Friday, April 26, 2024
Homeनगरशिक्षक पदे भरणार

शिक्षक पदे भरणार

संगमनेर (वार्ताहर)- राज्यातील जिल्हा परिषदेमधील मागासवर्गीय शिक्षकांची रिक्तपदे भरण्याबाबतची कार्यवाही मंत्रालय स्तरावरती सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती राज्याच्या ग्रामविकास विभागाने तात्काळ मागविली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील प्राथमिक शिक्षकांची मागासवर्गीय संवर्गातील रिक्त असलेली शंभर टक्के भरली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची पदे 2019 मध्ये पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात आली आहेत. तथापि जिल्हा परिषदेतील मागासवर्गीयांसाठी रिक्त असलेल्या पदांमधील केवळ मराठी माध्यमांची 50 टक्के प्राथमिक शिक्षकांची पदे भरण्यात आली आहेत. ही पदे भरताना जिल्हा परिषदेमध्ये बिंदुनामावली अद्यावत नसल्याचे निदर्शनास आले होते.

- Advertisement -

शिक्षकांच्या पदांचे अनुषंगाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत प्राथमिक शिक्षकांची मागासवर्गीय संवर्गातील उर्वरित 50 टक्के पदे भरण्याची कार्यवाही आठ दिवसात कमी करावी असे निर्देश देण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषद मध्ये मराठी माध्यमात करीता असलेली प्राथमिक शिक्षकांची बिंदुनामावली अद्यावत असण्याची आवश्यकता आहे.

त्यानुसार बिंदु नामावली अद्यावत असल्यास शासनाला तात्काळ कळविण्याची आदेशही देण्यात आले आहेत. बिंदुनामावलीनुसार प्रवर्गनिहाय मागासवर्गीयांची प्रत्यक्षात किती पदे रिक्त आहेत. याचा प्रवर्गनिहाय तपशील तात्काळ सादर करण्याची विनंती ग्रामविकास विभागाच्या कक्ष अधिकार्‍यांनी राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे.

राज्यातील अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सदरची माहिती कळविण्याचे सांगण्यात आले आहे.

लवकरच भरतीची शक्यता
राज्यातील 21 जिल्हा परिषदांची बिंदुनामावली पवित्र पोर्टलद्वारे भरती करताना अद्यावत नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यावेळी 50 टक्केच पदे भरण्यात आली होती. तथापि रिक्त असलेल्या पदांची माहिती घेऊन व बिंदुनामावली अद्यावत करून गुरुवार दिनांक 20 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मंत्रालय स्तरावर माहिती सादर करण्याचे निर्देशित करण्यात आले होते. त्यामुळे संबंधित जिल्हा परिषदांमधील बिंदुनामावलीनुसार मागास प्रवर्गातील जी पदे रिक्त आहेत ती तात्काळ भरली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. सदरची माहिती तात्काळ सादर करण्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे ही प्रक्रिया गतीने होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या