Wednesday, April 24, 2024
Homeनगरसाखरेचा किमान विक्री दर 3500 रुपये करा

साखरेचा किमान विक्री दर 3500 रुपये करा

राज्य व देशातील साखर उद्योगाची केंद्रसरकारकडे मागणी

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) प्रति क्विंटल 3100 वरुन 3500 रुपये करावा अशी मागणी राज्यासह देशातील साखर उद्योगाने केंद्र सरकारकडे केली आहे. कोव्हिड 19 लॉकडाऊनमुळे साखरेची घटलेली मागणी, साखर निर्यातीवर व स्थानिक बाजारातील साखर विक्रीवर झालेला परिणाम साखर उद्योगाच्या आर्थिक ताळेबंदावर झाल्याने साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. हीच संधी पकडून राज्यातील व देशातील साखर उद्योगाशी निगडीत विविध संघटनांनी साखरेची एमएसपी वाढविण्याची केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.

- Advertisement -

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष कृषीरत्न बी. बी. ठोंबरे यांनी राज्याचे सहकारमंत्री व माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, साखर उद्योगाच्या समस्येबाबत नुकतेच नीति आयोगाचे सदस्य रमेशचंद यांचे अध्यक्षतेखालील टास्कफोर्स समितीने दिलेल्या रिपोर्टनुसार साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल 3100 वरून 3300 रुपये करणेसाठी शिफारस केलेली आहे. केंद्र सरकारही साखरेची एमएसपी वाढवण्याच्या विचारात आहे.सर्वाधिक साखर उत्पादन करणार्‍या उत्तर प्रदेश सरकारनेही साखरेची एमएसपी 3100 वरुन 3400 रुपये करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केलेली आहे.

महाराष्ट्र शासनानेही साखरेची एमएसपी प्रति क्विंटल 3100 वरुन 3500 रुपये करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी, असे साकडे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने शरद पवारांना घातले आहे.

सहकारी साखर कारखाना फेडरेशनची मागणी
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना फेडरेशनने संयुक्त सचिव (साखर) आणि सचिव (अन्न) यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांच्याकडे साखरेची एमएसपी वाढवण्याची मागणी केली आहे. एस-ग्रेड साखरेला प्रतिक्विंटल 3400 रुपये, सुपर एस-ग्रेड साखरेला प्रतिक्विंटल 3600 रुपये आणि एम-ग्रेड साखरेला प्रतिक्विंटल 3750 रुपये दर देण्याची मागणी केलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या