करायला हात आणि त्याच्या त्या मोहक सुवासासाठी श्वास आतुर व्हायचे. डोळे तर वेडावलेले, नेहमीच आसुसलेले असायचे त्याला बघण्यासाठी.

अगदी निमिषभरही नजरेआड करू नये त्याला असं वाटायचं. डोळे भरून बघत जावं. अधाशीपणे पाहत राहावं, अनुभवत जावं वाटे. कुणीच नसू देत सोबत, त्याची सोबत लाखमोलाची आश्वस्त करणारी असते आजही. खरं तर मला स्वतःचं भानही त्याच्याचमुळे आलंय. काय दिलं नाही त्याने मला? सारं काही दिलं, विचार दिले, विचारांना दिशा दिली. माणसं समजू लागली ती त्याच्याचमुळे. जग आणि जगरहाटीही त्यानेच अवगत करून दिली. मला उंच आभाळात भरारी घेण्यासाठी भक्कम पंखही त्यानेच दिले. त्याच्याशिवाय काहीही आवडत नव्हतं, रुचत नव्हतं. जीवापाड प्रेम करतेय त्याच्यावर. त्यानेच ओळख दिलीय मला म्हणून मी गर्दीतील दर्दी ठरले. कितीही अडचणीत, दुःखात असेन त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यानेच हात दिलाय.

- Advertisement -

संकटे आलीत खूप वाटेत पण संघर्ष करण्याची ताकद, हिंमत त्यानेच दिलीय. तो कधीच मागत नाही देतच असतो. त्याचं निरपेक्ष असणं भारी ‘रोमँटिक’ वाटत आलंय. त्याचा आल्हाददायक स्पर्श मनाला वेड लावणारा. त्याचं जवळ असणं म्हणजे माझं बळ, इच्छाशक्ती लाखपटीने वाढणं. जेव्हा जेव्हा खचले असेन आयुष्यात तेव्हा तेव्हा त्यानेच उभं केलंय मला पाय रोवून ठामपणे. जेव्हा जेव्हा मार्ग सापडत नाही तेव्हा तेव्हा त्याने वाटाड्या होऊन वाट दाखवली आहे. जेव्हा चौफेर काळोख दाटू लागतो तेव्हा तेव्हा त्याने प्रकाशवाटा अंथरल्या आहेत पुढ्यात. ह्या अथांग जीवनसागरात माझी नौका जेव्हा निराशेच्या गर्तेत हेलकावे खाऊ लागते तेव्हा त्यानेच दीपस्तंभ होत दिलासा दिलाय.

आयुष्य रटाळ वाटू लागतं तेव्हा तो जगभरातल्या नाना गंमतीजमती सांगत राहतो, जुने सारे पुन्हा नव्याने नवेसे-हवेसे करतो. तो माझ्या आयुष्याची जीवनरेखा आहे. तो नसेल तर जगण्यात मजा नाही. त्याच्यामुळेच तर जगणं सुलभ – सुरम्य झालंय. जगलेही असते त्याच्याशिवाय पण तेव्हा जगणं एवढं सुंदर नसतं कदाचित, जेवढं आज आहे. खरं तर मलाही माझी ओळख नव्हती तशी नीटशी, पण त्याच्या नजरेने मी माझ्याकडे बघू लागले आणि मीच मला आवडू लागले. दिवसेंदिवस अधिकच आवडू लागले. आता तर चक्क ‘मै अपनी खुदकी फेवरेट हूँ|’ बरं!हा सारा त्याच्या असण्याचाच प्रभाव आहे.

आता तर त्याच्याशिवाय माझ्या विश्वाची कल्पनाच करवत नाही मला. त्याच्यामुळे पूर्णत्व या असण्याला अन जगण्याला. त्याचे खरे तर हिमालयाएवढे ऋण आहे माझ्यावर पण त्याने कधीच ऐट मिरवली नाही वा फुकाचा रुबाब दाखवला नाही माझ्यावर. कोणत्याही परिस्थितीत त्याचे असे शांत, संयमी, विवेकी असणे जाम आवडते बुवा आपल्याला! जीव ओवाळून टाकावा वाटतो त्याच्यावर कारण तो ‘खासमखास’ आहे आपल्यासाठी. असा रोज भेटतो, न चूकता अगदी नियमित. कधीकधी तर दिवसातून अगदी आठ-दहा वेळा, पण कधीच कंटाळा नाही येत; उलट उत्साह आणि ऊर्जा कित्येक पटीने वाढते माझी. खरंच ‘तो’ म्हणजे आयुष्यात आलेलं ‘अजब’ रसायन आहे हं!

