Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात जनता ‘कर्फ्यू’ ला 100 टक्के प्रतिसाद

श्रीरामपूर तालुक्यात जनता ‘कर्फ्यू’ ला 100 टक्के प्रतिसाद

कोरोना रोखण्यासाठी गर्दी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील सर्व गावांतून 100 टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच नागरिकांनी घरातच राहणे पसंत केल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरलेला पहावयास मिळाला. तालुकाभरातील व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते.

- Advertisement -

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जनता कर्फ्यू जाहीर करून कुणीही घराबाहेर पडू नये, असा आदेश देण्यात आला होता. यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्यापारी, व्यावसायिक, शेतकर्‍यांनीही या बंदला प्रतिसाद दिला. तर ग्रामीण भागात काम करणार्‍या पुरुष, महिला मजुरांनीही एक दिवसाची सुट्टी घेतली. दरम्यान, या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यात 50 पोलीस कर्मचार्‍यांसह 2 स्टॅकींग फोर्स तैनात करण्यात आले होते.

अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट, पोलीस निरीक्षक मसुद खान आदी अधिकार्‍यांनी शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी भेटी देऊन जनतेला घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. मेनरोड, शिवाजी रोड, संगमनेर रोड, बसस्टॅण्ड, रेल्वे स्टेशन परिसरात मोठी गर्दी राहते. मात्र काल जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी शुकशुकाट होता. शहरातील वॉर्ड नंबर 2, मिल्लतनगर, फातेमा कॉलनी, गोंधवणी रोड या परिसरातील सर्व दुकाने बंद होती. लोकांनी घरात राहणे पसंत केले.

सकाळी काही ठिकाणी लोक रस्त्यावर येत होते. मात्र पोलिसांनी पोलीस गाडीतील ध्वनिक्षेपकावरून त्यांना घरात राहण्याचे आवाहन केले. सर्व प्रकारची दुकाने बंद असल्यामुळे रोजंदारीवर पोट भरणार्‍या लोकांचे, मात्र हाल झाले. या परिसरात असणार्‍या सर्व मशिदी 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आल्या असून भाविकांनी घरातच नमाज पठण व प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काल रात्री शब-ए- मेराज ही जागण्याची रात्र सुद्धा लोकांनी मशिदीमध्ये न येता घरातच प्रार्थना करून घालविली.

आयुष्यामध्ये प्रथमच अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रिया काही वयस्कर नागरिकांनी व्यक्त केली. रात्री शब्द कॅमेराच्या प्रार्थनेमध्ये घराघरातून सदरच्या कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिल्याने रात्री उशिरापर्यंत नागरिक घराबाहेर पडले नाही. तर कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या