Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सभापतिपदी शेटे, परहर, गडाख, दाते यांची निवड

Share
बेकायदा रस्ते खोदाईप्रकरणी महानेटकडून भरपाई घेण्याचा ठराव, Latest News Excavation Illegal Roads Compensation Ahmednagar

जिल्हा परिषद : अखेरच्या क्षणापर्यंत ओढाताण, शिवसेनेचा निर्णय मुंबईतून

अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून गाजावाजा होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या निवडी मंगळवारी अखेर बिनविरोध पार पडल्या. यात महिला बालकल्याण समितीच्या सभापतिपदी संगमनेरच्या सदस्या मिराबाई शेटे, समाजकल्याण समितीच्या सभापतिपदाची लॉटरी सलग दुसर्‍यांना कर्जतचे उमेश परहर यांना, सभापती क्रमांक एकसाठी नेवासा तालुक्यातील सदस्य सुनील गडाख, सभापती क्रमांक दोनसाठी पारनेर तालुक्यातील सदस्य काशिनाथ दाते यांची निवड झाली आहे.

दरम्यान या निवडीसाठी जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीमध्ये सोमवारी रात्री ते मंगळवारी दुपारी दोनपर्यंत प्रचंड ओढाताण झाली. शिवसेनेकडून अर्थ आणि बांधकाम तसेच कृषी समितीची मागणी लावून धरण्यात आली. यासाठी मुंबईतून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काशिनाथ दाते आणि पक्षाचे गटनेते अनिल कराळे यांच्या नावाचे पत्र पाठविले. मात्र, ऐनवेळी कराळे यांचे नाव मागे पडून त्या ठिकाणी सभापतिपदासाठी दाते यांचे नाव निश्चित करण्यात आले.

काँग्रेसकडून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी देखील शेवटपर्यंत बांधकाम समितीचा आग्रह धरला. मात्र, तांबे यांचा आग्रह मान्य न झाल्याने काँग्रेसला महिला व बालकल्याण समितीवर समाधान मानण्याची वेळ आली. जिल्हा परिषदेत काल सकाळी 11 पासून विषय समितीच्या सभापतिपदांसाठी दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. या काळात चार विषय समित्यासाठी 16 सदस्यांनी उमदेवारी अर्ज दाखल केले. यात समाजकल्याण समितीसाठी उमेश परहर (राष्ट्रवादी) आणि सोमिनाथ पाचरणे (भाजप) या दोन अर्जाचा समावेश होता. तर महिला बालकल्याण समितीसाठी मीरा शेटे (काँग्रेस), पंचशीला गिरमकर (भाजप), सुषमा दराडे (शिवसेना) राणी लंके (शिवसेना) यांचा समावेश होता.

दोन विषय समित्यासाठी सुनील गडाख (दोन अर्ज, क्रांतिकारी), काशिनाथ दाते (दोन अर्ज, शिवसेना) जालिंदर वाकचौरे (भाजप), रामहरी कातोरे (काँग्रेस), अनिल कराळे (शिवसेना), शरद झोडगे (शिवसेना), शरद नवले (मविआ) यांच्या अर्जाचा समावेश होता. यात भाजपचा एक संयुक्त तर शिवसेनेचे दोन संयुक्त अर्ज होते. दुपारी 3 वाजता पिठासीन अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली निवड सभा सुरू झाल्यानंतर माघारीसाठी वेळ देण्यात आला. त्यानूसार पाचरणे, गिरमकर, वाकचौरे, घोडके, कातोरे, कराळे, झोडगे, नवले यांनी माघार घेतल्याने सर्व विषय समित्या बिनविरोध झाल्या. निवड जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे निरिक्षक अंकुश काकडे, काँग्रेसचे सत्यजित तांबे, शिवसेनेचे भाऊ कारेगावकर, माजी आ. चंद्रशेखर घुले, माजी आ. विजय औटी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रा. शशिकांत गाडे यांनी नवीन सभापतींचा सत्कार केला.

निवडीनंतर कालपासूनच्या बैठकीचा तपशील देतांना राष्ट्रवादीचे जिल्हा निरिक्षक अंकुश काकडे म्हणाले, जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत होते. मात्र, कोणत्या पक्षाला कोणते पद द्यावयाचे याबाबत स्पष्टता नव्हती. आम्ही राष्ट्रवादीच्या, काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे नेते मुंबईतील त्यांच्या नेत्यांच्या संपर्कात होते. काल रात्रीच्या चर्चेतून मार्ग निघाला नसल्याने आज सकाळी पुन्हा सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. बांधकाम आणि कृषीसाठी काँग्रेस-शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. यामुळे राष्ट्रवादीने एक पाऊल मागे घेत समाजकल्याण समिती घेतली. राष्ट्रवादीकडून माधवराव लामखडे यांच्यासाठी आग्रह होता. या निवड प्रक्रियेत उपमुख्यमंत्री अजित पवार, मी स्वत:, माजी आ. चंद्रशेखर पाटील घुले आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके सहभागी होते.

परहर यांना सलग दुसर्‍यांदा संधी
सभापती निवडीत सर्वात प्रथम निर्णय झाला तो समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांच्या नावाचा. त्यांना कोपरगाव तालुक्यातून स्पर्धक होता. मात्र, अजित पवार यांनी परहर यांच्या नावाला पसंती दिल्याने परहर आता दुसर्‍या समाज कल्याणचे सभापती झाले असून, सलग पाच सभापती होण्याचा मान त्यांना मिळणार आहे.

औटीमुळे दाते यांना लॉटरी
पारनेरचे सदस्य काशिनाथ दाते यांना विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्यामुळे ऐनवेळी सभापती होण्याची संधी मिळाली. दाते अचानक सभापतिपदाच्या स्पर्धेत आले. पारनेर तालुक्यात औटी यांच्या पराभवामुळे त्यांना ताकद देण्यासाठी पक्षाने औटी यांच्या रुपाने दाते यांना संधी दिली आहे. पारनेर पंचायत समिती आणि दाते यांचे सभापतिपद यामुळे विद्यमान आमदार नीलेश लंके यांना टक्कर देण्याची संधी औटी यांना मिळणार आहे.

‘बांधकाम’साठी तांबे अखेरपर्यंत लढले
जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या वाट्याला बांधकाम समिती मिळावी, यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे अखेरपर्यंत आग्रही होते. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच्याशी तांबे यांनी संपर्क साधला. मात्र, शिवसेनेकडून दोन नावांचे पत्र आले. ते दोन समित्यांसाठी अडून बसले होते. काँगे्रसने शिवसेनेला कृषी अथवा महिला बालकल्याण घेण्याचा आग्रह केला. मात्र, शेवटी चर्चेत बांधकाम समितीवर काँग्रेसला पाणी सोडावे लागले.

बांधकाम समिती गडाखांना ?
मंगळवारी सभापती म्हणून सुनील गडाख आणि काशिनाथ दाते यांची निवड झाली आहे. आता अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलावून त्या ठिकाणी दोन सभापती यांच्या समितीची घोषणा अध्यक्षा घुले यांना करावी लागणार आहे. यात गडाख यांच्या वाट्याला बांधकाम समिती असणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!