Saturday, April 27, 2024
Homeनगरराज्यातील जलसंधारणाची चळवळही झाली लॉकडाऊन !

राज्यातील जलसंधारणाची चळवळही झाली लॉकडाऊन !

एप्रिल-मे महिन्यात घेतली जाणारी जलसंधारणाची कामे यंदा बंद

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- कोरोना कोव्हीड-19 संसर्ग टाळण्यासाठी विलगीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने गर्दी कमी होण्याच्यादृष्टीने शासनाने लागू केलेल्या जमावबंदी आदेशामुळे राज्यातील जलसंधारणाची चळवळ सुद्धा ‘लॉकडाऊन’ झालेली आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने जलशक्ती अभियान तर राज्य सरकारने जलसंधारण व संवर्धन यासाठी जलयुक्त शिवार अभियान (आताची मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना) तर पाणी फाउंडेशनकडून वॉटर कप स्पर्धा यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. पडलेल्या पावसाचा थेंब न् थेंब वाहून न जाता तो जमिनीत जिरला पाहिजे. यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी उन्हाळ्यात जलसंधारणाची कामे हाती घेतली जातात. प्रत्येक वर्षी साधारणतः एप्रिल-मे महिन्यातही कामे हाती घेतली जातात. ही कामे रोजगार हमीचे मजूर, मशनिरी किंवा स्वयंसेवी संस्था व त्या त्या गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन श्रमदानातून ही कामे पूर्ण करत असतात.

परंतु यावर्षी ही कामे हाती घेण्यापूर्वीच मार्च महिन्यातच देश व राज्यावर कोरोना विषाणूचे संकट आले आहे. जमाव बंदी आदेश काढण्यात आल्याने श्रमदानासाठी किंवा रोजगारासाठी घराबाहेर पडणे अशक्य झाल्याने ही कामे सध्या रखडलेली आहे.

केंद्र सरकारचे अभियान…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसर्‍या कार्यकाळात जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती केलीय. या खात्याचा कारभार गजेंद्रसिंह शेखावत यांना देण्यात आलाय. देशभर स्वच्छ भारत अभियान जसं राबविण्यात आलं त्याच धर्तीवर ‘पाणी वाचवा, पाणी जिरवा’ अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेत देशातल्या 257 जिल्ह्यामध्ये अधिकार्‍यांना पाठवलं जात आहे. या जिल्ह्यांमधल्या 1539 विभागांमध्ये अधिकारी तैनात राहणार ते जमिनीखालच्या पाण्याच्या पातळीची मोजणी करत आहेत.
दोन टप्प्यात हे अभियान राबवलं जाणार आहे. 1 जुलै ते 15 सप्टेंबर हा पहिला टप्पा आहे. तर 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर हा दुसरा टप्पा आहे. दरवर्षी हे अभियान राबवलं जाणार आहे. यावर्षी जर कोरोनाचे संकट टळले तर 1 जुलैपासून जलशक्ती अभियानाचे काम सुरू होऊ शकते.

राज्य सरकारचे जलयुक्त शिवार अभियान…
महाराष्ट्रात नेहमीच होणार्‍या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन ‘पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019’ या योजनेअंतर्गत ‘जलयुक्त शिवार’ नावाचे अभियान महाराष्ट्र सरकारने 2014 मध्ये सुरू केले. 2014-15 या आर्थिक वर्षात भूजल पातळीत 2 मीटरपेक्षा जास्त घट झालेली 188 तालुक्यातील 2234 गावांमध्ये, तसेच महाराष्ट्र शासनाने टंचाई परिस्थिती जाहीर केलेल्या 22 जिल्ह्यांतील 19059 गावांमध्ये हे अभियान प्राधान्याने राबविण्यात आले. भविष्यात राज्याच्या उर्वरित भागात पाणी टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यावरही भर दिला. या अभियानात विविध विभागांकडील योजना, अशासकीय संस्था आणि लोकसहभाग यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

जलयुक्त शिवार अभियान या योजनेचे नाव बदलून मुख्यमंत्री जल संवर्धन योजना असे करण्यात आले आहे. सध्या कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शासनाची जलसंधरणाची सर्व कामे ठप्प आहेत.

