Thursday, May 9, 2024
Homeनगरटंकलेखन परीक्षेत चौघे डमी विद्यार्थी आढळले

टंकलेखन परीक्षेत चौघे डमी विद्यार्थी आढळले

केंद्र संचालकांशी अरेरावी : आठ जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) – मराठी विषयाच्या संगणक टंकलेखन परीक्षेत नगरमध्ये डमी विद्यार्थी बसविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नगर तालुका पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा नोंदविला असून, चौघांना अटक केली आहे.

- Advertisement -

संतोष मारुती चौरे (रा. पाईपलाईन रोड), आदिनाथ नामदेव सोलट, नवनाथ नामदेव सोलट (रा. मिरी, ता. पाथर्डी), युवराज रामदास सुळे (रा. पाटोदा, जि. बीड), मयूर चंद्रकांत घोडके, मोरेश्वर दिलीप गीते, तेजस जालिंदर बोरुडे, प्रवीण अर्जुन गाडेकर (रा. नगर) या आठ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. सरकारी कामात अडथळा आणणे, जाणीवपूर्वक संगनमताने फसवणूक करणे आदी कलमांनुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यात संतोष चौरे, आदिनाथ सोलट, नवनाथ सोलट, युवराज सुळे या चार जणांना अटक करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र संचालक जयश्री कार्ले यांनी फिर्याद दिली आहे.

राज्यात संगणक टंकलेखनाच्या परीक्षा सुरू आहेत. त्यानुसार नगरच्या नेप्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग या कॉलेजच्या केंद्रावर मराठी विषयाची संगणक टंकलेखन परीक्षा सुरू होती. या केंद्रावर संचालक म्हणून जयश्री कार्ले कार्यरत होत्या. परीक्षा हॉलमध्ये काही विद्यार्थी संशयास्पद हालचाली करत होते. त्यावेळी कार्ले यांनी या विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तपासले. त्याचबरोबर स्वाक्षरीपट देखील तपासला. त्यावेळी चार विद्यार्थी हे परीक्षेला डमी (तोतया) आढळले. कार्ले यांनी विद्यार्थ्यांना विचारणा केल्यावर या विद्यार्थ्यांनी त्यांना अरेरावीची भाषा वापरली. त्यानंतर परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. परिणामी परिक्षेला उशिरा होऊ लागला.

जयश्री कार्ले यांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानुसार केंद्रावर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. हे विद्यार्थ्यांना नगर तालुका पोलीस ठाण्यात आणल्यानंतर चौकशी केली. तिथे या विद्यार्थ्यांनी दुसर्‍याच्या ओळखपत्रावर (डमी) परीक्षेला बसलो असल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्यानुसार अधिक तपास केला. ज्या विद्यार्थ्यांचे हे डमी विद्यार्थी होते, त्यांचाही गुन्ह्यात आरोपीमध्ये समावेश केला आहे. संगणक टंकलेखन परीक्षेला डमी बसणार्‍या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती वार्‍यासारखी पसरली होती.

संतोष चौरे न्यायालयात नोकरीला !
डमी विद्यार्थ्यांमध्ये एक संगणक टंकलेखन इन्स्टिट्यूटचा संचालकच असल्याची चर्चा आहे. संतोष चौरे, असे त्याचे नाव आहे. श्रीकृष्ण टंकलेखन नावाने तो संस्था चालवीत असल्याची माहिती पुढे येत आहे. संतोष चौरे श्रीरामपूरच्या न्यायालयात कार्यरत असल्याची माहिती समजली आहे. या अटक केलेल्या संतोष चौरे याला उद्या रविवारी न्यायालयासमोर हजर करणार आहेत.

डमी विद्यार्थी; पुन्हा परीक्षा होणार का ?
टंकलेखनाच्या परीक्षेला पूर्वीपासून ग्रहण लागलेले आहे. पेपरफुटीपासून ते डमी विद्यार्थ्यांपर्यंतचा समावेश आहे. नांदेड येथे पेपर फुटीचा प्रकार झाला होता. त्यावेळी पुन्हा परीक्षा घेण्यात आली होती. आता नगरच्या केंद्रावर संगणक टंकलेखन परीक्षेत डमी विद्यार्थ्यांचा प्रकार समोर आला आहे. यावर शिक्षण परीक्षा परिषद काय कारवाई करणार, असा सवाल केला जात आहे.

संगणक टंकलेखनाला देखील ग्रहण
पूर्वी मॅन्युअल टंकलेखनावर परीक्षा होत होती. त्यावेळी डमी विद्यार्थ्यांचे प्रकार सर्रास होत होते. हे टाळण्यासाठी टंकलेखन, लघुलेखन संघटनेने पुढाकार घेऊन संगणक टंकलेखन हा अत्याधुनिक अभ्यासक्रम आणला. या अभ्यासक्रमानुसार सर्व परीक्षा ऑनलाईन झाली. तरी देखील या परीक्षेत डमी विद्यार्थ्यांचा प्रकार होत असल्याचे आजच्या प्रकारावरून समोर आले आहे. यामुळे काही टंकलेखन इन्स्टिट्यूटच या प्रकाराला खतपाणी घालत असल्याची माहिती पुढे येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या