Saturday, April 27, 2024
Homeनगरराहात्याच्या नायब तहसीलदारांना गाडी अडवून दमदाटी

राहात्याच्या नायब तहसीलदारांना गाडी अडवून दमदाटी

हनुमंतगावच्या वाळू तस्कराविरोधात गुन्हा

लोणी (वार्ताहर)- वाळू तस्करी करणार्‍या झेनॉन गाडीला सोडवण्यासाठी लोणी-पाथरे रस्त्यावर बुधवारी मध्यरात्री राहात्याच्या नायब तहसीलदारांच्या गाडीला इंडिका गाडी आडवी लावून हनुमंतगावच्या वाळू तस्कराने दमदाटी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने लोणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान आरोपी साजिद शेखसह त्याचे तीन साथीदार फरार झाले आहेत.

- Advertisement -

प्रवरा नदीपात्रातून राजरोसपणे वाळू तस्करी करणारांना महसूलच्या अधिकार्‍यांना दमदाटी करण्याची ही पहिलीच घटना आहे. सोनगाव, सात्रळ, पाथरे बुद्रुक, हनुमंतगाव येथून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा अनेक वर्षांपासून सुरू आहे. रात्रीच्या वेळी येथून जाणार्‍या लोणी, प्रवरानगर, दाढ, कोल्हार या रस्त्यांवर वाळू तस्करांचेच राज्य असते. मात्र बुधवार दि.15 रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास राहात्याचे निवासी नायब तहसीलदार भाऊराव गोपाळ भांगरे हे बोलेरो एमएच 17एजे 6113 वाहनातून गस्त घालीत लोणी-हनुमंतगाव रस्त्याने जात होते.त्याचवेळी वाळू घेऊन जाणारी झेनॉन त्यांना दिसली.

त्यांनी तिचा पाठलाग सुरु केला.झेनॉन पाथरे रस्त्याने निघाल्यावर इंडिका एमएच 12 जीबी 3212 यातून काहीजण आले आणि त्यांनी तहसीलदारांच्या गाडीला कट मारला.त्यामुळे तहसीलदारांची बोलेरो रस्त्याच्या खाली जाऊन मैलाच्या दगडाला घासली.गाडीच्या पायरीचे नुकसान झाले. त्यांनी पुन्हा झेनॉनचा पाठलाग सुरु केला असता सदर इंडिका गाडीतून आलेल्या साजिद शेख व त्याच्या साथीदारांनी बोलेरोच्या दरवाजाला धक्का दिला व पुढे जाऊन गाडी आडवी लावली.तहसीलदार व त्यांच्या सहकार्यांना शिवीगाळ,दमदाटी केली.वाळू तस्करी करणार्‍या झेनॉनला पळून जाण्यास मदत केली.

इतरांना फोन करून बोलावून घेतले व गैरकायद्याचे लोक जमा करून दहशत निर्माण केली.याप्रकरणी नायब तहसीलदार भाऊराव भांगरे यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी गुरुवारी पहाटे गुन्हा रजी. क्र.25/20 भादंवि.कलम 353,427,504,507,34 प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी पसार आहेत. ही घटना घडूनही या भागातील वाळू तस्करीवर काहीच परिणाम झाला नसून तो होणारही नाही असे जाणकारांचे मत आहे.

मुळा नदी पात्रात महसूल पथकाच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न

जेसीबी व दोन डंपरवर कारवाई; पंधरा लाखांच्या दंडाचे आदेश

पारनेर (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील देसवडे येथील मुळा नदी पात्रात गुरुवारी सकाळी अवैध वाळू उपसा प्रकरणी कारवाई करण्यासाठी तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह महसूल विभागाच्या पथकाच्या अंगावर व वाहनावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. या कारवाईत जेसीबी व दोन डंपरवर कारवाई करण्यात आली असून जेसीबीवर 7 लाख 50 हजार तर दोन डंपर मालकांना 8 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.

