Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपुरात पुन्हा लॉकडाऊन

श्रीरामपुरात पुन्हा लॉकडाऊन

नियम व अटींचे पालन न केल्याचे कारण, तहसीलदार प्रशांत पाटील यांचा आदेश

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरातील व्यवसाय सुरू करण्यात आले. परंतु व्यावसायिक व नागरिकांतून सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडाला. पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही. अनावश्यक गर्दी केली. त्यामुळे सोमवार दि. 18 मे पासून जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश तहसीलदार प्रशांत पाटील यांनी मुख्याधिकार्‍यांना दिले. सदर आदेशाचे पालन करत मुख्याधिकारी समीर शेख यांनी सोमवारपासून पुढील आदेश येईपर्यंत दुकाने बंद राहतील असे, जाहीर केले आहे.

- Advertisement -

प्रशासनाने नियम व अटी घालून देऊन मोठ्या कालावधीनंतर श्रीरामपूरची बाजारपेठ खुली झाली होती. मात्र, बाजारपेठ खुली झाल्यानंतर व्यवसायिक व नागरिक यांच्याकडून नियमांचे पालन झाले नाही. त्यामुळे प्रशासनाने बाजारपेठ पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या कालावधीनंतर लॉकडाऊनमधून सूट देण्यात यावी, अशी मागणी व्यापार्‍यांनी सातत्याने केली होती. त्यास प्रतिसाद देत प्रशासनाने दि. 13 मे पासून काही नियम घालून देऊन बाजारपेठ खुली केली होती. यावेळी दुकानदारांनी व पालिका प्रशासनाने गर्दीचे व इतर नियम पाळणे अपेक्षीत होते. मात्र तसे न झाल्याने शेवटी बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे.

याबाबत तहसीलदार प्रशांत पाटील यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे, की श्रीरामपूर तालुक्याच्या हद्दीत लॉकडाऊनचे पूर्णपणे पालन झाले. त्यामुळे तालुक्यात करोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. तथापि शासनाच्या सुधारीत आदेशानुसार आर्थिक उलाढाली सुरू होणे आवश्यक असल्याने सोशल डिस्टन्सिंग अबाधित राहून शासनाच्या आदेशाच्या अधीन राहून इतर दुकाने उघडण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने आपण शहरातील दुकाने सुरू करण्याचा आदेश दिला, मात्र मागील तीन दिवसांत असे निदर्शनास आले आहे, की गावातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहेत.

तसेच दुकानांसमोर ग्राहकांचे सोशल डिस्टन्सिंग राखण्यात दुकानदारांना पालिका प्रशासनाला मर्यादा येत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास दीर्घकाळ रोखून ठेवलेला करोना विषाणूचा प्रादूर्भाव श्रीरामपूर शहरात व तालुक्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जिविताचे रक्षण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याने बाजारपेठेतील दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद करावी.

तहसीलदारांचा हा आदेश मिळताच मुख्याधिकारी समीर शेख यांनी तत्काळ त्याची अंमलबजावणी करत श्रीरामपूर सोमवारपासून पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊन तसे पत्रक पसिध्दी दिले आहे.

अन्यथा कारवाई होणार
सोमवार दि. 18 मे पासून श्रीरामपूर शहरातील जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचा भंग करून कोणी दुकाने सुरू ठेवल्यास भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथ रोगप्रतिबंधात्मक कायदा 1897 अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या