24 तबलिगींना 7 दिवसांची पोलीस कोठडी

24 तबलिगींना 7 दिवसांची पोलीस कोठडी

कोरोनाचा संसर्ग : तिघा स्थानिकांना न्यायालयीन कोठडी

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना पॉझिटिव्ह असतानाही जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या ठिकाणी जाण्याचा तबलिगींचा उद्देश काय?, त्यांना निवारा व अर्थसहाय्य कोणी केले याचा तपास आता नगर पोलिसांनी सुरू केला आहे. नगर पोलिसांच्या अहवालामुळेच अटक केलेल्या 24 तबलिगींना कोर्टाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. स्थानिक तिघांना मात्र कोर्टाने न्यायालयीन कोठडी दिली.

दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजमधील कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर 29 विदेशी नागरिक जिल्ह्याच्या विविध तालुक्यांत पोहचले. नगर पोलिसांनी ही बाब उघडकीस आणल्यानंतर त्यातील काही कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले. पर्यटन व्हिसाचे तसेच साथ रोग अधिसुचनेचे उल्लंघन केले म्हणून 29 परदेशींसह 6 स्थानिकांविरोधात नेवासा, जामखेड, भिंगार पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. या सगळ्या गुन्ह्यांचा तपास नगर एलसीबी पोलीस करत आहेत. जामखेडमधील 12 (त्यात 3 भारतीय), नेवाशातील 9, मुकुंदनगरमधील 8 अशा 24 विदेशी व तीन स्थानिक अशा 27 जणांची शुक्रवारी रात्री हॉस्पिटलमधून सुटका झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.

अटकेतील या सगळ्यांना शनिवारी नगरच्या कोर्टासमोर हजर केले. त्यावेळी पोलिसांनी कोर्टासमोर अनेक संशयास्पद असलेला रिपोर्ट सादर केला. त्यानुसार कोर्टाने 24 विदेशी नागरिकांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी तर तिघा स्थानिकांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावलेले तिघे भारतीय हे गुजरातमधील आहेत. त्यांच्या जामिनासाठी लगेचच अर्जही दाखल करण्यात आला. मात्र कोर्टाने त्यांचा जामीन नामंजूर केला. नगरच्या सबजेलमध्ये जागा नसल्याने या तिघांना पारनेर सबजेलमध्ये पाठविण्यात आले आहे.

नेवाशात दहा तर शेवगावात आठ दिवसांचा मुक्काम
31 जानेवारीपासून देशात प्रवेश झालेले हे विदेशी जिल्ह्यात आले आहेत. यातील एक सोडला तर बाकी सगळेच दिल्लीच्या विमानतळावर उतरले. एक मात्र 2 मार्चला मुंबईत उतरला. त्यानंतर हे सगळे एकत्रित नगरला आले. मुकुंदनगरमधील प्रार्थनास्थळामध्ये 8 व 9 मार्चला मुक्काम केला. 10 ते 11 मार्च अमरापूर, 12 ते 19 मार्च शेवगाव आणि 20 ते 30 मार्च या काळात दहा तबलिगी नेवासा येथे वास्तव्यास असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

पोलीसांना हवे आहे याचे उत्तर
कोणाच्या सांगण्यावरून हे आरोपी नेवासा येथे गेले, कोणाच्या सांगण्यावरून एकत्र आले, एकत्र येण्यामागे उद्देश काय?, परदेशी नागरिकांनी स्वत: हून माहिती द्यावी, असे आदेश असतानाही माहिती न देता ती लपविण्यामागे उद्देश काय?, राज्यात कोणाकोणाच्या संपर्कात आले आणि कोरोना संसर्ग असतानाही या कृत्यामागे उद्देश काय? असा प्रश्न उपस्थित करत नगर पोलिसांनी कोर्टाकडे पीसीआरची मागणी केली. कोर्टाने ती मान्य केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com