Type to search

Featured नाशिक

भारत योग यात्रा योगोत्सवास उत्साहात सुरुवात; पहिल्याच सत्रात 500 हुन अधिक योग साधकांनी अनुभवली योगनिद्रा

Share

नाशिक | प्रतिनिधी

देशातील पहिले योगविद्यापीठ अशी ख्याती असलेल्या बिहार स्कुल ऑफ योगाच्या ‘भारत योग यात्रा योगोत्सवास शुक्रवारी (दि. 8) नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. ठक्कर डोम येथे स्वत:ला वाचा, स्वयम को जानो अशी मध्यवर्ती संकल्पना असलेल्या योगोत्सवातील पहिल्याच सत्रात 500 हुन अधिक योग साधकांनी योगनिद्रा अनुभवली.

स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ देत अभ्यास आणि संशोधन करून जगाला दिलेली देण असलेल्या ‘योगनिद्रा’ अभ्यासाचा वापर आता आधुनिक शिक्षण पद्धतीतही होऊ लागला आहे. त्यांनी योगनिद्रेद्वारा आपल्या संकल्प-शक्तीला जागे करून आचार विचार, दृष्टिकोन , भावना तसेच संपूर्ण जीवनाला कलाटणी मिळू शकते हे सिद्ध करून दाखविले आहे.

अनेक वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार या योग्यविद्येचा वापर कुठेही केल्याने उत्कृष्ट परतावे मिळत असल्याचे समोर आले आहेत अशी माहिती आपल्या व्याख्यानातून स्वामी शिवानंद सरस्वती यांनी दिली. फ्रान्स मधील एका शाळेत या विद्येचा वापर होत असल्याचंही दाखला त्यांनी दिला.

सत्राच्या सुरुवातीला आचार्य कैवल्यानंद सरस्वती यांनी मनःशांती तसेच वैविध्यपूर्ण आसनांची माहिती आणि प्रात्यक्षिके घेतली. ओमकारच्या विविध छटा त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितल्या. पवनमुक्तासनाचे तीन टप्प्यात अध्ययन करून मार्गदर्शन केले. पुढे गायत्रीमंत्र म्हणत तितली (फुलपाखरू) आसन करत त्याचे फायदे समजावून सांगितले. प्राणायमाचाही अभ्यास यावेळी घेण्यात आला.

पुढील दोन दिवस शनिवार आणि रविवारी सकाळी साडेसहा ते साडेआठ तसेच संध्याकाळी टाच वेळी शास्त्रीय पध्दतीने योगासने, प्राणायाम, ‘स्वयं को जानो’ या विषयावर प्रवचने आणि ध्यान साधना असे कार्यक्रम होणार आहेत. सर्व दिवस दोनही सत्र नागरीकांसाठी नि:शुल्क खुली आहेत. या उत्सवाला पुणे, मुंबईसह उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रतिनिधी उपस्थित होत आहेत.

भारत योग यात्रा उत्सवाचा प्रारंभ 2001 मध्ये झाला असून आजपर्यंत देश-विदेशात तो साजरा करण्यात आला. 2004 साली नाशिकमध्ये हा यात्रोत्सव झाला होता. आज तब्बल 15 वर्षांनंतर ही यात्रा नाशिक शहरात आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, नाशिकमधील या उत्सवात स्वामी सत्यानंद, स्वामी निरंजनानंद यांनी लिहिलेली, आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सुमारे २५० योग ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नाशिकच्या योग आणि आरोग्यप्रेमी नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

योगनिद्रेत असाध्य रोगांवर नियंत्रण मिळवण्याची शक्ती

योगनिद्रेच्या चमत्कारिक प्रभावाने अनेक असाध्य रोगांपासून अनेकांनी मुक्ती मिळवली आहे. कॅन्सरसारख्या असाध्य आजारांवरहीनियंत्रण मिळवणारी उदाहरणे आहेत. मानसशास्त्रीय आजार, निद्रानाश, तणाव, नाश आणणाऱ्या औषधांपासून मुक्ती, सांधेदुखी, दमा, पेप्टिक अल्सर, कॅन्सर, हृदयरोग यांसारख्या आजारांवरील संशोधनात योगनिद्रा पासून सकारात्मक परिमाण बघायला मिळले असल्याचे स्वामी शिवराजानंद सरस्वती यांनी व्याख्यानात सांगितले.

मनुष्याचे पूर्णत्व हेच योगाभ्यासाचे लक्ष्य

कार्यक्रमाचे संयोजक स्वामी शिवराजानंद सरस्वती यांनी सांगितले की, स्वतः विषयीची संपूर्ण माहिती तसेच विभिन्न तत्वांना सरळ स्वरूपात मांडण्याचे सामर्थ्य हीच योगाची विशेषतः आहे. आपल्या स्वतःमध्ये अशी एक जैविक शक्ती आहे जी सूक्ष्म यंत्रांनीही मोजली जाऊ शकत नाही. हेच योग आपणास बघायला शिकवतो. या शक्तीची वैज्ञानिक व्याख्या आजवर कोणी करू शकलेला नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!