Monday, April 29, 2024
Homeनगरजनता कर्फ्युला शिर्डीकरांचा 100 टक्के प्रतिसाद

जनता कर्फ्युला शिर्डीकरांचा 100 टक्के प्रतिसाद

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत दररोज लाखो भाविकांची मांदियाळी असते मात्र कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूच्या माध्यमातून केलेल्या आवाहनास भाविक तसेच शिर्डी ग्रामस्थांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला असून 24 तास गजबजणारे शिर्डी शहरातील रस्ते निर्मनुष्य झाल्याने निरव शांतता रविवारी दिवसभर बघावयास मिळाली.

देशात 348 कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रात 74 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूंंना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दि. 22 रोजी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनास शिर्डीतून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरात सकाळी सात वाजेपासून सर्वत्र शुकशुकाट बघावयास मिळाला आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर वाहनांची वर्दळ व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

कायमच गर्दी असलेल्या साईमंदिर परिसरात निर्मनुष्य होते. शहरातील सर्व व्यवसाय संपूर्णपणे बंद ठेवण्यात आले. न भुतो न भविष्यती अशी शिर्डी अनुभवायला मिळाली. उपनगरात देखील शुकशुकाट होता. सकाळी सात वाजेपासून शिर्डी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिपक गंधाले, सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्यासह पोलीस कर्मचारी शहरात व उपनगरात पेट्रोलींग करून बारीकसारीक घडामोडीवर लक्ष ठेवून होते. तसेच शिर्डी वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक नितिनकुमार गोकावे, पोलीस उपनिरीक्षक श्री. परदेशी यांनीही शहरातील दुचाकीस्वारांना अटकाव करत चौकशी सुरू ठेवली होती.

चौकातील पाँईंटवर वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. हॉस्पिटल तसेच संस्थान कर्मचारी याव्यतिरिक्त तुरळक नागरिक रस्त्यावर दिसून आले मात्र त्यांची पोलिसांनी कसून चौकशी करून त्यांना सोडण्यात आले. एकंदरीतच कधी नव्हे ती शांतता व निर्मनुष्य रस्ते शिर्डीकरांना बघावयास मिळाले. जनता कोरोना संसर्गास रोखण्यासाठी सज्ज झाली असून शिर्डी लॉकडाऊन झाल्याचे चित्र दिसून आले.

सायंकाळी साडेचार वाजता शिर्डी साईबाबा मंदिरात तसेच ग्रामस्थांनी घरोघरी स्तवन मंजिरीचे पठण केले तर साईमंदीर परिसरात पाच वाजता हनुमान मंदिर व द्वारकामाईमध्ये पाच मिनिटे घंटानाद करण्यात आला. अग्निशामक दलाच्या गाडीने सायरन वाजवत शिर्डीत फेरी मारली.

जनता कर्फ्युला राहातेकरांचा 100 टक्के पाठिंबा

पोलिसांकडून टारगटांना प्रसाद; पालिकेकडून औषध फवारणी

राहाता (तालुका प्रतिनिधी)- जनता कर्फ्युला राहाता शहरातील नागरिक, व्यापारी यांनी 100 टक्के बंद ठेवत पाठिंबा दिला. सर्व रस्ते निर्मनुष्य बनले होते. पोलिसांचा दिवसभर खडा पहारा होता. विनाकारण फिरणार्‍या काही टारगटांना पोलिसांकडून प्रसाद देण्यात आला. राहाता नगरपालिकेने औषध फवारणी केली.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्युला राहाता तालुक्यातील नागरिकांनी 100 टक्के प्रतिसाद दिला. शहराबरोबर ग्रामीण भागातही नागरिकांनी स्वतःहोऊन घरात कोंडून घेतल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. सकाळी सहा वाजेपासून सर्वत्र शुकशूकाट दिसत होता. नेहमी वाहतुकीची कोंडी असलेला नगर-मनमाड महामार्गावर शुकशुकाट दिसत होता. नागरिक घराबाहेर पडलेच नाही.

सर्व व्यवहार, सर्व वाहने आज बंद राहिली. नागरिकच रस्त्यावर नसल्याने शहरातील मेडिकलही बंद राहिले सर्व पोलीस मात्र प्रामाणिकपणे दिवसभर शहर, गल्ली व ग्रामीण भागात गस्त घालून टारगट तरूणांच्या टोळक्यांना सूचना देत होते. वाहनांवर फिरणार्‍या काहींना पोलीस खाक्याचा प्रसादही मिळाल्याने सर्वांनी घरात राहणे पसंद केले.

शेतकरी व शेतमजुरांनीही घरात राहणे पसंत केले. हरबरा व गहू सोंगणीची कामे जोरात सुरू असताना सर्वांनी आज शेतातील सर्व कामे बंद ठेवत स्वतःला व कुटूंबाला घरात थांबणे योग्य समजले. सायंकाळी प्रत्येक घरात, सोसायटीत, कॉलिनी व गल्लीत नागरिकांनी घंटानाद व थाळीनाद केला. यात लहान मुलांची संख्या मोठी दिसून येत होती.

राहाता पालिकेकडून संपुर्ण राहाता शहरात दिवसभर औषध फवारणी करण्यात आली. पालिका कार्यालयीन अधिक्षक व आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी स्वतः जातीने औषध फवारणी करणार्‍या मशीन बरोबर संपुर्ण शहरात फिरून प्रथमच दर्जेदार औषधांची फवारणी करीत होते.सकाळी सहा ते संध्याकाळी सहा अशी बारा तास विना थांबा ही फवारणी चालू होती. दोन दिवसात परिसरातील वाड्या वस्त्यांवरही ही फवारणी केली जाईल असे पालिका आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

लॉकडाऊनच्या निर्णयाने भयभीत होवू नका, आपत्तीला धैर्याने सामोरे जावू ः आ. विखे

लोणी (प्रतिनिधी)- कोरोना या जागतिक आपत्तीची वाढती व्याप्ती लक्षात घेवून राज्य सरकरने महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाने भयभीत होवू नका. सरकार प्रशासन आणि जनतेच्या सहकार्यानेच या राष्ट्रीय आपत्तीचा धैर्याने मुकाबला करण्यासाठी जागरुकता दाखवावी, असे आवाहन माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूच्या केलेल्या आवाहानाला सर्वच समाज घटकांनी सकारात्मक प्रतिसाद देवून हा जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल जनतेचे आभार मानून आ. विखे पाटील म्हणाले की,असेच सहकार्य पुढील काही दिवसही मिळावे अशी अपेक्षा आहे.

दरम्यान आजच्या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आ. विखे पाटील यांनी मतदार संघाबरोबरच जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून वेळोवेळी आढावा घेतला. जिल्हा प्रशासनाशी संपर्क ठेवून जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून जाणून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आ. विखे यांनीही कुटूबियांसमवेत टाळ्या वाजवून आणि घंटानाद करून या आपतीच्या काळात सेवा देणार्‍या व्यक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, रणरागिणी महिला मंचाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांच्यासह कुटूबिंय याप्रसंगी उपस्थित होते.

कोरोना व्हायरसचा विळखा रोखण्यासाठी राज्य सरकारने पुढील काही दिवसांकरिता घेतलेल्या कठोर निर्णयांची अंमलबजावणी सर्वांनाच करावी लागेल यासाठी सर्वच समाज घटकांनी स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून येणार्‍या सूचनांचे पालन करावे,आरोग्य सुविधेकरीता सरकारी यंत्रणांशी संपर्क साधावा अत्यावश्यक सेवा उपलब्ध होणार असल्याने जनतेने भयभीत होवू नये, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या