Wednesday, April 24, 2024
Homeनगरशिक्षणवारीऐवजी आता शिक्षण उत्सवाचे आयोजन

शिक्षणवारीऐवजी आता शिक्षण उत्सवाचे आयोजन

नवनवीन प्रयोगाची देवाणघेवाण व गुणवत्ता विकासासाठी

संगमनेर (वार्ताहर) – राज्यात प्राथमिक शाळांचे रूपडे वेगाने बदलत असून, शिक्षणातील नवनवीन प्रयोगांची देवाणघेवाण व गुणवत्ता विकासासाठी सार्वत्रीकरण व्हावे, यासाठी या वर्षी तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर शिक्षण उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने सुमारे सव्वा तीन कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापूर्वी जिल्हा मुख्यालयाला जोडण्यात आलेल्या तालुक्याला वगळण्यात आले होते. त्या तालुक्याला जिल्ह्याला प्राप्त निधीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

- Advertisement -

गेले काही वर्षे राज्यात शिक्षणाच्या प्रक्रियेत वेगाने बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे.यासाठी विविध ठिकाणी शिक्षक आपापल्या स्तरावरती वेगळे प्रयोग राबवत आहेत. त्यातून गुणवत्ता विकासाचे चित्र उमटत आहेत. त्याबदलाचा वेध घेऊन राज्याच्या शिक्षणात गुणवत्ता साध्य व्हावी यासाठी युती सरकारने शिक्षण वारीचे आयोजन केले होते. त्याच धर्तीवर नव्या सरकारने शिक्षण उत्सवाचे आयोजन केले आहे.

मात्र या वेळी तालुका स्तरावर देखील शिक्षण उत्सवाचे आयोजन करण्याचे सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तालुकास्तरावर शिक्षण उत्सवाच्या माध्यमातून मांडण्यात येणार्‍या प्रयोगातून पहिले पाच प्रयोग जिल्हास्तरावर जाणार आहेत, तर जिल्हा स्तरावर होणार्‍या उत्सवातून केवळ दोन स्टॉल राज्य स्तरावरील शिक्षण उत्सवात सहभागी होतील .या नियोजनासाठी तालुका स्तरावर 50 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे, तर जिल्ह्यासाठी तीन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

तथापि यापूर्वी जिल्हा मुख्यालयात संलग्न असलेला तालुका तालुकास्तरीय उत्सवातून वगळण्यात आला होता. त्या तालुक्याला कोणताही निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नव्हता, मात्र आता जिल्ह्याला उपलब्ध होणार्‍या एकूण निधीतून प्रत्येक तालुक्यात असणार्‍या शाळांच्या कमीअधिक प्रमाण ही बाब लक्षात घेऊन काही निधी जिल्हा मुख्यालयाच्या तालुक्याला उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे त्या तालुक्यातील शिक्षकांनाही तालुकास्तरीय उत्सवात सहभागी होता येणार आहेत.

शिक्षण उत्सवात सहभागी होणार्‍या स्थळ साठी काही निकष राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने दिले आहेत. त्यांनी कशाच्या आधारे स्टॉलची निवड करावयाचे आहेत.

शिक्षण उत्सवात हे होतील सहभागी
तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर आयोजित होणार्‍या या शिक्षण उत्सवात त्या त्या तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासोबत विविध व्यवस्थापनातील शाळा, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती आदी सह लोकप्रतिनिधी सहभागी होऊ शकणार आहेत.यापूर्वी विभाग व राज्य स्तरावर होणार्‍या वारीमुळे अनेक शिक्षकांना सहभागी होता येत नव्हते. नवनवीन तंत्रज्ञान व गुणवत्तेचे प्रयोग नजरेस न आल्यामुळे अनेकदा सर्जनशीलतेने प्रयोग करण्यास अनेकांना अडचणी येत होत्या. मात्र यावर्षी तालुका ,जिल्हा व राज्य स्तरावरती शिक्षण उत्सवाचे आयोजन झाल्यामुळे सर्वांनाच या नावीन्यपूर्ण प्रयोगाचे दर्शन घडणार आहे.

शिक्षण उत्सवात हे असतील विषय
या वर्षी होणार्‍या शिक्षण उत्सवासाठी स्वच्छ शाळा, घनकचरा व्यवस्थापन, मासिक पाळी व्यवस्थापन, आरोग्य शिक्षण, पिण्याचे पाणी हात धुणे, शालाबाह्य मुलांची शोध व उचित कार्यवाही, वाचन चळवळ, मूल्यमापनात तंत्रज्ञानाचा उपयोग ,मध्यान्ह भोजन योजना, किचन गार्डन, जीवन कौशल्य, ज्ञानरचनावाद, भाषा, गणित ,इंग्रजी, विषयातील विविध प्रयोग, कला-क्रीडा शारीरिक शिक्षण, कार्यानुभव या विषयातील नवीन प्रयोग , बालकाचा हक्क व बालकाचे सुरक्षितता, पटनोंदणी वाढविण्यासाठीचे वेगळे प्रयोग, आदी विषयाचे स्टॉल उपलब्ध असणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या