Friday, April 26, 2024
Homeनगरबेवारस मृतदेह टाकून बसचे चालक -वाहक पळाले

बेवारस मृतदेह टाकून बसचे चालक -वाहक पळाले

माणुसकी हरवल्याची दिवसभर चर्चा; बस श्रीरामपूर आगारातील

आश्वी (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या श्रीरामपूर आगारातील एसटी बसमध्ये मृत पावलेल्या अनोळखी वयोवृध्द नागरिकास येथील बस स्थानकावर बेवारस टाकून चालक व वाहक निघून गेल्याने माणुसकी हरवल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.

- Advertisement -

शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास श्रीरामपूर आगाराची श्रीरामपूर-आश्वी ही एसटी आली होती. यावेळी वाहकाला या एसटीत एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला. त्यावेळी त्याने येथे उभ्या असलेल्या स्थानिक नागरिकांना मदतीला बोलावून हा प्रवाशी दारू पिलेला आहे, याला खाली घेण्यासाठी मदत करा, असे म्हणत हात पाय धरून त्या व्यक्तीला तेथे टाकून निघून गेले.

बराच वेळ होऊनही ही व्यक्ती हालचाल करत नसल्याने नागरिकांनी पाहणी केली असता ही व्यक्ती मृत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे गजबजलेल्या बसस्थानक परिसरात मृत प्रवाशी आढळल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. यावेळी आश्वी पोलिसांना माहिती मिळताच हवालदर विनोद गंभीरे, संजय लाटे, अनिल शेगाळे, प्रवीण दैहीनीवाल यांनी घटनास्थळी दाखल होऊन वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन मृतदेह संगमनेर येथील कॉटेज रुग्णालयात पाठवला.

यावेळी मृत व्यक्ती ही कोणाच्याही ओळखीची नसल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती व्हायरल झाली. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसाशी संपर्क करून या व्यक्तीचे नाव लक्ष्मण बाबुराव जाधव (वय 60, रा. दरेवाडी, ता. संगमनेर) येथील रहिवासी असल्याचे सांगितले. कोतवाल गाडेकर यांनी दिलेल्या खबरीवरुन आश्वी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मागील दोन ते अडीच महिन्यांपूर्वीही अशीच एक घटना घडली होती. दुसर्‍यांदा अशा घटनेची पुनरावृत्ती झाली. चालक व वाहकाकडून माणुसकीला काळीमा फासण्याचे कृत्य घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या