Thursday, April 25, 2024
Homeनगरकोणतीही करवाढ नसलेला श्रीरामपूर पालिकेचा अर्थसंकल्प सादर

कोणतीही करवाढ नसलेला श्रीरामपूर पालिकेचा अर्थसंकल्प सादर

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर नगरपालिकेचा कोणतीही करवाढ नसलेला 5 लाख 97 हजार रुपये अखेरची शिल्लक असलेला व 174 कोटी, 24 लाख, 65 हजार 500 रुपये शिलकेसह एकूण रकमेचा सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आला.

पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक या होत्या. तर उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी समीर शेख यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी नगराध्यक्षा आदिक यांनी सांगितले की, सौरऊर्जा प्रकल्प शहरात राबविला जाणार असून त्यासाठी 5 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करायचे आहेत. मोठ्या प्रमाणात शासकीय निधी आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बोरावके कॉलेजच्या मागे आणि संजयनगरच्या परिसरात दोन नवीन भाजी मंडई उभारण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

त्याशिवाय आधुनिक अग्निशामकाची गाडी घेण्यासाठी 3 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात 70 कोटी रुपये साधारणपणे महसूली खर्च होणार असून 103 कोटी रुपये भांडवली खर्चावर खर्च होणार आहे. शहराच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

स्वच्छ भारत योजनेअंतर्गत येणार्‍या शौचालयाची कामे शहरात अनेक ठिकाणी अपूर्ण आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक उघड्यावर बसत आहेत. या योजनेसाठी कमी निधीची तरतूद करण्यात आली असल्याने ते कामे होण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे यासाठी निधी वाढवून द्यावा, अशी मागणी नगरसेवक दीपक चव्हाण यांनी केली.

तसेच अनेक नागरिकांना घरकूल योजनेचा तिसरा हप्ता अद्यापही प्राप्त झालेला नाही, घरकुलांची कामे रखडलेली आहेत. त्यामुळे तिसरा हप्ता मिळण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर मुख्याधिकारी यांनी म्हाडाकडे याबद्दल पाठपुरावा सुरु असल्याचे सांगितले. नगरसेवक अंजुम शेख म्हणाले, दक्षिण भागाच्या भुयारी गटारीसाठीच्या एसटीपी प्लॅनची जागा पालिकेने खरेदी न केल्यास भुयारी गटारीचा 40 कोटी खर्च वाया जाईल. तसेच कचर्‍याचा प्रश्नही मोठा असून बायोमाईन प्रक्रिया सुरू करावी.

खा. गोविंदराव आदिक कल्याण मंडप 3 वर्षापासून धूळ खात पडला आहे, तो सुरू व्हावा, असे सांगत सर्व महापुरुषांच्या पुतळ्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येते. मात्र आपण खरच कायदेशीररित्या पुतळा बसवू शकतो का? आणि नसेल तर हे राजकारण कशासाठी? कुठपर्यंत चालणार? असे सवाल त्यांनी केले.

याबाबत अनुराधा आदिक यांनी सभागृहाला सांगितले की, शेख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत दुरुस्ती करुन कारवाई करण्यात येईल. सरकारकडे जमिनीसाठी प्रयत्न सुरु आहेत. बायोमाईनचे कामही प्रगतिपथावर आहे. मात्र, मध्यंतरी मुख्याधिकारी बदलले म्हणून अडचणी आल्या, असे त्यांनी स्पष्ट केले.

पालिकेला डिसेंबरमध्ये एसटीपी प्लॅन संदर्भात 1 लाख 30 हजार रुपये भरुन जागा घेण्यासंदर्भात ठराव मागितला होता. मात्र पालिकेने तीन महिने झाले तरी, तो केला नाही. यावर नगराध्यक्षा आदिक यांनी असे कुठलेही पत्र पालिकेला आले नाही, असे निदर्शनास आणून दिले. त्यावर सदर पत्र श्रीनिवास बिहणी यांनी सभागृहाला दाखविले.

त्यावर माझ्याकडे ते पत्र नाही, आणि ते तुमच्याकडे कसे आले? असा सवाल आदिक यांनी केला. याचा अर्थ राजकारणासाठी कोणीतरी अशाप्रकारे ते पत्र माझ्यापर्यंत येऊ दिले नाही. कारण ते तुम्हाला मिळते अन मला मिळत नाही. त्याबद्दल माझा शंका आहे, असे आदिक म्हणाल्या. ज्या अधिकार्‍यांनी हे पत्र लपविले असेल त्या अधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी सभागृहातून करण्यात आली.

शहरामध्ये अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे काही नगरसेवकांनी सांगितले. तसेच पालिकेत विरोधी नगरसेवकांच्या प्रभागामध्ये कामे होत नाहीत. अनेक वेळा पाठपुरावा करुन देखील त्यांना वेठीस धरले जाते, असे आरोप नगरसेविका सौ. अशा रासकर यांनी केला. सभागृहात झालेल्या चर्चेत अनेक नगरसेविका व नगरसेवकांनी सहभाग घेतला.

नगराध्यक्षांचे अधिकार्‍यांना खडेबोल
श्रीरामपूर नगरपरिषदेचा काल सादर झालेला बजेटमध्ये मोठ्या त्रुटी दिसून आल्या. त्यामध्ये अनेक हेडला तरतूद शून्य तर काही हेडच बजेट मधून गायब होते. यावर उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी संबंधित अधिकार्‍यांना विचारणा केल्यावर फज्जा उडाला. नगराध्यक्षा आदिक यांनी सभेसमोर अधिकार्‍यांना खडे बोल सुनावले. आणि याची कल्पना मला अगोदर का दिली नाही, अशी विचारणा अधिकार्‍यांना केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या