Type to search

Featured maharashtra

हे तर असत्यमेव जयते- भाजपा आमदार अँड. आशिष शेलार

Share

मुंबई | प्रतिनिधी

“सत्यमेव जयतेची” घोषणा देत आकाराला येणाऱ्या तीन चाकी सरकारने प्रत्यक्षात मात्र “असत्यमेव जयते” असा कारभार पहिल्याच दिवशी सुरु केला आहे, अशा शब्दांत भाजपा आमदार अँड. आशिष शेलार यांनी सरकारवर तोफ डागली आहे. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ज्येष्ठ आमदार कालीदास कोळंबकर यांची नियुक्ती केली असून त्यांना शपथही दिली आहे. असे असताना या सरकारने बहूमत सिध्द करण्यासाठी उद्या बोलावलेल्या अधिवेशनात हंगामी अध्यक्ष बदलण्याची भूमिका घेतली आहे.

ही बाब आज पर्यंतच्या विधानसभा सभागृहाच्या प्रथा परंपरा व नियमात बसणारी नाही. आपल्या पक्षाच्या सदस्यांना हंगामी अध्यक्ष पदी बसवून त्यांच्याकडून विधानसभेच्या नियमात आणि परंपरेत बदल करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यातून या तीन चाकी “असत्यमेव जयतेचा” कारभारच समोर आला आहे, अशी टीका अँड. आशिष शेलार यांनी केली आहे. नवे सभागृह अस्तित्वात येणे बाकी आहे. तसेच स्थायी अध्यक्षांची निवड होणे बाकी आहे.

अशावेळी हंगामी अध्यक्ष बदलण्याचा निर्णय मंत्री मंडळाने घेणे हे आजवरच्या प्रथांमध्ये बसणारे नाही. जर नव्या सरकारकडे बहुमत आहे तर मग आमदारांवर अविश्वास दाखविण्याचे कारण काय? स्वत:च्या पक्षाच्या आमदारांना डांबून ठेवणे यात कुठले आले सत्यमेव जयते? राज्यपालांनी नियुक्त केलेल्या हंगामी अध्यक्षांवर अविश्वास दाखवणे यात कुठे आले सत्यमेव जयते? असे काय दडलेय या प्रक्रियेत ? असे एक नाही अनेक प्रश्न आमच्या मनात आहेत, असे सांगत आमदार अँड. आशिष शेलार यांनी या नव्या सरकारने पहिल्या दिवसापासूनचा कारभार असत्यमेव जयतेच आहे, अशी टीका केली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!