Friday, April 26, 2024
Homeनगरसाखरेची किमान आधारभूत किंमत 3450 रुपये करा- प्रकाश नाईकनवरे

साखरेची किमान आधारभूत किंमत 3450 रुपये करा- प्रकाश नाईकनवरे

साखर विश्व प्रतिष्ठानच्यावतीने ऑनलाईन व्याख्यानास प्रतिसाद

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- देशातील साखर उद्योग वाचविण्यासाठी साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) वाढ करून ती किमान 3450 रुपये प्रतिक्विंटल करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले. नेवासा येथील साखर विश्व प्रतिष्ठाणने राज्यातील साखर उद्योगातील अधिकारी व कामगारांसाठी ‘करोनाच्या विळख्यातील साखर उद्योग व नंतरचा प्रवास’ या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यान मालेत श्री.नाईकनवरे बोलत होते.

- Advertisement -

श्री. नाईकनवरे पुढे म्हणाले, मागील 2019-20 गाळप हंगाम उशिराने सुरू झाला होता. त्यात परतीचा पाऊस झाल्याने जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने ऊस तोडी लांबल्या. जानेवारी-फेब्रुवारी-मार्च महिन्यात हंगामाच्या मध्यापर्यंत ऊस गाळप, साखर उत्पादन, साखर उतारा व इथेनॉल पुरवठा या सर्वच पातळीवर चांगली परिस्थिती होती. हंगामाच्या सुरवातीला 145 लाख टन साखर शिल्लक होती.

राष्ट्रीय पातळीवरील संस्थांनी पाठपुरावा करून केंद्र सरकार कडून 60 लाख टन साखर निर्यात योजना मंजूर करून घेतली. सुदैवाने त्याच सुमारास जागतिक बाजारपेठेतील साखरेची मागणी-पुरवठ्यातील तफावत 100 लाख टनावर पोहचल्याने आंतरराष्ट्रीय दरात तेजी आली.साखर कारखान्यांनीही आपापल्या उद्दिष्टाप्रमाणे साखर निर्यातीचे करार केले.

त्याच दरम्यान देशात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्याने 22 मार्च पासून 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला. लॉक डाऊन सुरू होण्यापूर्वी देश पातळीवर तब्बल 38 लाख टन साखर निर्यातीचे करार झालेले होते. त्यापैकी जवळ जवळ 28 लाख टन साखर निर्यात सुद्धा झाली. करोना मुळे करार होऊनही सुमारे 10 लाख टन साखर कारखाना, रस्त्यात व बंदरात अडकून पडली. त्यातच तेलाची प्रति बॅरल 65 डॉलर वरून 22 डॉलर पर्यंत घसरण झाली. जागतिक साखर उत्पादनात अग्रेसर असलेल्या ब्राझीलने इथेनॉल निर्मिती कमी करून साखरेंचे उत्पादन वाढविण्याचे ठरविल्याने साखरेचे आंतरराष्ट्रीय दर झपाट्याने कोसळले. या सर्व घडामोडीमुळे नवे साखर निर्यात करार थांबले.

भारताला यंदा साखर निर्यातीचा नवा विक्रम प्रस्थापित करण्याची व त्याव्दारे 50 ते 55 लाख टन साखर साठा मोकळा करण्याची सुवर्णसंधी आली होती मात्र अत्यन्त मोक्याच्या वेळी आलेल्या कोरोना विषाणूच्या जगव्यापी संकटाने ही संधी हुकलेली आहे. तर दुसरीकडे उन्हाळ्यातील थंड पेय-थंड पदार्थ यासाठीची साखर मागणीच गायब झाली. या सर्व घटना एका पाठोपाठ एक वेगाने घडत गेल्याने संपूर्ण साखर उद्योग चक्रावून गेला.त्यात ऊस तोड, ऊस वाहतूक, साखर वहातुक, इथेनॉलचा वापर यावर कर्फ्युमुळे बंधने आली.

या सर्व घडामोडीत साखर कारखान्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटून गेली आहे. चलन पुरवठा बंद असल्याने ऊसाची बिले, कामगारांचे पगार, व्यापारी देणी या खर्चावर प्रश्न चिन्ह उभे राहिलेले आहे.रिझर्व्ह बँकेने कर्जाचे होत्याना 3 महिन्याची मुदत वाढ दिली असली तरी दैनंदिन खर्चासाठी हाती पैसाच शिल्लक नाही.नवा हंगाम 5 महिन्यांवर येऊन ठेपला आहे.

मशनिरी दुरुस्ती-देखभालीचे कामे वेळेत पूर्ण न झाल्यास हंगाम लांबणीवर जाऊन त्यांचा परिणाम ऊस तोडी वर होणार आहे. त्यासाठी साखर उद्योग लॉक डाऊन मधून वगण्याची गरज आहे. साखर उद्योगाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील संस्थांचे प्रयत्न सुरूच आहेत. नुकत्याच काही महत्वाच्या मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे करण्यात आलेल्या आहेत असेही श्री.नाईकनवरे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या