Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

माझी खुर्ची राजकारणाची नाही : आदिक

Share
माझी खुर्ची राजकारणाची नाही : आदिक, Latest News Shrirampur Adik Statement Palika Caa Nrc

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यास विरोध ठरावावरून श्रीरामपूर पालिकेच्या सभेत खडाजंगी

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पक्षाची भूमिका सी.ए.ए. व एन.आर.सी. कायद्याच्या विरोधात स्पष्ट केली आहे. पक्षाच्या भुमिकेशी मी सहमत आहे. परंतु मी ज्या खुर्चीवर आहे. त्याठिकाणाहून या कायद्याच्या विरोधात ठराव करण्यासाठी सर्व नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. माझी खुर्ची राजकारण करण्याची नाही, अशी भुमिका नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी स्पष्ट केली.

नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतर ऐनवेळेच्या विषयात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आमचा विरोध असल्याचे अंजुम शेख, मुजफ्फर शेख यांनी सांगितले. अन् पालिकेच्या सभागृहाने तसा ठराव घेण्याची मागणी त्यांनी केली. यादरम्यान या कायद्याचे समर्थन व विरोध करणार्‍या नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यावेळी नगराध्यक्षा यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

यावेळी मुजफ्फर शेख म्हणाले की, एका जातीला टार्गेट करुन हा कायदा करण्यात आला आहे. मात्र, हा देश सर्वांचा आहे. कोणाच्या एकट्याच्या बापाची जहागिरी नाही. हा कायदा देशातील 130 कोटी लोकांना रांगेत उभा करणार आहे. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यावे लागणार आहेत. आमचे पुरावे काढायला गेले, तर देशच आमच्या नावावर करावा लागेल, असे मुजफ्फर शेख म्हणाले.

या कायद्याचा त्रास हिंदू समाजातील लोकांनाही होणार आहे. मात्र, मुस्लिमांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात आली आहे. सरकारला या कायद्याच्या आडून आरक्षण संपवायचे आहे. आम्ही 600 वर्ष राज्य केले आहे, मेलो तरी आम्ही येथेच राहणार आहोत. त्यामुळे आम्हाला काढण्याचा प्रश्न नसल्याचे ते म्हणाले.

यावेळी अंजुम शेख यांनी पालिकेत काँग्रेसचे 22 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे 6 असून त्यांची भुमिका या कायद्यास विरोध करण्याची आहे. त्यामुळे कोण हजर आहे, किंवा नाही याचे आम्हाला घेणेदेणे नाही. ज्यांना ठरावाचा विरोध करायचा त्यांना करू द्या, ज्यांना समर्थन द्यायचे ते देणार आहेत, असे ते म्हणाले.

अंजुम शेख यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात जो ठराव मांडला त्या ठरावाला आमचा पाठिंबा असल्याचे नगरसेवक संजय फंड यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे नगसेवक रवी पाटील, किरण लुणिया, जितेंद्र छाजेड, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यास आमचा पाठिंबा असल्याचे लेखीपत्र नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांना दिले. त्यानंतर प्रत्येकाने यावर आपली भूमिका मांडावी असे ठरले.

यावेळी रवी पाटील म्हणाले की, प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान आहे. येथील मुस्लिमांना आमचा विरोध नाही, परंतु बाहेरून येणार्‍यांना विरोध आहे. फाळणी झाली तेव्हा 25 टक्के हिंदू पाकिस्तानामध्ये होते, आज ते एक ते दोन टक्केही राहिले नाहीत, मात्र त्यावेळी जेवढे मुस्लिम बांधव भारतात होते, ते कित्येक पटीने वाढले आहेत.

याचा अर्थ येथे सर्वांना चांगल्या वातावरणात राहता येते, हे स्पष्ट होते. प्रत्येक देशात आपल्या देशातील नागरिकांची नोंद असते. आपल्याकडेही शिस्त लागली पाहिजे. त्यामुळे या कायद्याला आमचा पाठिंबा असल्याचे रवी पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपाचे किरण लुणिया यांनी हा कायदा देशहिताचा आहे, त्यामुळे या कायद्यास आमचे पूर्ण समर्थन असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी प्रत्येक नगरसेवकांनी आपले म्हणणे मांडले. उपस्थित नगरसेवकांपैकी 19 नगरसेवकांनी सी.ए.ए. व एन.आर.सी. कायद्याला विरोध दर्शविला तर सात नगरसेवकांनी समर्थन केले. शेवटी प्रत्येक नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय हा ठराव संमत होणार नाही, असे नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी स्पष्ट केले.

अफवांवर विश्वास ठेवू नका : नगराध्यक्षा
सी.ए.ए. व एन.आर.सी. विरोधात ठराव करण्याबाबत पत्र दिल्याने सभागृहात संभ्रामावस्था निर्माण झाली. हा विषय ऐनवेळच्या विषयात न घेता अजेंड्यावर घेऊन बहुमताच्या बाजूने ठराव होईल, माझी भुमिका स्पष्ट आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांनी सी.ए.ए. व एन.आर.सी. कायद्याला विरोध करून आपली भुमिका स्पष्ट केली आहे. पक्षाच्या भुमिकेशी मी सहमत आहे. यापूर्वी शहरात या कायद्याविरोधात संविधान बचाव कृती समितीच्यावतीने झालेल्या आंदोलनात मी व माझे सहकारी नगरसेवक सहभागी झालो होतो. त्यामुळे आमची भुमिका दुटप्पी असण्याचे कारण नाही. पुढील सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय अजेंड्यावर घेण्यात येईल. या सभेमध्ये अनेक नगरसेवक गैरहजर होते. पुढील सभेमध्ये त्यांची मते घेतली जातील. तेव्हा बहुमताच्या बाजूने ठराव मंजूर केला जाईल, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केले.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!