Monday, April 29, 2024
Homeनगरशिर्डी नगरपंचायतच्या स्वच्छता ठेक्यात अफरातफरीचा आरोप

शिर्डी नगरपंचायतच्या स्वच्छता ठेक्यात अफरातफरीचा आरोप

शहर महाविकास आघाडी पदाधिकार्‍यांनी केली चौकशीची मागणी

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असलेल्या श्रीसाईबाबा संस्थान शिर्डी यांच्याकडून शिर्डी नगरपंचायतीला शहर स्वच्छतेसाठी दरमहा 42 लाख 51 हजार रुपयांचा ठेका दिला जात असून यातील काही रक्कम शिर्डी नगरपंचायत स्वतःच्या खिशात घालत असल्याचा आरोप करून या अफरातफरीची चौकशी करण्याची मागणी शिर्डी शहर महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. स्वच्छता कर्मचार्‍यांच्या पगाराला कात्री लावून हा पैसा कोणाच्या खिशात जातोय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात महाविकास आघाडीने म्हटले आहे की, शिर्डी शहराच्या स्वच्छतेसाठी साईबाबा संस्थानने दरमहा 42 लाख 51 हजार रुपये पाच वर्षासाठी मंजूर केले आहेत गेल्या अडीच ते तीन वषार्ंपासून साईबाबा संस्थान नियमितपणे दरमहा ठरलेली रक्कम शिर्डी नगरपंचायतकडे वर्ग करीत आहे. शिर्डी नगरपंचायतीने स्वच्छतेचा ठेका बीव्हीजी कंपनी पुणे यांना पाच वर्षांसाठी दिलेला आहे. दरमहा मिळत असलेले 42 लाख 51 हजार रुपये कसे खर्च होतात याचा तपशील शिर्डी नगरपंचायतीने संबंधित ठेकेदार व साईबाबा संस्थांना सादर केलेला आहे.

त्या तपशीलात उदाहरण म्हणून स्वच्छता कर्मचार्‍यांना दरमहा 14 हजार 720 रुपये इतका पगार मिळायला हवा होता. प्रत्यक्षात मात्र तसे न करता बीव्हीजी कंपनी कर्मचार्‍यांना त्यांच्या खात्यामध्ये अंदाजे 9 हजार रुपयांच्या आसपास रक्कम जमा करत आहे व उरलेली रक्कम शिर्डी नगरपंचायत स्वतःच्या खिशात घालत आहे. अशाप्रकारे सर्वच 157 स्वच्छता कर्मचार्‍यांच्या पगारात अफरातफर केली जात आहे, असे दिसते. यापूर्वी शिर्डी नगर पंचायतीच्या सदस्य व नागरिकांनी देखील प्रत्यक्ष लेखी अथवा तोंडी स्वरूपात अनेक वेळा शिर्डी नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार विचारणा करून देखील त्यांनी यावर काही खुलासा केलेला नाही. ही रक्कम साईबाबांच्या झोळीतील असल्याने त्याचा कोणी गैरवापर व अफरातफर करत असेल तर निश्चितच कारवाई झाली पाहिजे.

या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून शिर्डी नगरपंचायतकडून सर्व रक्कम वसूल करून संबंधित कर्मचार्‍यांच्या हक्काची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी किंवा साईबाबा संस्थान यांना परत करावी. जोपर्यंत ही रक्कम जमा होत नाही तोपर्यंत साईबाबा संस्थानने शिर्डी नगरपंचायतीला दरमहा मंजूर केलेले 42 लाख 51 हजार रुपये त्वरित देणे थांबवावे स्वच्छता कर्मचार्‍यांचे दरमहा ठरलेले पगार जर त्यांना मिळत नसेल आणि शिर्डी नगरपंचायत जर हे पैसे खिशात घालत असेल तर ही बाब गंभीर असून याबाबत गांभीर्याने पावले उचलावीत. 16 मार्च 2020 पासून देशभरात करोना विषाणूजन्य आजारांच्या संसर्गामुळे देशभर सुरू आहे. तेव्हापासून दिवसाकाठी येणार्‍या भक्तांना साईबाबा मंदिर दर्शनासाठी बंद आहे आणि ते कधी कधी सुरू होईल याची शाश्वती नाही.

शिर्डी शहरात दर्शनासाठी साईभक्त नसल्याने आणि व्यावसायिकांचे व्यवसायदेखील शंभर टक्के बंद आहेत. परिणामी शहरात कचरा होण्याचा प्रश्नच येत नाही. सध्या शहर साफसफाईचे कुठे काम होत नाही. त्यामुळे या काळात साईबाबा संस्थानने दिलेले पैसे परत करावेत आणि भविष्यात जोपर्यंत जोपर्यंत टाळेबंदी उघडत नाही आणि साफसफाई पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही तोपर्यंत साईबाबा संस्थानचे पैसे स्वीकारू नयेत, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनावर माजी नगराध्यक्षा अनिता जगताप, शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, सचिन कोते, संजय शिंदे, विजय जगताप, निलेश कोते, गणेश बनकर, प्रकाश बनकर, साई कोतकर, किरण माळी, समीर शेख, प्रसाद पाटील यांची नावे आहेत. निवेदन देत असताना चर्चा झाली या चर्चेसाठी सत्ताधारी गटाच्यावतीने कैलासबापू कोते, ज्येष्ठ नगरसेवक अभय शेळके, सामाजिक कार्यकर्ते नितिन कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, नगरसेवक सुजित गोंदकर, नगरसेवक दत्ता कोते, अरविंद कोते, सत्ताधारी गटातील पदाधिकारी व नेते उपस्थित होते. उपस्थित सर्व नगरसेवकांनी गैरव्यवहार होत असल्याची शंका व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या