Thursday, April 25, 2024
Homeनगरनिमगाव खैरी परिसरात एका फार्महाऊसवर गोळीबार

निमगाव खैरी परिसरात एका फार्महाऊसवर गोळीबार

तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव परिसरात एका फार्म हाऊसवर गोळीबार करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. यातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

शहरातील वॉर्ड नंबर 1 मधील दशमेशनगर येथील अमरप्रीतसिंग सरबजितसिंग सेठी यांनी दिलेल्या पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तालुक्यातील खैरी निमगाव येथे शुक्रवारी रात्री मी शेतावर असताना अविनाश माकोणे, सागर धुमाळ व इतर अनोळखी तीन जण कारमध्ये तेथे आले. त्यांनी माझ्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. मी पैसे द्यायला नकार दिला. त्यावर त्यांनी कृष्णा सतिश दायमा व मला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच सागर धुमाळ याने आपल्या जवळील बंदूक काढून मला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली. परंतु मी त्याचा हात वर केल्याने कुणालाही गोळी लागली नाही.

या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अविनाश माकोणे, सागर धुमाळ व इतर तीन अनोळखी साथीदार या संशयितांविरुद्ध गु. र. नं. 96/2020 नुसार भादंवि. कलम 307, 324 तसेच आर्म अ‍ॅक्ट 3/27 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसर्‍या फिर्यादीत सागर विजय धुमाळ यांनी म्हटले आहे की, मी व माझे मित्र अविनाश माकोणे, महेश बोरुडे, अंकुश देठे, प्रमोद कांबळे आम्ही सर्व शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास हॅपी सेठी याच्या फार्महाऊसवर गेलो होतो. तेथे मागील भांडणाच्या कारणावरून बोरुडे याच्या पोटाला सेठी याने चाकू मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता हॅपी सेठी याने व त्याच्या साथीदारांनी मला लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात माझ्या डाव्या हाताच्या बोटास दुखापत झाली आहे.

त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सेठी व त्याचे साथीदार या संशयित आरोपींविरोधात गु. र. नं. 97/2020 नुसार भादंवि. कलम 307, 324, आर्म अ‍ॅक्ट 4/25 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्हीही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक मसूद खान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या