Thursday, April 25, 2024
Homeनगरटाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आघाडीचा ‘गुंता’ गुंतागुंतीचा

टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आघाडीचा ‘गुंता’ गुंतागुंतीचा

कट्ट्यावर आघाड्यांबाबत काथ्याकूट

टाकळीभान (वार्ताहर)- तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीची निवडणूकपूर्व तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत बाकी असली तरी प्रभाग आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांच्या जोर बैठका सुरू झाल्या आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बरेच पाणी पुलाखालून गेल्याने निवडणुकीत आघाड्या करण्याचा ‘गुंता’ गुंतागुंतीचा झाल्याने आघाड्या कशा होतील याबाबत सर्वसामान्य मतदार कट्ट्यावर बसून काथ्याकूट करताना दिसू लागला आहे.

- Advertisement -

टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीला सुमारे चार महीन्यांचा अवधी असला तरी यंदा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. प्रभाग आरक्षण जाहीर झाल्याने त्या-त्या प्रभागातील इच्छुकांनी व विद्यमान सदस्यांनी संपर्क वाढविला आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मुरकुटे गटाचे अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, माजी सरपंच मंजाबापू थोरात व ससाणे गटाचे माजी सभापती नानासाहेब पवार यांनी आघाडी करून 11 जागा जिंकत सत्ता हस्तगत केली होती.

तर ससाणे गटाचेच स्व. भाऊसाहेब दाभाडे व अ‍ॅड. सर्जेराव कापसे यांनी 6 जागा जिंकल्या होत्या. कालांतराने स्व. भाऊसाहेब दाभाडे गटाने माजी सभापती पवार यांच्याशी जुळवून घेतल्याने अ‍ॅड. कापसे गट पवारांपासून बाजूला गेला. पवार व साळुंके, थोरात यांनी दोन्ही गटांना समान संधी मिळण्यासाठी अडीच अडीच वर्षांसाठी सत्तेचे वाटप केले. मात्र, पवार यांनी पूर्ण पाच वर्षे सरपंच पद स्वतःच्या गटाकडेच ठेवल्याने या आघाडीतून नाराजीचा सूर अनेकवेळा बाहेर येताना दिसला आहे.

गेली अनेक वर्षे टाकळीभान ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी मुरकुटे गटाला अपयश आलेले आहे. टाकळीभानच्या संघटनेला सत्तेची पदे देऊनही ते आजवर शक्य झालेले नाही. त्यामुळेच तरुणांची फळी उभी करून ग्रामपंचायतीवर झेंडा लावण्यासाठी मुरकुटे यांनी विद्यमान ग्रा.पं. सदस्य कान्होबा खंडागळे यांना लोकसेवा विकास आघाडीत घेऊन शेकडो तरुणांचा प्रवेश करून घेतला. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सवता सुभा उभा करून एकहाती सत्ता घेण्याचे मनसुबे मुरकुटे गटाचे स्थानिक नेते करत आहेत. तसे झाल्यास माजी सभापती नानासाहेब पवार यांना आघाडीसाठी मित्र शोधावा लागणार आहे.

पवार विखेंसोबत भाजपात गेलेले असले तरी स्थानिक भाजपा कार्यकर्ते त्यांच्याशी जुळवून घेण्यापेक्षा निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार देणार असल्याचे सांगत प्रभागा-प्रभागांत संपर्क वाढवत आहेत. गेल्या दोन तीन वर्षांपासून सामान्य नागरिकांना रेशनकार्ड, उज्ज्वला गॅस, विधवा अनुदान, संजय निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याने तळागाळात त्यांचा संपर्क वाढला आहे. मतदार त्यांना सत्तेच्या दारात घेऊन जातील अशी त्यांची अपेक्षा आहे.

तर पवारांच्या विखेंशी असलेल्या संबंधामुळे काँग्रेस पक्षाचे ना. बाळासाहेब थोरात समर्थक विद्यमान ग्रा.प.सदस्य भारत भवार कोणाशी आघाडी करणार हा गुंताही अजून कायम आहे. एकेकाळचे पवार यांचे कट्टर समर्थक राजेंद्र कोकणे गेल्या अनेक दिवसांपासून पवारांपासून दुरावलेले आहेत. ते ही सवता सुभा करण्याच्या विचारात असल्याचे दिसून येते. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब कोकणे हे वेट अ‍ॅन्ड वॉचच्या भूमिकेत आहे. निवडणुकीतील आघाडीविषयी ते अद्याप स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मयुर अशोकराव पटारे हे निवडणुकीच्या तयारीला लागले असून त्यांनीही तरुणांच्या मदतीने संपर्क वाढविला आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बरेच पाणी पुलाखालून गेले आहे. माजी सभापती नानासाहेब पवार हे कट्टर विखे समर्थक म्हणून सर्वश्रूत आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर विखे यांनी पक्षांतर केल्याने पवारही त्यांच्या सोबत गेले. विधानसभा निवडणुकीत आ.विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची तालुक्यात युती झाली. टाकळीभानमध्ये मात्र पवारांनी ऐनवेळी काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन विखे-मुरकुटे यांच्या विरोधात स्थानिक यंत्रणा उभी केली. त्यामुळे विखे व मुरकुटे हे दोन्ही नेते काहीसे दुखावले गेले. तर स्थानिक आघाडीतही नाराजीची भावना पसरली.

सध्यातरी कोणीही आघाडी करण्यासाठी पुढे येत नसल्याने तीन पेक्षा अधिक पॅनल होण्याची परिस्थिती दिसून येत आहे. आघाडी करणे प्रत्येक स्थानिक गावपुढार्‍यांना गुंतागुंतीचे वाटत असल्याने हा गुंता आणखी काही दिवस असाच राहणार आहे. तरी सामान्य मतदार कोण-कोणाशी व कशी आघाडी करील याबाबत चहाच्या कट्ट्यावर व पारावर काथ्याकूट करत आहे. निवडणुकीला अद्याप अवधी असला तरी वातावरण तापू लागल्याने निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित.

- Advertisment -

ताज्या बातम्या