Type to search

Featured maharashtra

व्यक्तीमत्व विकासासाठी कौशल्य गुणांमध्ये वाढ होणे गरजेचे- कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर

Share

आरोग्य विद्यापीठाच्या कार्यशाळेस तीस हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

मुंबई | वृत्तसंस्था

व्यक्तीमत्व विकासासाठी कौशल्य गुणांमध्ये वाढ होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभा प्रसंगी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे मेडिसिन- स्ट्रायव्हिंग फॉर हयुमिनिटी या विषयावर आयोजित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, ओरिजिन फांऊडेशनचे संचालक डॉ. संदीप माने, अधिसभा सदस्य दर्शन दक्षिणदास, निलेश सुराणा, पार्थ नॉलेज नेटवर्कचे संस्थापक अध्यक्ष बबन मगदुम, डॉ. संदीप गुंडरे, बाळासाहेब पेंढारकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात कुलगुरु यांनी सांगितले की, माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी मोठया प्रमाणात मोबाइल व इंटनेटचा वापर करतात. याचाच वापर विद्यार्थी व शिक्षकांनी व्यक्तीमत्व विकासासाठी करावा जेणेकरुन डॉक्टर-रुग्ण संवाद व विविध समस्यांचे निराकरण जलद गतीने करण्यासाठी मदत होईल. विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करुन पार्थ नॉलेज नेटवर्कच्या सहकार्याने आजची कार्यशाळा विद्यार्थी व शिक्षकांसाठी महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेचे प्रास्तावित करतांना कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाकरीता येनाऱ्या समस्या सोडविण्यासाठी विविध तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन या कार्यशाळेच्या माध्यमातून घेण्यात आले आहे. यासाठी पार्थ नॉलेज नेटवर्कच्या सहकार्याने या कार्यशाळेचे इंटरनेटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले. विद्यापीठाचे संलग्नीत तीनशे पन्नासपेक्षा अधिक महाविद्यालये व आरोग्य क्षेत्रातील तीस हजारपेक्षा अधिक विद्यार्थी व शिक्षकांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला असल्याचे त्यांनी सांगितले.

ओरिजिन फांऊडेशनचे संचालक डॉ. संदीप माने डॉक्टर- पेशंट रिलेशनशिप विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, रुग्ण व डॉक्टर यांच्यामधला संवाद अधिक चांगला होण्याच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांनी सुरवातीपासूनच योग्य दिशेने प्रयत्न केले पाहिजेत. रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधतांना त्यांच्या स्तरावरुन योग्य प्रमाणात माहिती डॉक्टरांमार्फत पोहचल्यास कटु प्रसंग टाळले जातील असे त्यांनी सांगितले.

डॉ. निलेश सुराणा सिक्रेट ऑफ सक्सेस- इफेक्टीव्ह टाईम मॅनेजमेंट या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, वेळेचे व्यवस्थापन ही महत्वपूर्णबाब आहे. वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी याचे विशेष भान राखण गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. आपल्या कर्तव्यांबरोबरच व्यक्तीमत्व विकासाच्या विविध पैलुंसाठी वेळ काढणे आवश्यक आहे. ताण-तणावाचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी छंद व आवडीनिवडी जोपासणे गरजचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेत कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण रॅगिंग- ए सिकनेस ऑफ माईंड या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, नव्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रॅंगिंगमुळे मोठया प्रमाणावर भावनीक आघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सिनियर विद्यार्थ्यांनी रॅंगिंगच्या विरोधात पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठातर्फे रॅगिंग होऊ नये यासाठी कडक कायदे करण्यात आले आहेत. मग त्यांची गरज पडू नये असे वातावरण वरिष्ठ विद्यार्थ्यांनी निर्माण करणे गरजेचे आहे. वरिष्ठ विद्यार्थ्यांना सुलभ वाटणारी कृती अजाणतेपणी नव्या प्रवेशित विद्यार्थ्यांना आघात करणारी ठरु शकते याचे भान ठेवले गेले पाहिजे. अशा काही घटना घडत असल्यास विद्यार्थ्यांनी त्वरीत आपल्या महाविद्यालयावर आणि विद्यापीठास कळवायला हवे असे त्यांनी सांगितले.

डॉ. माचिसवाला यांनी मेडिकल प्रोफेशन- वैद्यकीय व्यवसाय ही मानवतेची सेवा आहे. याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवले पाहिजे. आपल्या देशात डॉ. कोटनीस, डॉ. बी.सी.रॉय, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. बी.के. गोयल, डॉ. प्रकाश आमटे, डॉ.बाबा आमटे, डॉ. भरत वाटवाणी यासारख्या डॉक्टरांनी सेवेचे मानंद गाठले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या चिरत्रांचा अभ्यास करुन त्याप्रमाणे आपले व्यक्तीमत्व घडविले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

डॉ. आश्विनकुमार तुपकरी द हयुमन साईड ऑफ डॉक्टर या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बौध्दीक गुणवत्तेपेक्षा अधिक भावनीय गुणवत्ता असणे महत्वाचे ठरते. यासाठी विद्यार्थीदशेत विविध समाजोपयोगी कार्य करण्याची संधी घेतली पाहिजे. या अनुभवातून त्यांचे व्यक्तीमत्व अधिक खुलू शकते. महाविद्यालयीन आयुष्यात विविध आरोग्य शिबिरांसारखे उपक्रमातून विद्यार्थ्यांची सामाजिक जाणिवा अधिक सजग होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई येथील पार्थ नॉलेज नेटवर्क येथील स्टुडिओमध्ये आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. इंटरनेटच्या माध्यमातून पार्थ लाईव्ह डॉट कॉमवरुन सदर कार्यशाळेत तज्ज्ञांनी विविध विषयांवर केलेले मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. विद्यापीठाचे संलग्नीत तीनशे पन्नासपेक्षा अधिक महाविद्यालये व आरोग्य क्षेत्रातील तीस हजारपेक्षा अधिक विद्यार्थी व शिक्षकांनी या कार्यशाळेत ऑनलाईन सहभाग नोंदविला.

या कार्यशाळेचा प्रारंभ कुलगुरु यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. या प्रसंगी कार्यशाळेस उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे व कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. जाई किणी यांनी केले. या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी डॉ. दर्शन दक्षिणदास यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यशाळेत थेट प्रक्षेपणाव्दारे सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांनी तज्ञांना इंटरनेटच्या माध्यमातून तज्ज्ञांना ऑनलाईन शंका विचारल्या तसेच व्हॉटस्अँँपव्दारा प्राप्त प्रश्नांचे व शंकाचे देखील तज्ज्ञांनी त्वरीत निराकरण केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!