वॉटर कप स्पर्धा…
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त बनवण्यासाठी आमिर खान आणि राव यांनी 2016 साली स्थापन केलेली ‘पाणी फ़ाउंडेशन’ ही एक ना-नफा तत्वावर काम करणारी संस्था आहे. प्रत्येक गावाने, शहराने पाणलोट व्यवस्थापनाच्या वैज्ञानिक पध्दती वापरून पावसाचं पाणी साठवलं पाहिजे आणि राळेगणसिद्धी-हिवरे बाजार सारखे जलस्वयंपूर्ण झाले पाहिजे या हेतूने पाणी फाउंडेशन मार्फत दरवर्षी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ आयोजित केला गेला आहे. हा कप म्हणजे स्पर्धेच्या काळात जलसंवर्धन आणि पाणलोट व्यवस्थापनची उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये लावलेली चुरस होय. वॉटर कप स्पर्धेच्या पर्वाचा कालावधी दरवर्षी 8 एप्रिल ते 22 मे असा आहे. वॉटर कप स्पर्धेचे हे 5 वे वर्ष आहे, मात्र कोरोनाच्या संकटामुळे यावर्षीच्या वॉटर कप स्पर्धेची घोषणा होऊ शकली नाही. पाणी फाउंडेशनच्या बरोबरीने राज्यात आध्यात्मिक गुरू श्री श्री रवी शंकरजी यांची आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था व भारतीय जैन संघटना सुद्धा महाराष्ट्राला पाणीदार करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे.

‘यशदा’तील जलसाक्षरता केंद्राचे कार्य…
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या सुचनेनुसार राज्य सरकारने लोकांना जलसाक्षर करण्यासाठी यशदा, पुणे येथे स्वतंत्र जलसाक्षरता केंद्र सुरू केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून राज्यातील राज्यस्तरावर काम करणारे जलनायक, महसूल विभाग स्तरावर काम करणारे जलयोद्धे, जिल्हास्तरावर काम करणारे जलप्रेमी, तालुकास्तरावर काम करणारे जलदूत आणि गाव पातळीवर जलसेवक आणि शासनाच्या प्रत्येक विभागात काम करणारे कर्मचारी यांना प्रशिक्षित करून त्यांच्यामार्फत राज्यातील प्रत्येक नागरिकाला जलसाक्षर करण्याचे काम सुरू आहे. आजपर्यंत अनेक प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आलीत. मात्र कोरोनाच्या संकटामुळे हे प्रशिक्षण कार्य सध्या तरी थांबलेले आहे.

गेली 3 वर्षे आमच्या गावाने पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला,बक्षीस जरी मिळाले नसले तरी जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात उभे राहिले.गावामध्ये एकोपा वाढून नागरिकांना जलसंधारणाचे व श्रमदानाचे महत्त्व कळाले.यावर्षी सुद्धा वॉटर कप स्पर्धेत भाग घेण्यासाठी आम्ही पाणी फाउंडेशनकडे नोंदणी केली होती.परंतु कोरोनाच्या संकटामुळे यावर्षीची स्पर्धाच सुरू होऊ शकली नाही.यावर्षी श्रमदान करण्याची संधी हुकल्याची हुरहूर सर्वांना लागून आहे.
-रफिक शेख, जलमित्र, पाणी फाउंडेशन

जलसंधारण कामाची उद्दिष्टे
विकेंद्रित पाणीसाठा निर्मिती. पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे
भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे. भूजल अधिनियमाची अंमलबजावणी
पाण्याच्या ताळेबंदाबाबत आणि कार्यक्षम वापराबाबत प्रभावी जनजागृती तसेच वृक्षलागवडीस प्राधान्य देणे. जलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे. पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे. अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे आदी जलस्त्रोतांची साठवण क्षमता वाढविणे
राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षित पाणी राखून पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती निर्माण करणे.

- Advertisment -

ताज्या बातम्या