Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीरामपूरच्या बाजारपेठेचा ‘फॉर्म्युला’ आज ठरणार

श्रीरामपूरच्या बाजारपेठेचा ‘फॉर्म्युला’ आज ठरणार

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरातील दुकाने पुन्हा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ही दुकाने सुरु करण्याचा ‘फॉर्म्युला’ आज (बुधवारी) प्रशासनाशी बैठक होऊन ठरणार असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर शेख यांनी दिली.

शासनाच्या नियम व अटी प्रमाणे शहरातील दुकाने सुरू करण्यासाठी शासकीय पातळीवर चर्चा करुन निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होईल, अशी माहिती नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी दिली. मंगळवारी दुपारी प्रांतकार्यालयात लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस खासदार सदाशिवराव लोखंडे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलिस उपअधिक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, मुख्याधिकारी डॉ.समीर शेख उपस्थित होते.

- Advertisement -

शहारातील व्यापार सुरळीत सुरु करा अशी व्यापार्‍यांची मागणी होती. नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी तर उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क केल्यानंतर व्यवहार पूर्ववत सुरु झाले होते. नागरिकांनी रस्त्यावर व दुकानात जास्त गर्दी झाल्याने प्रशासनाने शहरातील दुकाने बंद केली होती.

काल झालेल्या बैठकीत सर्व शासकीय नियमांचे पालन करुन योग्य ती उपाययोजना करुन सर्व प्रकारची खबरदारी घेऊन श्रीरामपूरच्या नागरिकांची आणि व्यापार्‍यांची काळजी घेऊन बाजारपेठ सुरळीतपणे चालू व्हावी याकरिता उपस्थितीत असलेले लोकप्रतिनिधीं आग्रही होते. त्यानुसार विशिष्ट दिवशी विशिष्ट रोड खुले करावे या धोरणानुसार श्रीरामपुरातील व्यवहार चालू होणार आहेत.

दरम्यान श्रीरामपूर शहरातील बाजारपेठ पुन्हा सुरळीत होण्यासाठी व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली.
यावेळी मंगलमूर्ती कलेक्शन, रंगोली, आनंद डिजिटल लॅब, बजरंग कलेक्शन, बन्सी कलेक्शन, नटराज बुक डेपो, वंदना साडी सेंटर, शाह ब्रदर्सच्या मालकांसह अनेक व्यापार्‍यांनी माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर व्यथा मांडल्या.

व्यापार्‍यांच्या भावना समजून घेत विखे पाटलांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत श्रीरामपूरची बाजारपेठ सुरू करण्याबाबत स्वतः लक्ष घालावे तसेच शासकीय पातळीवर योग्य ती उपाययोजना आखून सर्व प्रकारची खबरदारी घेण्याचेही विखे यांनी सूचविले.

श्रीरामपूर शहरातील बाजारपेठ पुन्हा सुरळीत होण्यासाठी आपचे तिलक डुंगरवाल यांच्यासह पदाधिकार्‍यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी केली होती. लवकरच बाजारपेठ सुरू होऊन व्यापार्‍यांच्या अडचणी दूर होतील, अशी माहिती डुंगरवाल यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या