Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

श्रीरामपुरात संचारबंदी सदृश चित्र

Share
श्रीरामपुरात संचारबंदी सदृश चित्र, Latest News Shrirampur Close Rumors Believe No

अफवांवर विश्वास ठेवू नका ; मेडिकल असोसिएशनचे आवाहन

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शासनाकडून कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून जनजागृती सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार श्रीरामपुरातील सर्व दुकाने बंद ठेण्यात आली. श्रीरामपूरकरांनीही शासन आदेशाचे पालन केल्याने काल दुपारपासून सर्वत्र संचारबंदी सदृश चित्र दिसत होते.

पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस पथकांनी ध्वनीक्षेपक लावून दुकानदारांना बंदचे आवाहन केले. दुकानदारांनीही त्यास प्रतिसाद देत तातडीने दुकाने बंद केली. यामुळे व्यावसायिकांसह नागरिकांची काही काळ धावपळ झाली. दुपारी चार नंतर शहराला संचारबंदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे शहरात संचारबंदी लागू झाल्याची अफवा पसरली होती. श्रीरामपुरात बंदचे आदेश देण्यात आल्यानंतर काही वेळातच श्रीरामपुरात शांतता पसरली होती. बसस्टॅण्ड परिसरातही शुकशुकाट होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मीक, क्रीडाविषयक कार्यक्रम, यात्रा, उत्सव, मिरवणूक, उरुस तसेच मंगलकार्यालये, लॉन्स, हॉटेल्स अथवा अन्य वास्तूंमधील मॅरेजहॉल तसेच अन्य विवाह स्थळांच्या ठिकाणांचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. तसेच कार्यशाळा, मेळावा, सभा, मोर्चा, आंदोलन, कॅम्प, प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करता येणार नाही, असे आदेश दिलेले आहेत.

दरम्यान शहरात अफावांचे पेव फुटले आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा व समाज युद्धपातळीवर कार्यरत असताना समाजात काही लोक अफवा पसरविणारे मेसेच फॉरवर्ड करून जनतेची दिशाभूल करताना दिसत आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात भीती, संभ्रम निर्माण होत आहे. श्रीरामपूर येथील काही डॉक्टर्स यांच्याविषयी अशीच अफवा पसरवण्यात आली आहे.

प्रत्यक्ष चौकशी केल्यावर असे काहीही झाले नसून त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे व त्यांचा रुग्णसेवेचा ध्यास अखंड सुरू असल्याचे आढळले आहे. तरी नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, खात्री करुनच पुढे मेसेज पाठवावे व आपण जबाबदार नागरिक असल्याचे भान ठेवावे, असे आवाहन श्रीरामपूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!