Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीरामपूरमधील गर्दीस शहर पोलिस जबाबदार !

श्रीरामपूरमधील गर्दीस शहर पोलिस जबाबदार !

फळविक्रेते व पोलिस मित्राच्या नावाने अनेकांना ओळखपत्रांची ‘खिरापत’

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – कोरोना व्हायरसने अवघ्या विश्वामध्ये थैमान घातले आहे. या विषाणूचा जास्त उपद्रव होऊ नये, म्हणून केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण देशात तसेच राज्यातही लॉकडाऊन घोषित केले. नागरिकांना गर्दी न करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. परंतु, श्रीरामपूर शहरात मात्र वेगळेच चित्र पहावयास मिळत आहे. फळविक्रेते तसेच पोलिस मित्र च्या नावाने अनेकांना बोगस ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. हे पास श्रीरामपूर शहर पोलीस व नगरपालिका यांच्याकडून देण्यात आले आहेत. बोगस पास दिल्याने शहरातील रस्त्यावर लॉकडाऊन मध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळत आहे. या गर्दीसाठी पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचे चर्चा नागरिकांत आहे.

- Advertisement -

सध्या संपूर्ण विश्व कोरोना व्हायरसमुळे थांबले आहे. प्रत्येक जण आपल्या घरामध्ये कामधंदा सोडून बसला आहे. कोरोना व्हायरस हा एका माणसापासून दुसर्‍या माणसांपर्यंत संक्रमित होत असल्याने, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर केले. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर केले. देशात संचारबंदी लागू आहे. त्याअंतर्गत नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास निर्बंध आले आहेत. त्यामुळे सर्वत्र शहरातील रस्ते अगदी ओस पडलेली आहे. परंतु याला श्रीरामपूर शहर मात्र अपवाद आहे.

पोलीस प्रशासनाकडून फळ विक्रेते व पोलिस मित्र या नावाखाली मोठ्या प्रमणावर बोगस ओळखपत्रांचे वाटप करण्यात आल्याने शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. त्यामुळे शासनाने घालून दिलेले निर्बंध फक्त सामान्य नागरिकांसाठी आहे का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. या ओळखपत्रांची वरिष्ठ अधिकार्‍यांनी चौकशी करावी, अशी मागणीही होत आहे.

महत्वाच्या कामासाठी आलेल्या सामान्य नागरिकांवर कारवाई केली जाते. काल शहरातील शिवाजी चौकामध्ये पोलीस निरीक्षकांकडून अनेक वाहनधारकांच्या गाड्यांचे हेडलाईट, डिफर, इंडिकेटर, गाड्यांची खोपडी तसेच मोठ्या वाहनांच्या काचा फोडून कारवाई करण्यात आली. वास्तविक पाहता वैद्यकीय अथवा इतर जिवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सवलत दिलेली असताना श्रीरामपुरात पोलिसांकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे पोलिसांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

चोर सोडून संन्याशाला फाशी
पालिका अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासन यांच्याकडून शहरातील अनेकांना फळ विक्रेता म्हणून खैरात वाटावी तसे पास चे वाटप करण्यात आले आहे. त्यांचीच संख्या जास्त असल्याने शहरातील रस्त्यावर गर्दी दिसत आहे. ग्रामीण भागातील नागरिक मेडिकल किंवा किराणा आणण्यासाठी शहरात जातात, त्यांची विचारपूस न करता त्यांच्यावर पोलिस दंबगगिरी करुन त्यांच्या वाहनांचे नुकसान केले जात आहे.

अनेक पोलिस मित्रांची नियुक्ती
पोलिसांचे संख्याबळ कमी असल्याने अनेक पालिका कर्मचार्‍यांना पोलिस मित्र असे ओळखपत्र देऊन पोलिस मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना कायदा व सुव्यवस्थेचे काहीच ज्ञान नसल्याने याचा त्रास मात्र ग्रामीण भागातून येणार्‍या नागरिकांना होत आहे. त्यांच्याकडून नागरिकांवर हाणामारीच्या घटना घडत आहेत. या प्रकाराला नागरिक वैतागले असून याकडे वरिष्ठांनी लक्ष घालावे अशी, मागणी नागरिक करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या