Friday, April 26, 2024
Homeनगरबनावट नवरी उभी करून श्रीरामपूरच्या व्यापार्‍याची फसवणूक

बनावट नवरी उभी करून श्रीरामपूरच्या व्यापार्‍याची फसवणूक

सोन्याच्या दागिन्यांसह तीन लाख 48 हजार घेऊन नवरी व दलाल पसार

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – बनावट नवरी उभी करून श्रीरामपूरमधील एका तरुण व्यापार्‍याची सुमारे तीन लाख 48 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी नवरीसह चार जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणामुळे यापूर्वी श्रीरामपुरात घडलेल्या बनावट नवरी प्रकरणाला उजाळा मिळाला आहे.

- Advertisement -

या प्रकरणी सुमित कैलास पांडे (रा. बेलापूर रोड, वॉर्ड नं. 7 श्रीरामपूर) यांनी शहर पालिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, आमच्या समाजात मुलींचे प्रमाण कमी असल्याने माझ्या विवाहासाठी नातेवाईकांनी प्रयत्न सुरू केले. माझा चुलतभाऊ औरंगाबाद येथे राहत असल्याने त्यानेही प्रयत्न केले. दरम्यान आरोपी राहुल रजपूत उर्फ कल्याण फकीरराव राऊत याने माझ्या चुलत भावाची भेट घेऊन मी दलाली घेऊन इच्छुक मुलामुलींचे लग्न लावून देत असल्याचे सांगितले व तीन लाख रुपये दलालीची मागणी केली.

लग्न करण्याच्या चांगल्या हेतूने 18 जानेवारी 2020 रोजी रांजणगाव एमआयडीसी औरंगाबाद येथे आरोपींनी फिर्यादीला मुलगी दाखविली तिचे नाव मेघा संजय कटारिया असल्याचे सांगून तिचे आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला आदी कागदपत्रेही दाखवले. मात्र दलालीची रक्कम जास्त असल्याने बैठक निष्फळ ठरली.

त्यानंतर आरोपी मुलीसह श्रीरामपुरात आले व लग्न निश्चित करण्याचा आग्रह धरला. शेवटी तडजोडीअंती 2 लाख 21 हजार रुपये दलालीची रक्कम ठरली. 19 जानेवारी 2020 रोजी केशव गोविंद बनात लग्न लावण्याचे ठरवले. कर्ज काढून व मित्र नातेवाईक यांच्याकडून रक्कम गोळा करून दलालीपोटी 2 लाख 21 हजार रुपये राहुल राऊत व अश्विनी कांबळे यांच्याकडे सुपूर्द केली. तर 1 लाख 25 हजार रुपयांचे नवरीला दागिने केले. तिला एक मोबाईलही दिला.

लग्न समारंभ पार पडल्यानंतर आम्ही एक दोन दिवस तिला औरंगाबाद येथे घेऊन जातो नंतर पाठवू असे त्यांनी सांगितले. मात्र नवरी परत नांदायला येईना म्हणून मी माझ्या भावामार्फत नवरी मुलगी व आरोपींशी संपर्क केला मात्र ती लवकर येईल असे आश्वासन दिले. मात्र नवरी मुलगी न आल्याने पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद येऊ लागला. अनेक प्रयत्न करूनही यश न आल्याने आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 13 मार्च 2020 रोजी सुमित कैलास पांडे (रा.बेलापूर रोड, वॉर्ड नं. 7 श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राहुल रजपुत उर्फ कल्याण फकीरराव राऊत, निता राहुल राऊत, (दोघे रा. पुंडलिकनगर, औरंगाबाद), मेघा संजय कटारिया, अश्विनी कांबळे यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या