Friday, April 26, 2024
Homeनगर15 वर्षांपासून कुटुंबियांपासून दुरावलेल्या वृद्धेला भेटली हक्काची माणसं

15 वर्षांपासून कुटुंबियांपासून दुरावलेल्या वृद्धेला भेटली हक्काची माणसं

अकोले (प्रतिनिधी)– मागील सुमारे पंधरा वर्षांपासून घरापासून दुरावलेल्या महिलेचे काही महिन्यांपूर्वी एका अपघातात निधन झाल्याची माहिती तिचे कुटुंबियांना मिळाली. ती ग्राह्य धरून नातलगांनी तिचे श्राद्ध कर्मही केले आणि अचानक ती महिला जिवंत अवस्थेत परतली. सटाणा, इगतपुरी, अकोले येथील पत्रकारांनी पंधरा वर्षांपासून घरापासून दुरावलेल्या या वृद्धेला तिच्या कुटुंबात परत आणण्यात महत्वाची भूमिका बजावली, त्यामुळेच या लॉकडाऊनच्या काळातही तिला आपली हक्काची माणसं पुन्हा भेटली.

याबाबतचे अधिक वृत्त असे, विक्रम पानसलकर हे इगतपुरी येथील पत्रकार आहेत, त्यांच्या सटाणा येथील मित्राच्या घरी या आजी गेल्या होत्या. आजीची चौकशी केल्यानंतर आजीचे गाव हे अकोले – संगमनेर तालुक्यातील असल्याचे समजले. त्यामुळे आजीच्या कुटुंबाशी संपर्क करण्याच्या उद्देशाने त्यांनी सहकारी पत्रकार मित्र पांगरकर यांना फोन केला.

- Advertisement -

पांगरकर यांनी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे यशोधन कार्यालयात जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ यांचेशी संपर्क केला. संगमनेर तालुक्यात देखील त्यांना काही थांगपत्ता न लागल्याने त्यांनी दैनिक सार्वमतचे उपसंपादक व अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल वैद्य यांचेशी संपर्क साधून सदर आजीच्या कुटुंबियांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

अमोल वैद्य यांनी देखील तात्काळ चौकशी सुरु केल्यानंतर त्यांना अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरी यशवंत आभाळे यांच्याकडून या आजी कोकणवाडी येथील दूध संघाचे माजी संचालक स्व. हौशीराम जाधव यांच्या गावातील असाव्यात असा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार माजी आमदार वैभवराव पिचड संपर्क कार्यालयाचे बाळासाहेब साबळे यांना संपर्क केला, त्यानंतर साबळे यांनी गावचे माजी सरपंच बबन जाधव यांना फोन केला व माहिती घेतली, त्यानंतर साबळे यांनी जाधव यांच्यासह अमोल वैद्य यांना कॉन्फरसंवर घेतले.

त्यात पानसलकर यांचीही भर पडली. या आजी त्याच गावच्या असल्याचे स्पष्ट झाले. आजींच्या कुटुंबियांचा शोध लागला. इगतपुरी व सटाणा येथील पत्रकारांनी पोलिस व पत्रकार अमोल वैद्य यांचे मदतीने आजीला आपल्या हक्काची माणसे पुन्हा भेटली. श्राध्द उरकलेल्या आजीची पुन्हा झालेली भेट कुटुंबियांसाठी देखील सुखावह ठरली.

गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या परिवारापासुन दुरावलेली व गावोगाव भटकून मिळेल तिथे भाजी भाकरी खाऊन दिवस काढणार्‍या एका 60 वर्षीय वृद्ध महिलेस पत्रकारांच्या प्रयत्नांनी व इंदिरानगर पोलिसांच्या मदतीने पुन्हा सुखरूप आपले कुटुंब मिळाले आहे. विशेष म्हणजे कुटुंबियांनी अनेक वर्ष शोधाशोध केली मात्र तिचा कुठेही थांग पत्ता मिळेना. दुर्दैवाने ती एका अपघातात ठार झाल्याची चूकीची माहिती तीच्या परिवाराला समजताच भाऊबंद लोकांनी तीचे धार्मिक रीतिरिवाजा प्रमाणे श्राद्ध देखील उरकुन घेतले होते.

जिवंतपणी श्राद्ध घातलेल्या या वृद्धेस सटाणा येथील पत्रकार संजय खैरनार, इगतपुरी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विक्रम पासलकर, तसेच घोटी खुर्द पोलिस पाटील कैलास फोकने यांच्या अथक प्रयत्नाने पंधरा वर्षांनंतर आपले घर मिळाले आहे. या कामी संगमनेर येथील पत्रकार अनंत पांगरकर आणि अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल वैद्य यांचीही मदत मोलाची ठरली आहे.

नुसती दैनंदिन बातमीदारी न करता समाजाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका ही बजावण्याची देखील जबाबदारी पत्रकारांवर असते. आज कोरोना व्हायरस सारख्या जीवघेण्या परिस्थितीत जीव धोक्यात घालून प्रत्येक जण आपली पत्रकारिता प्रामाणिक पणे निभावत आहे. सामाजिक भान ठेवून आम्हीही एका वृद्ध महिलेस ती पंधरा वर्षांपासून आपल्या परिवरापासुन दूर होती. तिला तीचे घर परत मिळवून देण्याचा एक छोटा प्रयत्न केलेला आहे. एक पुण्यस्वरूप काम हातून झाल्याने मनस्वी आनंद होत आहे.
-विक्रम पासलकर, इगतपुरी

- Advertisment -

ताज्या बातम्या