श्रीरामपुरात पहिलाच पाऊस तीन इंच

jalgaon-digital
5 Min Read

उभ्या पिकांचे नुकसान, खरिप हंगाम पूर्व मशागतीला येणार वेग; शेतकर्‍याच्या आशा पल्लवीत

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या पावसाने सर्वदूर दमदार हजेरी लावली. श्रीरामपुरात 3 इंच पावसाची नोंद झाली आहे. वादळी वार्‍यासह झालेल्या या पावसामुळे पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी या पावसामुळे खरीप हंगाम पूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

श्रीरामपूर 71 मिमी, वडाळा 30 मिमी, कारेगाव 38, मालुंजा 32 मिमी याप्रमाणे तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली होती. मात्र जून महिन्याच्या प्रारंभीच जोरदार पाऊस झाल्याने उन्हाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे. तर तालुक्यात अनेक भागातील पाणी पातळीही खालावल्याने ऊस, मका, घास आदी पिकांना पाण्याची गरज होती. या पावसामुळे अशा पिकांनाही जीवदान मिळाले आहे. तर जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस झाल्याने चालू यावर्षी वेळेवर खरिपाची पेरणी होईल, अशी आशा आहे.

दरम्यान, वादळी वार्‍यासह तालुक्यातील बेलापूर, उक्कलगाव, पढेगाव, वांगी, खिर्डी, उंबरगाव, मातापूर, अशोकनगर, कारेगाव, भोकर, खोकर सह सर्वदूर पावसाने हजेरी लावली. काही भागात वादळामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. काल दुपारपर्यंतही अनेक भागात वीज सुरळीत नसल्याचे दिसून आले.

वांगी वार्ताहराने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, रविवारी रात्री वांगी, खिर्डी, गुजरवाडी, कारेगाव, भेर्डापूर या परिसरात रात्री दहा ते एक वाजेपर्यंत तीन तास विजेचा कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. अचानक आलेल्या पावसामुळे कांदा झाकण्यासाठी काही शेतकर्‍यांची मोठी धांदल उडाली. सध्या विहीर, बोअरवेलला मुबलक पाणी असूनही सातत्याने होणार्‍या लोडशेडिंगमुळे ऊस, मका, चारा पिके धोक्यात आली होती.

अशावेळी झालेल्या पावसामुळे दुष्काळी वेदना सोसल्या. आजवरी झाली वरुण राजाची कृपा, आनंदित झाला शेतकरी. या काव्यपंक्तीप्रमाणे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलला असून खरीप पिकाच्या मशागतीसाठी आणि खते बियाण्यासाठी तयारीला लागला आहे. हा पाऊस दिलासादायक असला तरी काही प्रमाणात नुकसानही झालेले आहे. वांगी बुद्रुक शिवारात रामकृष्ण थोरात यांच्या मालकीचे 20 कांड्यापर्यंत वाढ झालेले दोन एकर उसाचे पीक भुईसपाट झाले आहे. एकंदरितच पहिलाच पाऊस बर्‍यापैकी झाल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

यावर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकाची पेरणी वेळेवर होईल अशी आशा आहे. तर खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन करून खते व बियाणांचा पुरवठा करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

चालू वर्षी बियाणांचे वाढते भाव व टंचाई परिस्थिती लक्षात घेता पहिलाच पाऊस झाल्यानंतर काल श्रीरामपुरातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकर्‍यांनी बियाणे व खतांसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. मागील दोन महिने लॉकडाऊनच्या काळात काहीकाळ शेती संबंधी वस्तू खरेदीसाठी शेतकर्‍यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आता पुन्हा ती वेळ ओढावू नये म्हणून शेतकरी आताच बियाणे, खते खरेदीसाठी घाई करताना दिसत आहेत.

नेवासा तालुक्यात जूनच्या प्रारंभीच सरासरी 43 मिलिमीटर पाऊस

वादळी पावसाने ऊस पिके भुईसपाट; सलाबतपूर येथे सर्वाधिक 97 मिलिमीटर पावसाची नोंद

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यात रविवार दि.31 मे रोजी रात्री वादळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान केले. तालुक्यात सरासरी 43.62 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जूनच्या सुरुवातीलाच झालेल्या या पहिल्या वादळी पावसाने आडसाली ऊस पिके भुईसपाट झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.
हवामान खात्याने उत्तर मध्य महाराष्ट्रासाठी दि. 31 मे 2020 रोजी वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा दिला होता.

त्यात दि. 31 मे, दि.1 व 2 जून 2020 रोजी पुणे व अहमदनगर, धुळे, नंदूरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी वेगवान वादळी वार्‍यासह (30 ते 40 किमी प्रति तास वेग) पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. या अंदाजाप्रमाणे रविवारी रात्री 8:30 वाजेपासून नेवासा तालुक्यातील बहुतांशी गावामध्ये वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. वादळ वार्‍यामुळे पिकांची पडझड झाली. मात्र पहिल्याच पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. या पावसाने वातावरणातील उष्णता कमी झाली. जमिनीत पेरणीयोग्य ओलावा निर्माण झालेला आहे. भेंडा परिसरात 80 मिमी पाऊस झाल्याने ओढे-नाले वाहते झाले आहेत.

वादळी वार्‍यामुळे रात्रभर शेती आणि घरगुती वीजपुरवठा खंडित झाला होता. तालुक्यात वादळामुळे काही ठिकाणी झाडेही पडली. नेवासा तालुक्यातील ऊस पिके जमीनदोस्त झाल्याने मोठे नुकसान होणार आहे. साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होण्यास अजून 4 महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत भुईसपाट झालेल्या उसाचे नुकसान होणार आहे. नेवासा तालुक्यात 127 महसुली गावे असून या गावांसाठी 8 महसूल मंडले आहेत.

मंडलनिहाय झालेल्या पावसाची आकडेवारी अशी…
नेवासा बुद्रुक (38 मिमी), नेवासा खुर्द (31 मिमी), कुकाणा(52 मिमी), सलाबतपूर (97 मिमी), वडाळा बहिरोबा (31 मिमी), घोडेगाव (37 मिमी), चांदा (17 मिमी), सोनई(56 मिमी), भेंडा बुद्रुक (80 मिमी).

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर मंडळात सर्वांधिक 97 मिमी पावसाची नोंद झाली.त्या खालोखाल सोनई मंडल 56 मिमी तर कुकाणा मंडलात 56 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वात कमी पाऊस चांदा मंडलात 17 मिमीची नोंद झाली आहे.

वादळी पावसाने तालुक्यातील ऊस पिकांचे मोठे नुकसान झालेले असून या आपत्तीग्रस्त ऊस पिकांचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, नेवासा तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *