Thursday, May 9, 2024
Homeनगरटाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीत मुरकुटे व विखे गटाच्या युतीची शक्यता

टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीत मुरकुटे व विखे गटाच्या युतीची शक्यता

टाकळीभान – श्रीरामपूर तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणार्‍या टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यावेळी निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे व आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाची युती होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.
ग्रामपंचायत सदस्यांची मुदत 31 ऑगस्ट 2020 रोजी संपत असून करोनामुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व गटाचे पुढारी मास्क लावून मदत करुन जनतेशी संपर्क ठेवत आहेत.

विधानसभा निवडणुकीपासून माजी आमदार भानुदास मुरकुटे व भाजपचे आ. राधाकृष्ण विखे पाटील हे श्रीरामपूर तालुक्यात कार्यकर्त्यांच्या बैठका बरोबर घेत असून गरजू व जनतेला किराणा माल व धान्याचे वाटपही केले जात आहे. तालुक्यातील विकास काम व इतर महत्वाच्या धोरणाविषयी हे दोघे एकत्र बसून निर्णय घेत आहेत. त्यामुळे टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीतही युती होेण्याची शक्यता अनेकांकडून वर्तविली जात आहे. करोना प्रादुर्भावामुळे घरीच बसलेल्या जनतेला या दोघांच्या संघटनेतील कार्यकर्ते एकत्र कार्यक्रम घेऊन मदत करुन धीर देत आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायती, सोसायटीच्या निवडणुका व अशोक कारखान्याच्या निवडणुकीतही यांची युती राहणार आहे, अशी चर्चा सुरु आहे.

- Advertisement -

करोनामुळे निवडणुका लांबल्या तरी कधी ना कधी होणारच आहे. त्यामुळे आतापासूनच ग्रामपंचायतीमध्ये आपल्या पॅनेलचे उमेदवार ठरविण्यासाठी गुप्त बैठका घेतल्या जात आहेत. येथील ग्रामपंचायतीची निवडणूक यावेळी चुरशीची होणार असल्याने स्थानिक पुढारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रथमच सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ व्यक्ती, कर्मचारी व अधिकारी यांना वाढदिवस विचारुन साजरा करीत आहेत. वाढदिवसाचे फोटो सोशल मिडीयावर टाकून जनतेला खुश करीत आहेत. यापूर्वी त्यांचा वाढदिवस घरातील व्यक्तींनी साजरा केला नाही पण निवडणूक होणार असल्याने सामान्य व्यक्तींचे वाढदिवस साजरे करण्यासाठी केक कापला जात आहे.

आपल्या गटाचा सरपंच होण्यासाठी कान्हा खंडागळे, मंजाबापू थोरात, राहुल पटारे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष मयुर पटारे, प्राचार्य जयकर मगर, राजेंद्र नानासाहेब कोकणे, भाऊसाहेब नानासाहेब पवार, भारत भवार यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र अनुसूचित जातीची महिला अथवा आदिवासी महिला यांची सोडत सरपंचपदासाठी निघाली तर त्या गटाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीत सरपंच व उपसरपंचपद कोणाला द्यायचे हे ठरवतील.

या निवडणुकीत नेहमीप्रमाणे संघटनेचे प्रमुख पॅनलचे नेतृत्व करतील. निवडणुकीत भाजप व शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असेल. कारण या पक्षाच्या स्थानिक प्रमुख कार्यकर्ते व इतर कार्यकर्त्यांनी करोनाच्या लॉकडाऊनमध्ये घरोघरी जाऊन मदत केली. शिवसेनेचे दादासाहेब कोकणे व भाजपचे नारायण काळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन किराणा माल व धान्याचे वाटप केले जात आहे.

सदस्यांतून ‘सरपंच होण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरु
ठाकरे सरकारने लोकनियुक्त सरपंच निवड रद्द करुन ग्रामपंचायत सदस्यातून सरपंच होईल असे जाहीर केल्याने टाकळीभान येथील पुढारी व कार्यकर्त्यांनी आपल्या गटाचा सरपंच व उपसरपंच होण्यासाठी आतापासून कोणत्या वॉर्डात विरोधी कोणाला उभे करावे याविषयी चाचपणी सुरु केली आहे. तालुक्यात टाकळीभान ग्रामपंचायत मोठी समजली जात असून ग्रामपंचायतीस जिल्हा परिषदेचा व राज्य शासनाचा इतर योजनांचा निधी अधिक मिळत असून ग्रामपंचायतीचा सरपंच होण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

सरपंचपद आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष
सरपंचपदाचे आरक्षण इतर मागासवर्गीय व्यक्ती, अनुसूचित जातीची महिला व आदिवासी महिला यापैकी एक सोडतीमध्ये निघणार असल्याने सर्व गटाच्या पुढार्‍यांचे आरक्षणाकडे लक्ष आहे. इतर मागासवर्गीय व्यक्ती निघाल्यास ‘कुणबीचा’ दाखला कोणाकडे आहे याची माहिती घेऊन त्यांच्या वॉर्डात आतापासून मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरु झाले आहे. सरपंचपद मिळाले पाहिजे व जर सरपंच होता आले नाही तर मोठ्या उपसरपंचपद मिळाले तरी चालेल यासाठी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या