Wednesday, April 24, 2024
Homeनगरशिर्डी उपविभागात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

शिर्डी उपविभागात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

कोपरगाव तालुक्यात दरोड्याच्या तयारीत असलेले दोघे जेरबंद, 7 जण पसार

शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डी उपविभागात पोलिसांनी कोपरगाव, राहाता, लोणी या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबविले असून यात कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले तर अन्य 7 जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले तर अजामीनपात्र वॉरंटमधील कोपरगाव, राहात्याच्या प्रत्येकी 7 तर लोणीचे 5 अशा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

नगर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे, कोपरगाव पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, अनिल कटके, शिर्डी पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, राहाता पोलीस निरीक्षक सुभाष भोये, लोणी सपोनि एन. बी. सूर्यवंशी व पोलीस कर्मचार्‍यांनी कोपरगाव शहर व तालुका, राहाता शहर व तालुका, लोणी परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवून मोठी कारवाई केली.

कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत रात्री वेळापूर ते चासनळी रस्त्यावर वेळापूर शिवारात ब्राह्मण नाल्याजवळ भुर्जा उर्फ अर्जुन गोपाल पिंपळे, रा. सुरेगाव, शरद गोटीराम फुलारी पोहेगाव, जालू उर्फ अनिल ओपिन पिंपळे, संतोष मुन्शी चव्हाण, शरद ओपिन पिंपळे, तोलाराम उर्फ राजू विठ्ठल पिंपळे, बाबू बाबडी पिंपळे, ताईबाई ताराचंद काळे सर्व रा. सुरेगाव, किरण छगन सोनवणे, दत्तनगर कोपरगाव हे 9 जण घातक शस्त्र बाळगून दरोडा टाकण्याच्या तयारीत अंधारात दबा धरून बसले असताना पोलिसांनी छापा टाकला. यातील अर्जुन पिंपळे व शरद फुलारी या दोघांना अटक करण्यात आली असून अन्य सात जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

पोलिसांनी या दोघांची झडती घेतली असता त्यात तीन बिगर नंबरच्या मोटारसायकली, कोयता, लाकडी दांडे, सुती दोरी, मिरची पावडर अशा प्रकारची हत्यारे व साधने मिळून आली. या दोघांची चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी मोटारसायकल चोरीचे तसेच घरफोड्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 41/2020 प्रमाणे 9 जणांविरुद्ध भादंवि कलम 399, 402 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक कटके करीत आहेत.

तसेच कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत एक अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपी जेरबंद करण्यात आला असून अन्य 6 जामीनपात्र वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे. कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत संतोष भगवान आंबेकर (टाकळी नाका), भाऊसाहेब भिकाजी लोहकणे (गोकुळनगरी), सचिन सिद्धार्थ बागुल (टाकळी फाटा), छबू बन्सी शिंदे (लक्ष्मीनगर), अनिस कालुभाई शेख (हनुमानगर), जालिंदर काशिनाथ आढाव (शिंगणापूर), सुधाकर सोपान ससाणे (संवत्सर) या 7 अजामिनपात्र वॉरंटमध्ये असलेल्यांना कोपरगाव शहर हद्दीत अटक करण्यात आली आहे. तसेच संदीप देविदास थोरात (बँक कॉलनी), रुपेश देविदास थोरात या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत दिलीप सुरसे यास अटक केली असून जामिनपात्र वॉरंटमधील तिघांना वॉरंट बजावण्यात आले आहे. तसेच अन्य तिघे प्रविण चंद्रकांत बनसोडे, अमोल सोमनाथ माळी व राजू अशोक माळी यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे दाखल असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे. शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत दखलपात्र गुन्ह्यातील आयूब नजीर शेख, शरद श्रीधर सदाफळ, सूर्यकांत गोरक्षनाथ मते यांच्यावर 151 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

राहाता पोलीस स्टेशन हद्दीत अशोक चंद्रकांत दोडके, समीर रशीद बेग, मुक्तार सिकंदर सय्यद, सुनील बाळासाहेब गाढवे, रफिक निजाम शेख, इस्माईल निजाम शहा, प्रशांत सुधाकर बनसोडे या सात अजामिनपात्र वॉरंटमधील आरोपींना अटक करण्यात आली. तसेच जामिनपात्र वॉरंटमधील बाळासाहेब बापुराव यादव (नपावाडी) यास वॉरंट बजावण्यात आले आहे. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये शिर्डी विभागात 41 समन्सची बजावणी करण्यात आली असून 48 रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विभागातील तडीपार गुन्हेगार तपासण्यात आले. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, सचिन इंगळे, मिथुन घुगे, श्री. दातरे, पो. उ. निरीक्षक सोनवणे व पोलीस कर्मचारी यांनी कारवाईत भाग घेतला.

  • लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश सर्जेराव साळवे, सिताबाई सर्जेराव साळवे, राजू सर्जेराव साळवे, रंभूबाई राजू साळवे, लक्ष्मण सर्जेराव साळवे, रा. दाढ बु. या पाच जणांना अजामीनपात्र वॉरंटमध्ये अटक करण्यात आली आहे. जामीनपात्र वॉरंटमधील बाळासाहेब संपत बेंद्रे, सचिन बबन बनसोडे, नवनाथ नामदेव निर्मळ, गणेश मोहनराव आहेर यांना वॉरंट बजावण्यात आले आहे.
  • लोणी पोलीस स्टेशनला पाहिजे असलेले नामदेव कारभारी जाटे, अनिल कारभारी जाटे, सुधाकर भानुदास जाटे, रा. गळनिंब यांना अटक करण्यात आली आहे.
  • शिर्डी विभागातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार अग्निशस्त्र बाळगणारे तपासण्यात आले असून यातील आरोपींचा शोध घेण्यात आला व कारवाई करण्यात आली.
- Advertisment -

ताज्या बातम्या