Saturday, April 27, 2024
Homeनगरअवैध धंद्याविरोधात वळण ग्रामस्थ एकवटले

अवैध धंद्याविरोधात वळण ग्रामस्थ एकवटले

पोलीस पाटलांवर केलेला आरोप तथ्यहीन; पुन्हा आरोप केला तर याद राखा – दत्तात्रय खुळे

वळण (वार्ताहर)- पोलीस पाटलांवर केलेला आरोप तथ्यहीन असल्याने संपूर्ण गाव एकवटले आहे. दारूबंदीबरोबर गावातील अवैध व्यवसाय बंद झालेच पाहिजे, पुन्हा ग्रामस्थांंवर आरोप केले तर याद राखा, असा इशारा बाजार समितीचे संचालक दत्तात्रय खुळे यांनी दिला आहे.
राहुरी तालुक्यातील वळण गावात तंटामुक्त गाव समितीने गाव दारूमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी गाव एकवटला आहे.

- Advertisement -

रविवारी रात्री पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक राक्षे, बागुल, सानप, चव्हाण, भवार, त्रिभुवन, ताजणे आदींच्या फौजफाट्याने अवैध दारूविक्री करणार्‍या ठिकाणी छापे टाकले. यावेळी एका दारूविक्री करणार्‍यास पळताना पायाला दुखापत झाल्याने त्याने दारूबंदी चळवळीत सहभाग घेणारे पोलीस पाटील सोमनाथ डमाळे यांच्या हाणामारीत ही दुखापत झाल्याचा कांगावा करत पोलीस पाटील यांना दमदाटी व शिवीगाळ केली.

त्यामुळे अशा प्रकाराच्या केलेल्या खोट्या आरोपाने ग्रामस्थ आणखी आक्रमक होऊन काल सोमवारी सकाळी तातडीची सभा बोलून सदर घटनेचा निषेध नोंदविला. तसेच अवैध व्यवसायिकांनी अवैध धंदे बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तर यापुढे हे धंदे सुरू होऊ नये यासाठी ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात आले.

सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विलास आढाव होते. यावेळी भाऊसाहेब खिलारी, पत्रकार प्रभाकर मकासरे, सुभाष सोनार, भानाभाऊ खुळे, धनंजय आढाव यांनी मनोगत व्यक्त केले. सभेस तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष एकनाथ खुळे, पोलीस पाटील सोमनाथ डमाळे, अशोक कुलट, ज्ञानेश्वर खुळे, बी.आर.खुळे, चेअरमन गणेश कार्ले, रवींद्र गोसावी, बाळासाहेब शिंदे, सुदाम शेळके, पत्रकार वसंत आढाव, शरद खिलारी, संजय आढाव, विजय आढाव, किशोर म्हस्के, सुदाम कार्ले, मनोज मकासरे, अजय मकासरे, बळीराम कार्ले, प्रदीप कुलट, आदिनाथ कार्ले, देवानंद मकासरे, प्रकाश आढाव, पर्वत खुळे, विजय ठुबे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, गावात अवैध दारू विक्री करणार्‍यांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांच्या कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी त्यांनी गावात इतर चांगला व्यवसाय सुरू करावा. त्यांच्या त्या व्यवसाय परिवर्तनासाठी त्यांचे ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करू. तर त्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यात येईल, असे यावेळी पत्रकार गोविंद फुणगे यांनी सांगितले.

ग्रामस्थांनी सहकार्य करावे…
गावात अवैध धंद्यांमुळे शांतता भंग होऊन तरूण पिढी व्यसनाधीन होऊन गुन्हेगारीकडे आकर्षीत होत आहे. त्यानेच अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे या चळवळीला सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन पं.स. माजी सदस्य बाळासाहेब खुळे यांनी केले.

बीट हवालदारांची बदनामी थांबवा
दारूबंदी चळवळ सुरू असताना आरोपींना पोलीस का पकडत नाही? असा सवाल करत ग्रामस्थांनी मंत्री तनपुरेंचे लक्ष वेधले होते. दरम्यान या गावात असलेले बीट हवालदार यांची यात नाहक बदनामी झाली. वास्तविक पहाता बाहेरील इतरत्र पोलिसांचे या व्यवसायिकांशी लागेबांधे असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला होता. पण यामध्ये बीट हवालदार यांचा काहीही हस्तक्षेप नसल्याने त्यांची नाहक बदनामी थांबवा असे आवाहन तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष एकनाथ खुळे यांनी केले.

अवैध व्यावसायिक लवकरच तडीपार
अवैध व्यावसायिकांचे पोलीस रेकॉर्ड तपासून त्यांचे लवकर तडीपारीचे प्रस्ताव दाखल करून योग्य ती कारवाई केली जाईल.
– पोलीस निरीक्षक , मुकुंद देशमुख.

- Advertisment -

ताज्या बातम्या