पारनेर तालुक्यातील मुळा नदी पात्रातील पोखरी, मांडवे खुर्द, देसवडे, नागपुरवाडी, वनकुटा व काळू नदीपात्रातून जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांना समजली. त्यावरून गुरुवारी सकाळी अकरा वाजता शासकीय वाहनांचा वापर न करता येथे जाऊन वाळू चोरी करताना एक जेसीबी व तीन डंपर वाळूने भरलेले पकडले. या तीन डंपर पैकी एक डंपर पथकाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करुन पळवून नेण्यात आला.

या महसूल विभागाच्या पथकात मंडलाधिकारी सचिन पोटे, मंडलाधिकारी दीपक कदम,अमोल मंडलिक,कॉन्स्टेबल मोरे, शिंदे हे होते. घटनास्थळावर पंचनामा करण्यात आलेला असून जे 2 डंपर जागेवर पकडण्यात आले आहे त्या गाड्यांमध्ये 8 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.या अवैध वाळू उपसा कारवाई करण्यात आलेल्या जेसीबी मालकाला 7 लाख 50 हजार दंड व दोन वाहनांच्या मालकांना 8 लाख दंड असा 15 लाख 50 हजार रुपये दंडाचा आदेश पारित करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे।
यापुढील काळात मुळा ,काळू ,मांडओहोळच्या,कुकडी नदी पात्रात अवैध वाळू उपसा विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे तहसीलदार देवरे यांनी यावेळी सांगितले.

कारवाईसाठी पिकअपचा वापर
महसूल विभागाच्यावतीने कारवाईसाठी शासकीय वाहनांचा वापर केला तर वाळू तस्करांकडून पाठलाग करून कारवाईचा फुसका बार होतो. त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी गुरुवारी मुळा नदी पात्रात अवैध वाळू उपसा कारवाईसाठी पिकअपचा वापर केला. तहसीलदार देवरे यांनी कारवाईसाठी संशय न येणार्‍या खाजगी वाहनांचा वापर सुरू केल्याने वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत.

तहसीलदारांची कसून चौकशी

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)- पाथर्डी येथील उपविभागीय कार्यालयात शेवगाव येथील तहसीलदार विनोद भामरे यांनी महिला कर्मचार्‍यांशी केलेल्या असभ्य वर्तनाच्या प्रकरणातील तक्रारदार व भामरे यांची चौकशी समितीकडून गुरुवारी दिवसभर चौकशी करण्यात आली. पाथर्डी येथील नगर रोडवरील माळीबाभुळगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयात दिवसभर कॅमेर्‍यासमोर तक्रारदार व आरोप असणारे तहसीलदार विनोद भामरे यांचे जबाब समितीने नोंदविले आहेत. शेवगाव येथील तहसीलदार विनोद भामरे यांनी कार्यालयातील महिला कर्मचारी, तलाठी यांना कामाच्या निमित्ताने बोलवून घेऊन त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. तहसिलदारावर कारवाई करावी यासाठी कर्मचार्‍यांच्या पालकांनी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचीही भेट घेतली आहे.

याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी समिती नेमली असून चौकशी सुरु झाली आहे. निवडणुक विभागाचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाच महिला सदस्यांची समिती गुरुवारी पाथर्डीच्या प्रांताधिकारी कार्यालयात आली. तिथे शेवगाव तहसिल कार्यालयातील सर्व लिपीक, अव्वल कारकुन, मंडलअधिकारी व तलाठी यांच्या साक्ष कॅमेर्‍यासमोर नोंदविण्यात आल्या. ज्यांच्यावर आरोप आहे ते विनोद भामरे यांचीही साक्ष नोंदविण्यात आल्याची माहीती आहे. समिती जिल्हाधिकारी राहुल व्दीवेदी यांच्याकडे चौकशी अहवाल सादर करील. त्यानंतर कारवाई बाबतचा निर्णय होईल. पाथर्डीच्या तलाठी संघाने व महसुल कर्मचारी संघटनेने शेवगावच्या संघटनेला पाठींबा व्यक्त केला असून कामबंद करण्याचे अंदोलन सुरु केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या