Thursday, April 25, 2024
Homeनगरटाकळीभान : मामाच्या प्रकृतीत सुधारणा तर भाच्याचा विहिरीत बुडून मृत्यू

टाकळीभान : मामाच्या प्रकृतीत सुधारणा तर भाच्याचा विहिरीत बुडून मृत्यू

टाकळीभान येथील मामा भाच्याचे वाद प्रकरण

टाकळीभान (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे मामा भाच्यात सोमवारी झालेल्या किरकोळ वादातून मामाने भाच्यादेखत विषारी किटकनाशक पिले तर या घटनेने घाबरलेल्या भाच्याने 70 फूट खोल विहिरीत उडी घेतल्याची घटना घडली. घटनेनंतर मामाला तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी काल मंगळवारी सकाळी भाच्याचा विहिरीत शोध घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आहे.

- Advertisement -

टाकळीभान येथील नवनाथ वेणूनाथ खंडागळे ( वय 30) व वडिलांचे छत्र हरपलेला त्याचा भाचा पंकज (मनोज) चव्हाण (वय 22) हे गेली काही वर्ष टाकळीभान येथे वास्तव्यास आहेत. खंडागळे यांनी बहिणीला त्यांच्या जमिनीतील काही जमीन दिलेली आहे. त्यामुळे दोघेही मामा भाचे शेतीच करीत होते. सोमवारी दुपारी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान शेतातच मामा भाच्यात कोणत्या तरी कारणावरून वादावादी झाली. दोघांतील या वादात मामाने शेतात घासाच्या फवारणीसाठी आणलेले विषारी किटकनाशक पिले. हे बघून घाबरलेल्या भाच्यानेही पळत जाऊन जवळच असलेल्या विहिरीत उडी मारली.

ग्रा.पं.सदस्य कान्होबा खंडागळे यांनी सोमवारी सायंकाळी विहिरीत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते. काल मंगळवारी सकाळी पो.हे.कॉ. रवींद्र पवार यांनी जलतरणपटू पोलीस मित्र रावसाहेब बनकर यांना मदतीला घेऊन पुन्हा शोधमोहीम हाती घेतली होती. बनकर हे लोखंडी गळाच्या साहाय्याने विहिरीच्या तळाशी शोध घेत होते.

अखेर एक ते दीड तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह गळाला अडकला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीरामपूर येथे पाठविण्यात आला. मंगळवारी सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकूल वातावरणात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि.मसुद खान यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळीभान दूरक्षेत्राचे पो.हे.कॉ. रवींद्र पवार पुढील तपास करीत आहेत. पोलीस सहाय्यक बाबा सय्यद, कान्होबा खंडागळे, रघुनाथ शिंदे, मयुर पटारे, गणेश कोकणे, विजू शिंदे व तरुणांनी यावेळी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या