Thursday, April 25, 2024
Homeनगरनगर: भाड्याच्या पैशावरून वाद, खुनाचा प्रयत्न

नगर: भाड्याच्या पैशावरून वाद, खुनाचा प्रयत्न

चांदणी चौकातील घटना । भिंगार पोलिसांत गुन्ह्याची नोंद

अहमदनगर (प्रतिनिधी) – टेम्पो भाड्याचे पैसे देण्यावरून झालेल्या वादावादीत खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार शहरातील चांदणी चौकात घडला. या प्रकरणी भिंगार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

झेंडीगेट येथील बेपारी मोहल्लामधील समी गुलाम कुरेशी हे जखमी झाले असून त्यांनीच पोलिसांत तक्रार दिली आहे. किरण सुनील दांडगे असे टेम्पो चालकाचे नाव असून त्याच्याविरोधात फिर्याद देण्यात आली आहे. समी कुरेशी हे आठवडा बाजार व्यापार करतात. कुरेशी यांच्याकडे टेम्पो भाडेपोटी किरण दांडगे यास 5 हजार रुपये देणे होते. समी हे चुलते हुसेन गुलाम सरवर यांच्यासमवेत चांदणी चौकात पैसे देण्यासाठी गेले.

त्यांनी 3 हजार रुपये दिले आणि राहिलेले दोन हजार रुपये पुढच्या भाड्यात देतो असे सांगितले. मात्र दांडगे याने आताच पैसे पाहिजे, खल्लास करून टाकतो, असे म्हणत मारहाण करण्यास सुरूवात केली. दांडगे याने कुरेशी यांना गंचाडून खाली पाडले आणि टेम्पो सुरू करून तो अंगावरून घालण्याचा प्रयत्न केला. त्यात कुरेशी यांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले असून छाती, डोक्यास मार लागला आहे. जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून कुरेशी यांनी पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी टेम्पो चालक किरण दांडगे याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या