Thursday, April 25, 2024
Homeनगरटोमॅटोबाबत आठ दिवसांत अहवाल

टोमॅटोबाबत आठ दिवसांत अहवाल

..त्यांना त्यांचे राजकारण लखलाभ- भुसे

अहमदनगर (प्रतिनिधी)- टोमॅटो पिकावर विषाणूजन्य आजार आला आहे. मात्र, याबाबत अफवा पसरवून त्याचा संबंध करोनाशी जोडण्यात येत आहे. यामुळे नागरिक आणि शेतकर्‍यांनी अफवावंर विश्वास ठेवू नये. टोमॅटो विषाणूचे नमुने राहुरीच्या कृषी विद्यापिठात पाठविण्यात आले असून तेथून ते बंगळूरूला संशोधनासाठी गेलेले आहेत. टोमॅटो पिकावर असणार्‍या 12 विषाणूपैकी सहा विषाणू आढळून आले असून त्याचा प्रादुर्भाव हा रोप लागवड करतांना आणि फळ वाढीला असतांना होत असल्याचा प्राथमिक अहवाल आहे. येत्या 8 ते 10 दिवसांत बंगळरू येथून सविस्तर अहवाल आल्यानंतर पुढ उपाययोजना करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले असून, त्यावर ठोस औषध उपलब्ध नाही. त्यात खरीप हंगाम तोंडावर आला आहे. अशा वेळी राजकारण करणे योग्य नाही. जे करीत असतील, त्यांना त्यांचे राजकारण लखलाभ. राज्यपाल भवन सर्वांसाठीच खुले आहे. सामान्य नागरिकही त्यांना भेटू शकतो. त्यामुळे ज्यांना राज्यपालांना भेटायचे आहे, त्यांनी भेटावे, अशा शब्दांत कृषिमंत्री भुसे यांनी भाजपचे नाव न घेता टोला लगावला.

मंत्री भुसे म्हणाले, खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे. शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. खरीप हंगामात शेतकर्‍यांना पेरणीसाठी खते, बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील. मागणी केल्यास, कृषी विभागाच्या समन्वयाने शेतकर्‍यांना बांधावर खते-बियाण्यांचा पुरवठा केला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारने बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजनेची घोषणा केली.

शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावा, यासाठी योजनेंतर्गत प्रामुख्याने गटशेती करणार्‍या शेतकर्‍यांना आर्थिक मदत केली जाईल. दुसरीकडे भाजपवर निशान साधतांना लोकशाही प्रत्येकला मते मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, जनतेचे सर्वांवर लक्ष असते. आज राजकारण करण्याची वेळ नसून ज्यांना कराचे असल त्यांना ते लखलाभो असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

टोळधाड नियंत्रणासाठी ड्रोन
राज्यात काही भागात टोळधाडचे संकट आले आहे. त्यावर कृषीमंत्र्यांनी टोळधाडवर कीटकनाशक फवारणीचे काम प्रगतिपथावर आहे. फायर ब्रिगेडचे बंबने सुद्धा फवारणीसाठी वापरण्यात आले. ट्रॅक्टरचे फवारणीचे ब्लोअर वापर करतोय. पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कीटकांचा नाश केला आहे. शेतकर्‍यांना कृषी विभागाच्या वतीने कीटकनाशके मोफत देण्याचा प्रयत्न आहे. तर ड्रोनच्या माध्यमातून किटकनाशकांची फवारणी करता येईल का यासंदर्भात नियोजन सुरू आहे. एक दोन दिवसात तोही प्रयोग सुरू करत असल्याचं कृषिमंत्री भुसे यांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या