Wednesday, April 24, 2024
Homeनगरचार लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत 24 लाख पाठ्यपुस्तके

चार लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत 24 लाख पाठ्यपुस्तके

शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग येत्या शैक्षणिक वर्षासाठी सज्ज झाला आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनामार्फत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या चार लाख 66 हजार 255 विद्यार्थ्यांना 24 लाख 20 हजार 321 मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र, करोनामुळे शाळा कधी सुरु होणार याबाबत अजूनही अनिश्चितता असून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने प्रवेश करण्यात येत आहेत.

- Advertisement -

शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. सध्या सर्वत्र करोनाचे सावट आहे. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना वरच्या वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. मात्र, शाळा कधी सुरु होतील याबाबत अद्यापही आदेश नाहीत. लॉकडाऊनपूर्वीच नवीन शैक्षणिक वर्षातील विविध पाठ्यपुस्तकांची छपाई झाली होती. वाहतूक बंद असल्याने पुस्तके जिल्ह्यात पोहोचली नव्हती.

जिल्ह्यात पहिली ते पाचवीपर्यंत दोन लाख 73 हजार 57 विद्यार्थ्यासाठी 12 लाख एक हजार 43 पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. सहावी ते आठवीपर्यंतच्या एक लाख 85 हजार 96 विद्यार्थ्यासाठी 12 लाख 19 हजार 278 पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील चार लाख 66 हजार 255 विद्यार्थ्यांना 24 लाख 20 हजार 321 पुस्तकांची मागणी शिक्षण विभागाने बालभारतीकडे केली होती.

आता बालभारतीकडून सर्व संबंधित शाळांना पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. 30 मे अखेर सर्व तालुक्यांमध्ये पुस्तके उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर तालुका स्तरावरील गटशिक्षणाधिकार्‍यांकडून केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहचवण्यात येतील. केंद्रस्तरावरुन शाळांना पुस्तके देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी दिली.

तालुकानिहाय विद्यार्थी संख्या व कंसात पुस्तके
नगर 32061 (176898), संगमनेर 53327 (211203), नेवासा 42667 (232848), पाथर्डी 29377 (159956), पारनेर 28890 (149756), राहुरी 36591 (200166), कर्जत 26436 (146366), जामखेड 19196 (101848), कोपरगाव 33359 (174751), श्रीरामपूर 29251 (163041), अकोले 31520 (173905), श्रीगोंदा 42189 (186009), शेवगाव 29626 (163797), राहाता 31765 (179777). एकूण 466255 (2420321).

- Advertisment -

ताज्या बातम्या