सोनई परिसरात एलसीबीचे दोन ठिकाणी छापे

jalgaon-digital
3 Min Read

तिरट जुगार खेळणारे 5 जण तर अवैध दारु विकणारा एकजण ताब्यात

सोनई (वार्ताहर)- सोनई परिसरात नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने दोन ठिकाणी अवैध व्यवसायांवर छापे टाकून कारवाई केली. बेल्हेकरवाडी रोडवर जुगार अड्ड्यावर तर याच भागात घराच्या आडोशाला विदेशी अवैध विदेशी दारु विक्री करणार्‍या एकाला ताब्यात घेवून कारवाई केली. याबाबत माहिती अशी की, बेलेकरवाडी रोडचे साळवे वस्ती जवळ स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलिसांनी छापा घालून तिरट जुगार खेळणार्‍यांना ताब्यात घेऊन सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून अटक केलेली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरचे हवालदार संदीप काशिनाथ घोडके यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे आदेशानुसार मी व हवालदार बाळासाहेब मुळीक व पोलीस पथक खाजगी वाहनाने सोनई पोलीस ठाणे हद्दीत फरार व पाहिजे असलेले अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की बेल्हेकर वाडी रोड इरिगेशन कॉलनी साळवे वस्ती येथे काही लोक हारजितीचा जुगार खेळत आहे.

तेथे जावून हवालदार संदीप घोडके एलसीबी पथक सोनई पोलीस ठाण्याचे कर्मचारी पंचासह साळवे वस्तीजवळ गेले छापा टाकला असता तिरट जुगार खेळणारे 1गणेश आसाराम करंजे (वय 30), संभाजी रामचंद्र ठोंबरे (वय 32) सुभाष सखाराम साळवे (वय 50), सागर ज्ञानदेव मतकर (वय 29), महेंद्र ज्ञानदेव मतकर (वय 30) सर्व रा. बेल्हेकरवाडी व बेल्हेकरवाडी रोड (सोनई) या आरोपींची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्यांचेकडून मोबाईल हँडसेट, रोख रक्कम व कागदी पत्ते असा 24 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल ऐवज मिळून आला.

संचारबंदी आदेशाचे उल्लंघन म्हणून भादवि कलम 188/(2) 269,271 व महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ)प्रमाणे 143/2020 क्रमांकाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे एलसीबी पोलीस नाईक ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांनी दुसरी फिर्याद दिली की बेल्हेकर वाडी रोड इरिगेशन कॉलनी साळवे वस्ती येथे इसम अमोल मगर (रा. सोनई) हा घराच्या आडोशाला विदेशी दारू विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून सोनई पोलीस स्टेशनचे आव्हाड दोन पंच व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्या ठिकाणी पोहोचले असता अमोल मगर (वय 34) रा. सोनई यांचेकडे 1170 रुपये किमतीच्या मास्टर बँड कंपनीचा 180 मिली ग्रॅम वजनाच्या 9 सीलबंद बाटल्या मिळून आल्या.

त्याला सदरची दारू कुठून आणली असे विचारल्यावर मगर याने कीर्ती हॉटेलचे परमिट रूम नाव प्रदीप शेट्टी राहणार सोनई (पूर्ण नाव माहीत नाही) यांचेकडून दारू बाटल्या आणल्याचे सांगितले आरोपीचे अंगझडती 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट मिळून आला. याप्रमाणे 1170 रुपयांची विदेशी दारू दहा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

संचारबंदी आदेशाचे उल्लंघन म्हणून एलसीबी पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे यांचे फिर्यादीवरून आरोपी अमोल लक्ष्मण मगर (वय 34) रा. सोनई यास अटक केली तर दुसरा आरोपी प्रदीप शेट्टी (रा. सोनई) (पूर्ण नाव माहित नाही) यास फरार दाखविण्यात आलेले असून दोघांविरुद्ध भादवि कलम 188 (2) 269, 271 व मुंबई प्रोव्हीबिशन कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर 143/2020 दाखल करण्यात आलेला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *