Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीगोंदा-जामखेड-मांजरसुंबा-केज-घाटनांदूर नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरू

श्रीगोंदा-जामखेड-मांजरसुंबा-केज-घाटनांदूर नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरू

आमदार बबनराव पाचपुते : सर्वेक्षणासाठी 34 लाखांची तरतूद

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – 15 वर्षांपूर्वी नगर-परळी हा रेल्वे मार्ग मंजूर झाला; परंतु तो आष्टीमार्गे बीडकडे वळविल्याने जामखेडकरांच्या तोंडाला पाने पुसली गेली. आता श्रीगोंदा-जामखेड- मांजरसुंबा-केज-आंबेजोगाई-घाटनांदूर या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 34 लाख रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.

- Advertisement -

आंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूरपासून रेल्वे सर्वेक्षणाचे स्टोन मार्किंग करण्याचे काम सुरू झाले आहे. या रेल्वे मार्गामुळे श्रीगोंदा-जामखेडच्या विकासात भर पडणार आहे. दौंड जंक्शन नंतर श्रीगोंदे तालुक्यात नवीन जंक्शन बनविण्यात येणार आहे असे रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विन लौहानी यांनी सांगितले.

सर्वेक्षणाची टीम काल श्रीगोंदा येथे येऊन आमदार पाचपुते यांना भेटून गेली. या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता दिल्याबद्दल विशेष करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी खासदार दिलीप गांधी या सर्वांचे आमदार बबनराव पाचपुते यांनी मतदारसंघातील जनतेच्या वतीने आभार व्यक्त केले.

चाकण-आंबेजोगाई राष्ट्रीय महामार्ग
चाकण शिक्रापूर-नाव्हरा-मांडवगण-काष्टी-श्रीगोंदा-जामखेड -आंबेजोगाई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डी चा पहिला टप्पा सुरु झाला असून, त्यासाठी 256 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. रेल्वे मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग केंद्र सरकारने हाती घेल्यामुळे या भागाचा कायापालट होईल असेही, आमदार पाचपुते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या