Thursday, April 25, 2024
Homeनगरटोका येथे नदीपात्रात शेवगावच्या तरुण डॉक्टरचा मृतदेह

टोका येथे नदीपात्रात शेवगावच्या तरुण डॉक्टरचा मृतदेह

देवगडफाटा (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम-टोका शिवारात गोदावरी नदीपात्रात शेवगावच्या तरुण फिजीओथेरपीस्ट डॉक्टरचा मृतदेह आढळून आला असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिलिंद भागनाथ बोडखे (वय 32) धंदा-शेती रा. शास्त्रीनगर, शेवगाव यांनी दिलेल्या खबरीत म्हटले की, त्यांचा चुलतभाऊ हंसराज हरिभाऊ बोडखे (वय 40) रा. आखेगाव रोड ता. शेवगाव हे 9 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा पासून बेपत्ता होते. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात खबर दिली होती. हंसराज बोडखे यांची गाडी (इनोव्हा कार) प्रवरासंगम येथे जुन्या पुलावर उभी असल्याची माहिती दुसर्‍या दिवशी 10 फेब्रुवारी रोजी मिळाली.

- Advertisement -

त्यानंतर मी व इतर नातेवाईक यांनी शोध घेतला असता दि. 11 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह टोका शिवारात गोदावरी नदीपात्रात घटेश्वर मंदिराजवळ मिळून आला. या खबरीवरून नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

डॉ. हंसराज बोडखे यांनी गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ते पुणे (शिक्रापूर) येथे काही महिन्यांपासून हॉस्पिटल चालवत होते. घटनेच्या आधी ते शेवगावला आले होते व शेवगावला असलेले पूर्वीचे हॉस्पिटल पुन्हा सुरू करण्याचा विचार करत होते असे समजते.

हद्दीच्या वादामुळे मृतदेह बाहेर काढण्यास विलंब
प्रवरासंगम-टोका येथे नदीपात्रात जायकवाडी फुगवट्याचे पाणी कायम असते त्यामुळे येथे येऊन मोठ्या संख्येने आत्महत्या होतात. तसेच महामार्ग असल्यामुळे तसेच दोन्ही जिल्ह्याच्या सिमेवर असल्याने घातपात करून मृतदेहही आणून टाकले जातात. हे मृतदेह नदीच्या पात्रात तरंगत असताना ते गंगापूरच्या की नेवासा पोलिसांच्या हद्दीत यावरून मतभेद होतात. कालही असेच झाले. अखेर नेवासा पोलिसांनी नमते घेत मृतदेहाबाबत पुढील कार्यवाही केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या