Type to search

Featured नाशिक

ट्रॅक्टरने मका नांगरला

Share

नामपूर । वार्ताहर

खरीप हंगामात शेतात पेरलेल्या दिड महिन्याच्या मक्यावर आक्रमण केलेल्या लष्करी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी 15 दिवसाच्या अंतराने दोन वेळा प्रतिबंधक रसायनांच्या फवारण्या करून देखील लष्करी अळी मक्याचा फडशा पाडत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्‍याने पुर्ण पिकात ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगर फिरविले.

25 ते 30 हजाराचा पेरणीसाठी झालेला खर्च पुर्णत: वाया गेला असून महागडी बियाणे व फवारणीचे औषधे घेवून देखील मक्यावरील लष्करी अळीचा बंदोबस्त होत नाही. कृषि विभागातर्फे होत असलेली जनजागृतीचा कुठलाही लाभ होत नसल्याने लष्करी अळीने आपद्ग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

बागलाण तालुक्यातील काकडगाव येथील शेतकरी योगेश पंडित पाटील यांच्या शेतातील मक्यावर लष्करी अळीचे प्रचंड थैमान घातल्यामुळे आज मंगळवार (दि. 20) रोजी सुमारे दीड महिन्याच्या मक्यावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगर फिरवला. लष्करी अळीमुळे मोठे आर्थिक नुकसान पाटील यांना सोसावे लागले आहे.

दहा एकर शेती असलेले योगेश पाटील खरीप हंगामात मका पेरतात. यापूर्वी दरवर्षी एकरी 30 ते 40 क्विंटल उत्पन्न घेत होते. यंदा जून महिन्यात पाऊस न पडल्यामुळे त्यांनी जुलै महिन्यात पहिल्याच आठवड्यात बिकाडीकॉल (9141) या कंपनीची 1350 रुपयांची महागडी किमतीची बॅग खरेदी करून शेतात सुमारे 6 बॅगा दोन एकर जमिनीत पेरल्या. सुरवातीला पीक जोमदार दिसत होते. मात्र उगवण झाल्यावर पंधरा दिवसात पीक कोमजायला लागले. पाने पिवळी पडायला लागली.

पाटील यांनी शेतातील मक्याची पाहणी केल्यावर पिकाच्या अंतर पोग्यात लष्करी अळी दिसून आली. अळीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी नुवान व इतर महागडी औषधें घेऊन फवारणी केली. पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करूनही अळीचा बंदोबस्त झालाच नाही शेवटी नाइलाजास्तव पीक नांगरण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना सांगितले.

लष्करी अळीने फस्त केलेल्या मका पिकाची पाहणी तलाठी दिलीप साळवे, ग्रामसेवक दिनेश कापडणीस, सरपंच निंबा सोनवणे, प्रल्हाद अहिरे, राजाराम पाटील यांनी भेट देऊन केली. लष्करी अळीच्या आक्रमणामुळे काकडगावसह परिसरातील मका उत्पादक चांगलेच संकटात सापडले असून यंदा जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न पुन्हा गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विमा भरपाईपासून शेतकरी वंचित
काकडगावसह परिसरातील शेतकर्‍यांचे मका हेच नगदी पीक आहे. विमा कंपन्या विमा हप्ता भरून घेतात. प्रत्यक्षात भरपाई कोणालाच मिळत नाही. विमा कंपन्यांची तक्रार कुठे करावी याचे शेतकर्‍यांना माहिती नाही. चालू वर्षी बागलाण तालुक्यातील सर्वच मका उत्पादकांचे नुकसान झाले असल्याने त्यांना तातडीने विमा भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी कृउबा सभापती हेमंत कोर यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना व्यक्त केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!