Thursday, April 25, 2024
Homeनगरनगरी मातीत साहित्य पर्व.. विद्यार्थी सर्व..

नगरी मातीत साहित्य पर्व.. विद्यार्थी सर्व..

विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन । ‘मसाप’चा उपक्रम ।

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरात पहिल्यांदाच विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मसपाच्या सावेडी शाखेने त्यासाठी पुढाकार घेतला असून नरेंद्र फिरोदिया यांच्याकडे स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती जयंत येलुलकर यांनी दिली.

- Advertisement -

महाराष्ट्र साहित्य परिषदेची सावेडी शाखा आणि शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून हे संमेलन आयोजित केले आहे. गुरूवारी (दि.27) न्यू टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे एक दिवसीय विद्यार्थी साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष व मसाप सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष नरेंद्रजी फिरोदिया यांनी दिली.

जेष्ठ बालसाहित्यिक व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ल. म. कडू हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत. आ. संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, श्रीमती आशाताई फिरोदिया, डीवायएसपी संदिप मिटके, मनपा उपआयुक्त डॉ. प्रदीप पठारे, साहित्यिक प्रा. सु. प्र. कुलकर्णी, डॉ. संजय कळमकर, प्रा. शशिकांत शिंदे, शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, रमाकांत काटमोरे, सुभाष पवार हे प्रमुख विद्यार्थी साहित्य संमेलनात सहभागी होणार आहेत.

ग्रंथ पूजन, उद्घाटन, लेखक तुमच्या भेटीला, बालनाट्य सर्धेच्या अंतिम फेरीत अभिनयाचे रौप्यपदक मिळविणारी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावची पहिली विद्यार्थिनी कलावंत मुग्धा घेवरीकर ही ‘पिंटी’ या शेतकर्‍यांच्या मुलींचे भावविश्व साकारणारे एकपात्री प्रयोग सादर करणार आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून राज्यभर सुंदर हस्ताक्षरासाठी कौतुक झालेली राहुरीच्या जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीमधील विद्यार्थिनी श्रेया गोरक्षनाथ सजन हिचा या संमेलनात विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे कविता व कथाकथनाचे सादरीकरण, बक्षीस वितरण व समारोप अशा भरगच्च साहित्य मेजवानीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मसाप सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह व संमेलनाचे संयोजक जयंत येलूलकर यांनी दिली.

विद्यार्थी साहित्य संमेलनानिमित्त विविध शाळेमधून इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 7 वी ते 10 वी या दोन गटात कथाकथन, निबंध लेखन व काव्यवाचन या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. विजेत्या स्पर्धांकांना या संमेलनात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या संमेलनात विविध शाळेतील विद्यार्थी, साहित्यिक, साहित्य प्रेमी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी केले आहे.

विदयार्थी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी मनपा शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक जे.एन.पठाण, समन्वयक अरुण पालवे, शारदा होशिंग, स्नेहल उपाध्ये, अरुण पवार, दिपाली देऊतकर, कार्तिक नायर, अनिरुद्ध तिडके परिश्रम घेत आहेत.

‘अभिजात’साठी ठराव
मराठी भाषा अधिक समृद्ध व्हावी यासाठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असा ठराव विद्यार्थी साहित्य संमेलनात घेतला जाणार आहे. मराठी राजभाषा दिनी होणार्‍या या संमेलनात हा ठराव केला जाणार आहे.

पुस्तक खरेदीसाठी डिस्काऊंट
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच विविध साहित्यिकांच्या पुस्तक खरेदीवर 25 ते 30 टक्के सुट मिळणार आहे. शनी चौकातील श्रीपाद ग्रंथ भांडार येथे पुस्तक खरेदीवर ही सवलत मिळणार असल्याची माहिती संयोजक येलुलकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या