Saturday, April 27, 2024
Homeनगरशिर्डीतील तीन दिवसीय रामनवमी उत्सवाची सांगता

शिर्डीतील तीन दिवसीय रामनवमी उत्सवाची सांगता

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- साईबाबा संस्थानच्या शिर्डीतील श्रीरामनवमी उत्सवास शिर्डी ग्रामस्थांना साई मंदिरात जाऊन दर्शन घेता आले नसले तरीही घरोघरी स्तवनमंजरीचे वाचन करून नऊ दिवे पेटवून साईबाबांच्याप्रती असलेली श्रद्धा प्रकट करून देशावर तसेच राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटापासून रक्षण करा, अशी साद घातली. दरम्यान साईमंदीर विभागाचे पुजारी उल्हास वाळूंजकर यांच्या काल्याच्या किर्तनाने तीनदिवसीय उत्सवाची सांगता करण्यात आली.

साईबाबा संस्थानच्या प्रमुख उत्सवापैकी एक असलेल्या रामनवमी उत्सवाची सांगता शुक्रवारी झाली. शिर्डीत गेल्या तीन दिवसांंपासून श्री रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. काल या उत्सवाचा शेवटचा दिवस होता. पहाटे 4.30 वाजता काकड आरती झाली. 5.30 वाजता श्रींचे मंगलस्नानानंतर सकाळी 6 वाजता शिर्डी माझे पंढरपूर आरती झाली.

- Advertisement -

सकाळी 6.15 वाजता प्रशासकीय अधिकारी सुर्यभान गमे व त्यांच्या पत्नी शोभाताई गमे यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली. सकाळी 7 वाजता श्री गुरुस्थान मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व त्यांच्या पत्नी अंजली डोंगरे यांच्या हस्ते रुद्राभिषेक पुजा करण्यात आली. त्याचप्रमाणे सकाळी 10 वाजता मंददिराचे पुजारी उल्हास वाळूंजकर यांचे काल्याचे कीर्तन झाले.

दुपारी 12 वाजता दहिहंडीचा कार्यक्रम पार पडला. यानंतर नेहमीप्रमाणे मध्यान्ह आरती तसेच सायंकाळी 6.30 वाजता धुपारती, रात्री 10.30 वाजता शेजारती झाली. 109 वर्षाच्या इतिहासात प्रथमच मुख्य उत्सवास कोरोनाच्या संकटामुळे मुकावे लागले आहे. भाविकांविना झालेली रामनवमी उत्सव सुना सुना वाटत असल्याचे ग्रामस्थांनी बोलून दाखवले. तर शहरात रामनवमी निमित्ताने मोठ्या प्रमाणावर स्तवनमंजरी तसेच साईचरीत्र ग्रंथाचे घरोघरी वाचन करून प्रत्येक घरी नऊ दिवे पेटवून साईबाबांप्रती श्रद्धा प्रकट केली. दिव्यांची रोषणाईने शिर्डी शहर प्रकाशाच्या तेजोमयाने उजळून गेल्याचे चित्र बघावयास मिळाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या