Thursday, April 25, 2024
Homeनगरमुळा धरणातून आजपासून आवर्तन

मुळा धरणातून आजपासून आवर्तन

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय रविवारी (दि.10) नगरमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आज सोमवारपासून मुळाचे पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. दरम्यान, अधिकार्‍यांनी आवर्तनाचे योग्य नियोजन करत पाण्याचा वापर काटकसरीने करत टेलपर्यंत पूर्ण दाबाने पाणी पोहचेल यांचे नियोजन करण्याचे आदेश जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.

ना. गडाख यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत नगरमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिथीगृहात झालेल्या बैठकीत उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून रविवारपर्यंत 6 हजार 500 दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी वापरण्यात आले आहे. आवर्तन 47 दिवस सुरू असूनही पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील टेलच्या 500 हेक्टर क्षेत्र अद्याप ओलिताखाली आणायचे आहे.

- Advertisement -

आवर्तनाला गॅप न दिल्याने 650 दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होणार आहे. उजवा कालव्याचे आवर्तन 20 मार्चला सुरू केले होते. दुसर्‍या उन्हाळी आवर्तनासाठी चार हजार दशलक्ष घनफूट पाणी वापरण्यात येणार आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले आहे.तसेच अधिकार्‍यांनी आवर्तनाचे योग्य नियोजन करत टेलपर्यंत पाणी पूर्ण दाबाने पोहचेल, पाण्याचा वापर काटकसरीने करावा, आदी सूचना मंत्री गडाख आणि राज्य मंत्री तनपुरे यांनी दिल्या.

बैठकीला खा. सुजय विखे, आ. मोनिका राजळे, माजी आमदार पांडुरंग अभंग, मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, महावितरणचे कार्य अधीक्षक अभियंता सांगळे, सायली पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी गत आवर्तनाचा आढावा घेण्यात आला. मागीज आवर्तन सुमारे 50 दिवस चालले. यासाठी 6 हजार 450 दश लक्ष घनफूट पाणी वापर झाला. आता नवीन अवर्तनाला 4 टीएमसी पाणी धरणात पाणी शिलक असून त्यावर हे आवर्तन चालणार आहे. यात राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील लाभार्थी शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. शेतकर्‍यांची यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी होती, सर्वांना पाणी मिळावे, कुणीही वंचित राहू नये, पाण्याचा अपव्यय टाळावा याची बैठकीत चर्चा झाली. तसेच उजव्या कालव्याला असलेल्या लिकेजचा सर्व्हे करून अंदाजपत्रक सादर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या