Wednesday, April 24, 2024
Homeनगरश्रीरामपूर उरूस व रामनवमी उत्सवाला ब्रेक!

श्रीरामपूर उरूस व रामनवमी उत्सवाला ब्रेक!

फक्त धार्मिक विधी होणार । रहाट पाळणे, दुकाने, हगामा यांना फाटा

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – येथील भाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या रामनवमी व सय्यद बाबा उरूस तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध धार्मिक यात्रा, उत्सव यावर्षी साध्या पद्धतीने साजरे करावेत, यामध्ये फक्त धार्मिक विधीच करावेत. गर्दी होईल, असा कुठलाही कार्यक्रम ठेवू नये. पाळणे, दुकाने, हगामा, सोंग अशा कार्यक्रमांना फाटा देऊन गावातील यात्रा शांततेच्या मार्गाने साजर्‍या कराव्यात, असे आवाहान प्रांताधिकारी अनिल पवार यांनी केले.

- Advertisement -

कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर यात्रा, उत्सवात गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारने केल्यानंतर प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी यात्रोत्सव समिती पदाधिकारी व प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तालुक पोलीस निरीक्षक मसूद खान, शहर पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, राम टेकावडे, नगरसेवक राजेंद्र पवार, ताराचंद रणदिवे, प्रकाश ढोकणे, रवी पाटील, रईस जहागीरदार, कलीम कुरेशी, दीपक चव्हाण, बाळासाहेब ओझा, सत्यनारायण उपाध्ये, अशोक उपाध्ये, राजेंद्र सोनवणे, मुन्ना पठाण, रियाज पठाण, रज्जाक पठाण, गौतम उपाध्ये, मधुकर झिरंगे, शिवाजी शेजूळ, प्रवीण फरगडे, लहानु शेजुळ, अकबर शेख, सरवरअली सय्यद आदी उपस्थित होते.

प्रांताधिकारी पवार म्हणाले, येथील रामनवमी व सय्यदबाबांचा उरुस हा राज्यभर प्रसिद्ध आहे. यासाठी राज्यभरातून लोक येत असतात. मात्र सध्या कोरोना व्हायरसमुळे देशभर काळजी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना व्हायरस संदर्भात बैठक घेण्यात आली. त्यानुसार सर्व स्तरावर काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले. इतर जिल्ह्यांमधील यात्रा उत्सव सर्व बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र नगर जिल्ह्यात यात्रामध्ये फक्त धार्मिक विधी होतील.

कसल्याही प्रकारचे रहाट पाळणे, दुकाने, कव्वालीचे कार्यक्रम, कुस्त्यांचा हंगामा होणार नाहीत. ज्यामुळे गर्दी होते असे सर्व कार्यक्रम यावर्षी घेण्यात येऊ नयेत, असे आवाहन प्रांताधिकारी अनिल पवार यांनी केले. तर येथील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार आगामी रामनवमी व सय्यद बाबांच्या उरुसमध्ये फक्त धार्मिक कार्यक्रम होतील. कसल्याही प्रकारचे इतर कार्यक्रम होणार नाही जेणेकरून गर्दी होणार नाही, असेही प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

नगराध्यक्ष अनुराधा आदिक म्हणाल्या, तसे पाहिले तर येथील रामनवमी व सय्यद बाबा चा उरूस हा देशभर प्रसिद्ध आहे. जवळपास देशभरातून याठिकाणी लोक यात्रेसाठी येतात मात्र प्रशासनास सहकार्य करण्याच्या दृष्टीने व कोरोना व्हायरसमुळे सर्वांनी काळजी घ्यावी. गर्दी होणार नाही तसेच यात्रेमधील सर्व प्रकारचे धार्मिक कार्य करण्यास आपल्याला मुभा दिली आहे. त्यामुळे यात्रा होतील मात्र या ठिकाणी गर्दी करण्याचे टाळावे व प्रशासनास सहकार्य करावे.

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये यात्रा कमिटीचे राम टेकावडे, मुन्ना पठाण, नगरसेवक राजेंद्र पवार, प्रवीण फरगडे, लहानु शेजुळ, खैरी निमगावचे सरपंच शिवाजी शेजुळ, पढेगाव येथील अकबर शेख आदी ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातून पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. प्रशासनास सहकार्य करावे व यात्रा शांततेत साजर्‍या कराव्यात, असे आवाहन तहसीलदार पाटील यांनी करून शेवटी आभार मानले.

शिर्डी यात्रेबाबत बुधवारी निर्णय

शिर्डीत रामनवमी उत्सव तीन दिवस साजरा करण्यात येतो. या उत्सव काळात लाखो भाविक देशभरातून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. यावर्षीही लाखो भाविकांनी शिर्डीमध्ये हजेरी लावण्याची शक्यता आहे. पण यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा भरवावी की नाही या बाबत विचारमंथन सुरू आहे. याबाबतचा निर्णय घेण्यासाठी 25 तारखेला ग्रामस्थांची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या