त्र्यंबकेश्वर : मुरंबीत मोबाईल पोहचला पण गाव ‘आउट ऑफ नेटवर्क’

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक : एका बाजूला देश डिजिटल इंडियाच्या नावाने पुढे येत असतांना दुसऱ्या बाजूला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुरंबी हे गाव आउट ऑफ नेटवर्क झाले आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल पासून हाकेच्या अंतरावर असलेले मुरंबी आजही संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. यामुळे येथील नागरिकांना इतर गावांना संपर्क करण्यासाठी निरोपाचा आधार घ्यावा लागत आहे. ग्रामस्थांना नेटवर्कसाठी गावापासून एक किलोमीटर पुढे टेकडीवर जावे लागते. दरवेळी संपर्क साधण्यासाठी एवढे अंतर लांब जाणे शक्य नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.

नाशिक जिल्ह्यातील शेवटचे टोक व पालघर जिल्ह्याच्या सीमेवर मुरंबी हे गाव वसलेले आहे. या गावबरोबरच आजूबाजूला शिरसगाव, कळमुस्ते, भूतमोखाडा, कोटंबी या गावांना देखील नेटवर्कची समस्या भेडसावते. सध्या डिजिटलाचा जमाना असल्याचे बोलले जाते. परंतु, अद्यापही जिल्ह्यातील काही गावे नेटवर्कपासूनच दूर आहेत. त्यामुळे येथील मोबाईल धारक मोबाईलचा वापर मनोरंजासाठी करताना दिसून येत आहेत.

या गावातील नागरिकांनी सांगितले की टॉवर आहे. परंतु, रेंजच मिळत नाही. त्यामुळे आमचा भाग संपर्कापासून दूर आहे. रेंज मिळण्यासाठी टेकडीवर किंवा हरसूल गाठावे लागते. अनेकदा अत्यावश्यक सेवा मिळवणायसाठी १०८ यास नंबरवर संपर्क होत नाही. परिणामी रुग्णास जीव गमवावा लागला आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींनी भ्रमणध्वनी टॉवर यंत्रणा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गेल्या वर्षभरापासून जिओ कंपनीचा टॉवर बांधण्यात आला असून अद्यापही सुरु करण्यात आलेला नाही. यामुळे येथील मोबाइलधारकांना नेटवर्कच्या समस्येला तोंड द्यावे लागते. लवकरात लवकर नेटवर्कची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांची आहे.
-कृष्णा राऊतमाळे, ग्रामस्थ

काही महत्वाच्या कामांसाठी सध्या मोबाईल आवश्यक असतो. परंतु येथील ग्रामस्थांकडे मोबाईल असूनही त्याचा वापर करता येत नाही. परिणामी इतर ठिकाणी संपर्क कारवयाचा असल्यास टेकडीवर जाऊन संपर्क साधावा लागतो. देश डिजिटल होत आहे परंतु अनेक खेडी अद्यापही संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.
-किशोर राऊत, ग्रामस्थ

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *