ट्रम्प दौरा – 3 तासांच्या भेटीवर 100 कोटींचा खर्च

अहमदाबाद – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया 24 फेब्रुवारीला भारत दौर्‍यावर येणार आहेत. ट्रम्प यांच्या या केवळ 3 तासांच्या दौर्‍यासाठी जवळपास सुमारे 100 कोटींचा खर्च करण्यात येतोय. या भेटीची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही घेत आहेत. ट्रम्प आपल्या भारत दौर्‍याची सुरुवात गुजरातच्या अहमदाबाद शहरातून करणार आहेत.

जगातील सर्वात शक्तीशाली देशाच्या राष्ट्राध्यक्षाच्या स्वागताची तयारी अहमदाबादमध्ये ठिकठिकाणी दिसून येतेय. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पैशांची कोणतीही कमतरता भासू नये, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अधिकार्‍यांना दिलेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानतर अहमदाबाद नगर निगम आणि अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरण रस्ते दुरुस्तीच्या कामात जुंपेलत. यासाठी जवळपास 100 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

17 रस्त्यांचं डांबरीकरण सुरू झालंय. मोटेरा स्टेडियमचं उद्घाटन केल्यानंतर एअरपोर्टवर परतण्यासाठी 1.5 किलोमीटरचा नवा रस्ता बनवण्याचंही काम जोरात सुरू आहे. या रस्ते उभारणीसाठी जवळपास 60 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

यातील काही खर्चाचा भार केंद्रीय सरकार उचलणार आहे परंतु, खर्चातील मोठा भाग राज्याला भागवावा लागणार आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 500 कोटी  रुपयांची तरतूद करण्यात आली होती. याच पैशांचा वापर मोटेरा स्टेडियम, विमानतळ आणि साबरमती आश्रमानजिकचे रस्ते सुधारण्यासाठी केला जात आहे.

सुरक्षेसाठी 15 कोटींचा खर्च –

ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी 12 ते 15 कोटींचा खर्च होणार आहे. मोटेरा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या केम छो ट्रम्प कार्यक्रमात सहभागी होणार्‍यांसाठी 1 लाखांहून अधिक लोकांचा ट्रान्सपोर्ट आणि नाश्त्यासाठी 7-10 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. तसंच ट्रम्प यांच्या रॅली दरम्यान रस्त्यांचं सुशोभीकरण आणि निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जवळपास 10 कोटींचा खर्च केला जाणार आहे.