श्रीरामपूर शहरात लॉकडाऊन कायम

jalgaon-digital
2 Min Read

दुकाने उघडणार्‍या तीन व्यावसायिकांवर गुन्हे दाखल

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- अत्यावश्यक सेवा वगळता पूर्वीप्रमाणे श्रीरामपूर शहरात जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार लॉकडाऊन असल्याची माहिती प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली. दरम्यान दुकानेेे उघडल्या प्रकरणी तीन व्यावसायिकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

3 मे नंतर लॉकडाऊन उघडणार असे पूर्वीचे शासनाचे निर्देश असल्याने व्यापारी असोसिएशनचे शिष्टमंडळ प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांना भेटले. त्यांना भेटून शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक मसूद खान, आमदार लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, भाजपाचे प्रकाश चित्ते, किरण लुनिया, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, विशाल भोपळे, अमेय ओझा यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.

त्यावेळी व्यापार्‍यांनी दुकाने उघडण्यास संदर्भात प्रांताधिकारी अनिल पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार रस्त्यालगत असणार्‍या पाच किंवा पाचपेक्षा जास्त दुकानांच्या रांगेत अत्यावशक सेवेचे एकच दुकान उघडण्यास परवानगी आहे. बाकी सर्व नियम लॉकडाऊन काळामध्ये जसे होते तसेच आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी अद्यापपर्यंत अत्यावश्यक सेवेमध्ये असणारी दुकाने वगळता इतर कोणतेही दुकाने उघडण्यास परवानगी नाही, असे रिक्षा लावून व्यापारी असोसिएशनने व्यापार्‍यांना कळविण्याचे ठरले.

3 मे नंतर दुकाने सुरू होणार अशी चर्चा असल्याने शहरातील रेल्वे स्टेशन समोरील तुषार कम्युनिकेशन, राधिका हॉटेल शेजारील विश्व डिजिटल जम्बो झेरॉक्स तसेच जुह कॉम्प्लेक्समधील कॉटन किंग हे कपड्याचे दालन व्यावसायिकांनी उघडले होते. परंतु तसे काही निर्देश नसतानाही त्यांनी आपली दुकाने उघडली म्हणून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *