Thursday, April 25, 2024
Homeनगरविद्यार्थ्यांना मारहाण करणार्‍या पोलीस यंत्रणेची न्यायालयीन चौकशी करा

विद्यार्थ्यांना मारहाण करणार्‍या पोलीस यंत्रणेची न्यायालयीन चौकशी करा

वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची मागणी

अकोले (प्रतिनिधी) – एनआरसी व सीएबी कायद्याला विरोध करणार्‍या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणार्‍या पोलीस यंत्रणेची न्यायालयीन चौकशी करावी अशा आशयाच्या मागणीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविण्यासाठी तहसीलदारांना सादर करण्यात आले.

- Advertisement -

भारतीय राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून सरकारी धोरणांवर टीका करणे, त्याविरुध्द आंदोलन करणे व आपले मत मांडणे हा मूलभूत अधिकाराचा वापर करणे म्हणजेच जागरुक नागरिक होणे असा आहे. केंद्र सरकारने आणलेला सीएबी व एनआरसी कायदा हा भारतीय राज्य घटनेच्या समानता या तत्त्वाचा भंग करतो. धार्मिक आधारांवर नागरिकत्व देण्याचा हा प्रकार असून भारताच्या सार्वभौम धर्मनिरपेक्ष संविधानाचा अनादर आहे असा आमचा आरोप आहे. या कायद्यान्वये एका विशिष्ट धर्म समुदायाला टार्गेट करून हिंदू राष्ट्राच्या निर्मितीचा छुपा अजेंडा भाजप आणत आहेत. मात्र भारत संविधानिक मूल्यांवर चालणारा देश असून त्याला अशा पद्धतीने बदलू शकत नाही.

या कायद्याच्या विरोधात दिल्ली विद्यापीठातील, जमिया विद्यापीठातील अशा प्रत्येक विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार वापरत आहेत. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केंद्र शासन करीत आहे. या विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष अत्याचाराचा आम्ही निषेध करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. लायब्ररीमध्ये, मुलांच्या हॉस्टेलमध्ये घुसून मारहाण करणार्‍या पोलिसांसह संपूर्ण यंत्रणेची चौकशी व्हावी. विद्यार्थी आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. त्याचसोबत एनआरसी व सीबीए कायदा रद्द करावा, अशी मागणीही वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

विद्यार्थी आपल्या अधिकाराबाबत जागृत झाला तर तो या व्यवस्थेला प्रश्न विचारतो. हेच केंद्र शासनाला नको आहे. मात्र आम्ही वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या सोबत आहोत. आमच्या निवेदनाची दखल घ्यावी. अन्यथा वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सचिन वाकचौरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सचिव डॉ. संदीप कडलग व मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिलीप शेणकर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या