मी एकटी असले की तो गुपचूप सोबत करतो. मग आमचा प्रेमालाप कित्येक तासनतास चालत राहतो. कित्ती कित्ती विषयांवर बोलतो आम्ही. तो थकत नाही आणि मीसुद्धा कंटाळत नाही. तो ‘जान’ आहे माझी आणि ज्ञानाची खाणही आहे माझ्यासाठी. माझं सामाजिक जाण आणि भानही जागृत ठेवत आलाय तो अगदी काळजीपूर्वक. त्याची अन माझी कोणतीच भेट, कधीच निरर्थक नसते तर प्रचंड ऊर्जा देणारी असते. त्याच्या सान्निध्यात मी रमते, खुलते, हसते आणि सुखावतेही. त्याला आनंद देणेच माहिती. कधी काही मागणे नाही की, वेगळे वागणे नाही. जे जे जगी सारे चांगले आहे ना ते त्याच्यापाशी आहे. त्यानेच जगातील नाना वृत्ती-प्रवृत्तीचे अनुभव सांगितले प्रथम. विनोद सांगितले तशा कोपरखळ्या, नवलकथा, गाणी, गोष्टीही समजल्या त्या त्याच्याचमुळे. मन जेव्हा अस्थिर असते ना तेव्हा त्याच्यामुळे स्थिर होते. त्याच्यासोबतीने अस्वस्थता तर ‘उडन छु’ होते. सतत काहीतरी नवीन शिकत जाते मी त्याच्याकडून. तो सोबत असला की कुणाचीच गरज नसते मला. किती गुणगान गावे त्याचे? किती कौतुक करावे? त्याची ओढ, त्याचे आकर्षण, त्याची गोडी, त्याचेच सारे क्षण. त्याचे आवडणे, त्याच्यामुळे मुक्त बागडणे, मुक्त व्यक्त होणे. त्याची सोबत शीतल चांदणे.

कळत्या वयात पंचवीस वर्षांपूर्वी त्याला भेटले होते एकांतात तेही एका ग्रंथालयात.आजही आम्ही रोज न चुकता भेटतो. एकमेकांना बघत सुखावतो. एकमेकांना जवळ घेत दिवसाची प्रसन्न सुरुवात होते.जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा तोच भडाभडा बोलत राहतो, मी केवळ बघत राहते अधाशासारखी त्याच्याकडे. रात्रीच्या बारा तासांचा दूरावा मध्ये आलेला असतो तेव्हा मी नव्या दिवशी ,नव्याने डोळे भरून पुन्हा त्याच्याकडे बघत राहते. तो न थकता, कंटाळता बोलत राहतो, सांगत राहतो, व्यक्त होतो. मी तल्लीन होऊन जाते रोजसारखीच त्याच्यात आणि वाचत राहते, अद्ययावत होत राहते, सजग होत राहते. नाही नाही, अहो काहीतरीच काय? तो कुणी पुरुष नाहीये!हा माझा मितवा म्हणजे मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाड्या दुसरा तिसरा कुणी नसून ‘पुस्तक’ आहे हो. पुस्तक-ग्रंथ काहीही नावाने हाक मारा माझा सखा आहे तो. त्यानेच मला खऱ्या अर्थाने डोळस केलंय. सारीच क्षेत्रे कळू लागली त्याच्या भेटण्याने.

नव्या-जुन्या पिढीच्या साऱ्या गोष्टी त्याच्याद्वारेच कळतात. सभोवताल घरबसल्या कळत जातो, शहाणं करत राहतो. खरंच, वाचन खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. वाचणार नसाल तर तुम्ही कालबाह्य होता म्हणूनच ‘वाचाल तर वाचाल’ असे म्हटले जाते. मग काय असा एखादा मितवा तुम्हालाही असावा असं वाटतंय नं? मी तर म्हणेन असा प्रियकर, मित्र, सखा केव्हाही उत्तम जो आयुष्याची वळणं अधिक सुंदर, सजग आणि सुरम्य करतो. हा माझा सखा तुमचाही सखा होवो हीच ह्या व्हॅलेंटाईन दिवसाची मनस्वी सदिच्छा….!कारण प्रेम केवळ व्यक्तीवरच नाही तर शब्दांवर, अक्षरांवर, पुस्तकांवर, साहित्यावरही करता येते.

हे शब्दांवरील प्रेम कुठल्याही प्रेमापेक्षा श्रेष्ठच! कारण यात हानी कधीच नाही नेहमीच हित आहे. पुस्तकं आपल्याला शहाणी करतात,स्फूर्ती देतात, अद्ययावत ठेवतात. काळाबरोबर धावण्यास प्रेरित करतात आणि जगणे उत्तरोत्तर समृद्ध करत जातात. या प्राणप्रिय सख्या ‘पुस्तकांना’ या वैश्विक प्रेमदिनी एवढेच वचन देते की , ‘ये प्यार ना होगा कम, सनम तेरी कसम…..’
———————
प्रा.डॉ.प्रतिभा जाधव
(वक्ता,साहित्यिक,एकपात्री कलाकार)
नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या