Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीरामपुरातील दुकाने सुरू करण्यासाठी आराखडा तयार

श्रीरामपुरातील दुकाने सुरू करण्यासाठी आराखडा तयार

जिल्हाधिकार्‍यांच्या नवीन आदेशामुळे व्यापारी वर्गात संभ्रम

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरातील दुकाने सुरू करण्यासाठी नगरपालिका व प्रशासनाच्या वतीने आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील विविध भागातील दुकाने पुन्हा सुरू होणार आहे. अशी माहिती नगरपालिकेचे सहाय्यक वसुली अधिकारी श्री. लांडे यांनी दिली. त्यासाठी व्यावसायिक व नागरिक यांना ठरवून दिलेले नियम व अटींचे पालन करावे लागणार आहे. दरम्यान काल रात्री उशिरा जिल्हाधिकार्‍यांनी शासनाच्या निर्णयानुसार जारी केलेल्या आदेशात सर्व व्यावसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पालिकेने तयार केलेला आराखडा लागू होणार का? याबाबत संभ्रम आहे.

- Advertisement -

नगर पालिकेच्या वतीने तयार केलेल्या आराखड्यानुसार सोमवारी व गुरुवारी नेवासा रोड, ओव्हरब्रीज ते संगमनेर रोड नाका दोन्ही बाजू, तसेच या रस्तास सलग्न इतर दक्षिणोत्तर रस्ते- दोन्ही बाजू – कांदा मार्केट रोड, साखर कामगार हॉस्पिटलकडे जाणारा रोड, उंडे हॉस्पिटलसमोरचा रोड, निलायम हॉटेल समोरचा रोड, डावखर रोड, स्टेट बँक (जिजामाता चौक) रोड, ओबेरॉय पेट्रोल पंपासमोरचा रोड, प्रियदर्शनी मंगल कार्यालयासमोरचा रोड, ओझा पेट्रोल पंपाशेजारचा बाजार तळाकडे जाणारा रोड, अल्फा हॉस्पिटलशेजारचा रोड. मंगळवार व शुक्रवारी गिरमे चौक (शिवाजी रोड) ते गोंधवणी महादेव मंदिरापर्यंत दोन्ही बाजू तसेच गिरमे चौक (शिवाजी रोड) ते गोंधवणी महादेव मंदिर या रोडलगतचे पूर्व-पश्चिम दिशेचे रस्ते- दोन्ही बाजू सुरू रहातील.

बुधवार व शनिवारी गांधी पुतळा ते बेलापूर रोड, वेस पर्यंत- दोन्ही बाजू, गांधी पुतळा ते बेलापूर रोड वेस या रोडलगतचे पूर्व बाजूला असणारे आतील रस्ते- दोन्ही बाजू हे सुरू राहणार आहेत. श्रीरामपूर शहरात दुकाने सुरू करण्यास वारानुसार परवानगी दिलेली असली तरी या दुकानदारांना अटी व शर्ती पालन करणे बंधनकारक असणार आहे. ग्राहकांनी मास्क तोंडावरती बांधलेला असेल तरच त्यांना खरेदीसाठी प्रवेश द्यावा, दुकानामध्ये एकावेळी फक्त 5 ग्राहक खरेदीसाठी सोडण्यात यावेत, दुकानाच्या प्रवेशद्वारावर शक्यतो ग्राहकांच्या थर्मल स्कॅनिंगची सुविधा करण्यात यावी, दुकानात प्रवेशावेळी सर्व ग्राहकांना हॅण्ड वॉश व हॅण्ड सॅनिटायजरची सुविधा करण्यात यावी.

होम क्वॉरंटाईन केलेल्या नागरीकांना दुकानात प्रवेश देण्यात येवू नये, शक्यतो वय वर्ष 5 पर्यंत व 60 वर्षावरील व्यक्तींना दुकानात प्रवेश देण्याचे टाळावे, कामगारांच्या एकूण क्षमतेच्या 33 टक्के कामगारांचा वापर करावा, दुकान मालक व कामगार यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहिल, सर्व आस्थापना यांनी त्यांच्या दुकानात एक रजिस्टर ठेवावयाचे असून त्यामध्ये येणार्‍या ग्राहकांची संपूर्ण माहिती (संपूर्ण नाव, पत्ता, वेळ व मो.क्र.) नमूद करणे बंधनकारक आहे, दुकानात व दुकानाबाहेर सामाजिक अंतर (दो गज की दुरी) ठेवण्यात यावे.

अत्यावश्यक सेवा व शेती विषयक बाबी दररोज सुरू राहतील, अस्थापना चालक, मालक, कर्मचारी, कामगार यांनी आरोग्य सेतु अ‍ॅप वापरणे बंधनकारक राहिल, रविवारी सर्व भागातील सर्व दुकाने बंद राहतील, कोणत्याही दुकानदाराने आपले दुचाकी व चारचाकी वाहन दुकानापर्यंत न नेता बाहेर निश्चित केलेल्या पार्किंगमध्ये पार्क करावे, दुकान मालकांनी ग्राहकांना शक्यतो ई-पेमेंट करण्याचा आग्रह धरावा, सर्व दुकाने सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेतच चालु राहतील, वरील नमूद केलेल्या अटी शर्तीचे पालन करणे बंधनकारक असून इतर बाबींसाठी यापूर्वी लागू करण्यात आलेले निर्बंध जसेच्या तसे लागू असून त्याचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच वरीलप्रमाणे अटी शर्तीचे पालन न करणार्‍या आस्थापना तात्काळ बंद करण्यात येवून त्यांच्या विरोधात दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल, असेही जाहीर करण्यात आले आहे.

राज्य शासनाचे जे निर्देश आहेत ते 22 मे पासून अंमलात येणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसारच परवा बैठक आयोजित करण्यात आली होती. आणि बैठक संपल्यानंतर शासनाच्या सूचना जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे बैठकीत ठरल्याप्रमाणे व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आजचा आदेश होणे क्रमप्राप्त होते. दि. 22 मे पासून शासनाच्या आदेशालगत जिल्हाधिकारी हे आदेश जारी करतील त्या सूचनांनुसारच सर्व सुरू होईल.
– प्रशांत पाटील, तहसीलदार

- Advertisment -

ताज्या बातम्या