Friday, April 26, 2024
Homeनगरसभापती वंदना मुरकुटे की संगीता शिंदे ? आज फैसला

सभापती वंदना मुरकुटे की संगीता शिंदे ? आज फैसला

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज होणार्‍या श्रीरामपूर पंचायत समिती सभापतिपद निवडीबाबत कमालीची उत्सुकता ताणली आहे. विशेष म्हणजे या दोघींनीही ‘व्हिप’बजावल्याने संभ्रम निर्माण झाला. ससाणे गटाच्या संगीता शिंदे या विखे-मुरकुटे गटात गेल्याने त्यांच्याकडे पाच तर ससाणे गटाकडे तीन सदस्य उरले आहेत, मात्र ससाणे गटाने त्यावर कुरघोडी केली. संगीता शिंदे यांचे काँग्रेसचे गटनेतेपद रद्द करून डॉ. वंदना मुरकुटे यांची गटनेतेपदी सर्वानुमते निवड केली आहे. तसे पत्र जिल्हाधिकार्‍यांनी गटविकास अधिकार्‍यांना दिले आहे. त्यामुळे आज काय राजकीय घडामोडी घडतात व कोण बाजी मारतो याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

दि.30 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील पंचायत समितींच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाच्या निवडीसाठी आज 7 जानेवारीला दुपारी 3 वाजता प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक होणार आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर पंचायत समिती सभापतिपद इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित आहे. या प्रवर्गातील ससाणे गटाच्या डॉ. वंदना मुरकुटे व संगीता शिंदे या दोन सदस्या आहेत, मात्र संगीता शिंदे यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संधी देण्यात आली. त्यामुळे मुरकुटे यांना संधी मिळण्याची शक्यता असली तरी शिंदे यांना आपल्या गटात घेऊन पंचायत समितीवर सत्ता मिळवण्यासाठी विखे यांचे समर्थक दीपक पटारे यांच्याकडून व्युहरचना केली आहे.

संगीता शिंदे यांना बाजार समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा देऊन पंचायत समिती सभापती पदासाठी पुढे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संगीता शिंदे यांच्याकडे असलेल्या गटनेतेपदाचा फायदा घेवून ससाणे गटाच्या उमेदवार डॉ. वंदना मुरकुटे यांची गोची करण्याचा डाव पटारे गटाने आखला होता. मात्र यावर ससाणे गटाने कुरघोडी करून डॉ. वंदना मुरकुटे यांची गटनेतेपदी निवड केली. जिल्हाधिकार्‍यांकडून त्यास मान्यता मिळाली आहे.

वंदना मुरकुटेंनी बजावला ‘व्हीप’
काँग्रेसच्या गटनेतेपदी डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांची निवड झाल्याने त्यांनी त्यांच्यासह संगीता शिंदे, अरुण पाटील नाईक, विजय शिंदे यांना व्हिप बजावला आहे. यात काँग्रेसच्या ससाणे गटाकडून सभापतिपदासाठी डॉ. वंदना मुरकुटे तर उपसभापती पदासाठी विजय गोपीनाथ शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हात वर करून त्यांना मतदान करण्याचे आदेश देण्यात आले. मतदानाच्या वेळी गैरहजर राहिल्यास पक्षविरोधी कारवाई करण्याचा इशाराही या व्हीपमध्ये देण्यात आला आहे.

संगीता शिंदेंनी बजावला ‘व्हीप’
काँग्रेसच्या गटनेतेपदी संगीता सुनील शिंदे यांची निवड झाल्याने त्यांनी त्यांच्यासह सौ. वंदना मुरकुटे, अरुण पाटील नाईक, विजय शिंदे यांना व्हिप बजावला आहे. यात काँग्रेसच्या सभापतिपदासाठी संगीता शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हात वर करून त्यांना मतदान करण्याचे आदेश देण्यात आले. मतदानाच्यावेळी गैरहजर राहिल्यास पक्षविरोधी कारवाई करण्याचा इशाराही या व्हीपमध्ये देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या