Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

देश कुठल्याही हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर नाही – अरुणा ढेरे

Share
देश कुठल्याही हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर नाही - अरुणा ढेरे, Latest News Usamnabad Marathi Sanmelan Aruna Dere Statement

संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटोंच्या भाषणावर नाराज, साहित्यिकांवर दबाव नसल्याचं मत

उस्मानाबाद – जर एखाद्याने वेगळी भूमिका घेतली की लगेच त्याने एका विचारधारेचा झेंडा हातात घेतलाय, असे होत नाही. देश कुठल्याही प्रकारच्या हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर आहे, असं मला वाटत नाही. सर्व जण आज सुजाण आहेत, असं काही होणार नाही याचा मला विश्वास आहे असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी म्हटले आहे.

93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे सुरू आहे. अरुणा ढेरे यांनी संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटोंच्या भाषणावर नाराजी व्यक्त केली आहे. साहित्यिकांवर दबाव नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा असल्याच्या फादर दिब्रिटो यांच्या अध्यक्षीय भाषणाशीही असहमत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

साहित्य संमेलनोच व्यासपीठ हे साहित्याच्या निरनिराळ्या प्रश्नांवर चर्चा करण्याचं व्यासपीठ आहे. मात्र यंदाचे संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे साहित्य आणि साहित्य संमेलनाविषयी फारसे बोलले नाहीत. त्यांचे कालचे विचार त्यांनी याआधी अनेक वेळा बोलून दाखवलेली भूमिका आहे. संमेलनाच्या निमित्ताने त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी यांची हत्या, शेतकरी आत्महत्या याबाबत जे बोलले ती तळमळ खरी आहे. मात्र भाषा विषयीचे प्रश्नही साहित्यिकांना पुरेसे सोडवता आलेले नाहीत. साहित्य क्षेत्रातील विविध अनिष्ट गोष्टींना बाजूला कसं ठेवायचं याचे विचार गंभीरतेने आलेले नाहीत. हे सगळं बाजूला ठेवून एका मोठ्या प्रश्नाकडे पाहावं, अशी जबाबदारी त्यांना वाटली असावी म्हणून ते बोलले असावेत असं वाटतंय, असं अरुणा ढेरे म्हणाल्या.

साहित्यिकांवर कुठलाही दबाव नाही. आजही अनेक जण आपले विचार लिखाणाच्या माध्यमातून मांडत आहेत. जेएनयूवरुन जे बोललेत त्यावरून मला वाटत नाही की त्यांना काही कृती करायची आहे. कुठलीही हिंसा निंदनीयच आहे. देशातील वातावरणावर मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही, याचा अर्थ माझ्यावर दबाव आहे किंवा मी कुणाला घाबरते, असा होत नाही, असेही त्यांनी सांगितलं.

संमेलनाध्यक्ष काय म्हणाले होते ?
सध्या देशात जे सुरू आहे, त्यावर आपण भूमिका घ्यायला हवी. मी ती भूमिका घेतोच. मी स्पष्ट बोलतो, आणीबाणीच्या काळातही मी उपरोधिक पत्र लिहीत होतो. प्रत्येक माणसाने नैतिक भूमिका घ्यायला पाहिजे. सध्या देशात सुरू असलेल्या गोष्टींकडे पाहिलं की प्रश्न पडतो की, आपण भुतांच्या प्रदेशात राहतो की माणसांच्या? लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांना मारहाण करत असाल, तर आम्ही शांत बसणार नाही. भारतात जर्मनीसारखी परिस्थिती येऊ शकते, असं वक्तव्य करताना दिब्रिटोंनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारची तुलना हिटलरशी केली.

परिसंवादादरम्यान गोंधळ
शनिवारी साहित्य संमेलनाच्या मंचावर ‘संत परंपरेमुळे समाजात बुवाबाजीचं वाढली का?’ या विषयावर परिसंवाद सुरू होता. त्यावेळी ‘हिंदू धर्माची बदनामी करणारे परिसंवाद का आयोजित करता?’ असा प्रश्न विचारत काही साहित्यिक मंचावर आले आणि त्यांनी गोंधळ घातला. जगन्नाथ पाटील यांनी काही लोकांना सोबत घेतलं आणि स्टेजवर येऊन हा परिसंवाद बंद पाडण्याचा प्रयत्न केला. सुमारे पाच ते सहा मिनिटे हा गोंधळ सुरु होता. काही वेळाने हा परिसंवाद पुन्हा सुरू झाला.दरम्यान यावेळी वार्तांकन करायला आलेल्या पत्रकारांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. जगन्नाथ पाटील हे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे कार्यकर्ते असल्याचे समजते.

फादर दिब्रिटो प्रकृती अस्वास्थामुळे मुंबईत
प्रकृती अस्वास्थ्यामुळे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो मुंबईला परतले आहेत. त्यांना पाठीचा त्रास होत होता. अखेर त्यांना मुंबईतील होली क्रॉस हॉस्पिटलमध्ये उपाचारासाठी आणण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरु आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!